अमेरिका : संशयित स्फोटकं प्रकरणात एकाला अटक

फोटो स्रोत, CBS
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या टीकाकारांना स्फोटकं पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सिझर सायोक याला फ्लोरिडातून कथितरित्या अटक करण्यात आली आहे, अशा बातम्या येत आहेत.
ही स्फोटकं फ्लोरिडा येथील पोस्ट ऑफिसमधून पाठवण्यात आली होती.
सायोकचं वय 56 असून त्याच्यावर 5 गुन्हे नोदं करण्यात आले आहेत. पोस्टाने स्फोटकं पाठवणे, अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांना स्फोटकं पाठवणं अशा गुन्ह्यांचा यात समावेश आहे.
अशा घटनांना देशात स्थान नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिली आहे.
अमेरिकन तपास संस्था FBIने संशयित स्फोटकांसदर्भात फ्लोरिडा येथील पोस्ट ऑफिसची तपासणी केली. या स्फोटकांमागे कोण आहे याचा शोध घेतला जात आहे.
गेल्या आठवड्यात अमेरिकेतल्या नामांकित व्यक्तींच्या घरी, रेस्टॉरंट आणि कार्यालयात संशयित स्फोटकांची पाकिटं पाठवण्यात आली होती.
फोटो स्रोत, BROWARD COUNTY SHERIFF'S OFFICE
सिझर सायोक याला फ्लोरिडातून कथितरित्या अटक करण्यात आली आहे.
मियामी शहराच्या इशान्य भागातील एका पोस्ट ऑफिसमधून ही स्फोटकं पाठवण्यात आली असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. या व्यतिरिक्त FBIने अधिक माहिती उघड केलेली नाही.
माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि बिल क्लिंटन यांच्यासह इतर काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या घरी स्फोटकं पाठवण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर अमेरिकेत राजकीय आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत.
ओपा-लोका येथील पोस्ट ऑफीसमधले CCTV कॅमेरेही तपासले जात आहेत. बाँब शोध पथकही त्याठिकाणी दाखल झालं आहे.
ब्रेनॉन यांच्या नावाचं पाकीट मेलरूमध्ये सापडल्यानंतर CNNचं न्यूयॉर्क येथील कार्यालय बुधवारी सकाळी रिकामं करण्यात आलं होतं. पण तिथे कोणतीही संशयित वस्तू सापडली नाही.
पाकिटात काय होतं?
या पाकिटांत पाईप बॉम्ब असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ओबामा आणि क्लिंटन यांना पाठवण्यात आलेली पाकिटं त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधी सुरक्षा रक्षकांनी अडवली होती.
आतापर्यंत कुणाला स्फोटकं पाठवली?
FBIच्या ताज्या माहितीनुसार खालील ठिकाणी स्फोटकं पाठवण्यात आली :
1. अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन
2. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा
3. CIA चे माजी संचालक जॉन ब्रेनान
4. माजी महाधिवक्ता एरिक होल्डर
5. उदारमतवादी विचारवंत जॉर्ज सोरोस
6. रॉबर्ट डी नीरो
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)