श्रीलंकेत राजकीय नाट्य; महिंदा राजपक्षे झाले नवे पंतप्रधान

महिंदा राजपक्षे Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा महिंदा राजपक्षे

श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे हे एका नाट्यमय घडामोडीनंतर पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाला सिरीसेना यांच्या कार्यालयाने एक निवेदन प्रसिद्ध करत राजपक्षे यांना पंतप्रधान पदावर नियुक्त केले जात असल्याची घोषणा केली आहे.

विद्यमान राष्ट्राध्यक्ष सिरीसेना आणि राजपक्षे यांच्यात मागील राष्ट्रध्यक्षांच्या निवडणुकीत थेट लढत झाली होती. त्यात राजपक्षे यांचा पराभव झाला.

आता आपल्याच विरोधकांना आपल्याच सरकारमध्ये महत्त्वाचं पद देत मैत्रीपाला सिरीसेना यांनी सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

राष्ट्राध्यक्षांनी विद्यमान आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच राजपक्षे यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.

Image copyright MAHINDA RAJAPAKSA-TWITTER
प्रतिमा मथळा महिंदा राजपक्षे

विद्यमान पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्या UNP या पक्षासोबत सिरीसेना यांच्या पक्षाची युती होती.

या आधी UNPने म्हटले होते की राष्ट्राध्यक्ष यांच्याकडे पंतप्रधान विक्रमसिंघे यांना हटवण्याचे कुठलेही अधिकार नाहीत.

राष्ट्राध्यक्षांचे हे पाऊल बेकायदा असल्याचं मंगला समारावीरा यांनी म्हटलं आहे.

राष्ट्राध्यक्ष कार्यालयानं म्हटलंय की, मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आलं असून राजपक्षे नवीन पंतप्रधान आहेत.

गेले काही दिवस राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्यात सरकार चालवण्यावरून जोरदार रस्सीखेच सुरू होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)