ओबामा, हिलरी यांच्याकडे आलेल्या स्फोटकांचा FBIने असा लावला छडा

सेजर सेयॉक

फोटो स्रोत, BROWARD COUNTY SHERIFF'S OFFICE

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, हिलरी क्लिंटन आदी मान्यवरांना पोस्टद्वारे संशयित स्फोटकं पाठवणाऱ्या 58 वर्षीय सीझर सेयॉक या इसमाला FBIने अटक केली आहे. स्फोटकं पाठवणं, माजी राष्ट्राध्यक्षांना घातपात करण्याचा हेतू अशा प्रकारचे पाच आरोप सीझरवर ठेवण्यात आले आहेत.

अशाप्रकारची एकूण चौदा पाकीटं पाठवण्यात आली होती. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, हिलरी क्लिंटन यांच्यासह अभिनेते रॉबर्ट डी नीरो यांनाही ही स्फोटकं पाठवण्यात आली होती.

या पाकिटांत पाईप बॉम्ब असल्याचं सांगितलं जात आहे.

त्यापैकी दोन पाकिटं फ्लोरिडामध्ये तर एक पाकीट अमेरिकन वेळेनुसार शुक्रवारी सकाळी न्यूयॉर्कमध्ये सापडलं. आणखी दोन पाकिटं कॅलिफोर्निया येथे राहणारे अब्जाधीश आणि डेमोक्रॅट पक्षाला निधी पुरवणारे टॉम स्टेयर यांच्या नावे पाकीटं पाठवण्यात आली होती. पण, तिथल्या पोस्ट ऑफिसमध्येच ती ताब्यात घेण्यात आली, असं स्टेयर यांनीच सांगितलं.

मध्यावधी निवडणुकांच्या काही दिवस आधी हा प्रकार घडल्याने अमेरिकेतले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

फोटो स्रोत, AFP

"ही घटना दुर्दैवी आहे. अशा प्रकाराला आपल्या देशात काहीही थारा नाही," अशी प्रतिक्रिया राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिली आहे.

ट्रंप यांनी याआधी ट्विटरद्वारे दिलेल्या प्रतिक्रियेत मात्र विरोधाभास दिसतो. संशयित बाँबच्या प्रकारामुळे रिपब्लिकन पक्षाला मिळणाऱ्या मतावर परिणाम झाला आहे, असं ते म्हणाले होते.

अमेरिकन मीडिया विनाकारण या गोष्टीचा बाऊ करत आहे, अशी त्यांनी टीका केली होती.

सीझर सेयॉकला कसं पकडण्यात आलं?

फ्लोरिडामधल्या प्लांटेशन शहरातील एका गॅरेजमधून सीझर सेयॉकला पोलिसांनी पकडलं. एका संशयित पाकिटावर सीझरच्या हाताचे ठसे आढळल्यावर त्याला अटक करण्यात आल्याचं FBIचे संचालक ख्रिस्तोफर व्रे यांनी सांगितलं.

संशयिताचा छडा लावण्यात DNA आणि मोबाईल डेटाचाही आधार घेतल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

या प्रकरणात सीझरला तब्बल 48 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, असं अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हटलं आहे.

"अशा प्रकारच्या अनागोंदीला आणि विशेषत: राजकिय हिंसाचाराला देशात कोणताही थारा दिला जाणार नाही," असं अमेरिकेचे अटर्नी जनरल जेफ सेशन्स यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

कोण आहे सीझर सेयॉक?

सीझर सेयॉक हा फ्लोरिडामधल्या अॅवेन्चुरा या भागात राहत असे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

  • स्थानिक पोलीस ठाण्यानं दिलेल्या माहितीनुसार, सीझरवर 1991पासून गुन्हेगारीचे आरोप होत आले आहेत.
  • 2002मध्ये बाँबस्फोटाची धमकी देण्याच्या आरोपाखाली सीझरला अटक करण्यात आली होती. नंतर एक वर्षांनं त्याला सोडण्यात आलं होतं.
  • 29व्या वर्षी पहिल्यांदा चोरीच्या आरोपाखाली सीझरला अटक करण्यात आली. त्याच्यावर फसवणुकीचेही आरोप झाले आहेत.
  • 2012मध्ये कोर्टाने सीझरला दिवाळखोर घोषित केलं.

उत्तर कॅरोलिना मधल्या ब्रिवर्ड कॉलेजमध्ये सीझर शिक्षण घेतलं पण तो डिग्री पूर्ण करू शकला नाही, असं कॉलेजच्या प्रवक्त्याने बीबीसीला सांगितलं.

अटकेनंतर USTVच्या प्रसारणात सीझरच्या चारचाकी वाहनावर ट्रंप यांचे पोस्टर्स लावल्याचं दिसलं. तसंच, डेमोक्रॅट पक्षाच्या हिलरी क्लिंटन, CNN आणि ट्रंप यांचा विरोध करणाऱ्या व्यक्तींची चित्र चिटकवून त्यावर फुल्या केल्या होत्या.

फोटो स्रोत, REUTERS

तसंच Cesar Altieri आणि Cesar Altieri Randazzo या नावाने सीझर हा ट्विटर आणि फेसबुक खाते चालवत असल्याचं सांगितलं जातं. तुर्तास ही दोन्ही खाती बंद करण्यात आली आहेत.

सेयॉक हा रिपब्लिकन पक्षाचा सभासद असल्याचं अमेरिकन मीडियाचं म्हणणं आहे. तर 2016 आणि 2017मध्ये त्याने ट्रंप यांच्या काही रॅलीत सहभागही घेतला होता. पण, माझ्या वक्तव्यामुळे सेयॉक प्रवृत्त झाल्याचा आरोप ट्रंप यांनी फेटाळला आहे.

"हा देशी आतंकवाद आहे, यामध्ये काही दुमत नाही," असं गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख जेम्स क्लॅपर यांनी CNNशी बोलताना म्हटलं आहे. त्यांच्या नावेही स्फोटक पाठवण्यात आलं होतं.

ट्रंप यांची टीका करणाऱ्या प्रत्येकाने यापुढे अधिक काळजी घ्यायला पाहिजे असं ते म्हणाले.

आतापर्यंत कुणाला स्फोटकं पाठवली?

FBIच्या ताज्या माहितीनुसार खालील ठिकाणी स्फोटकं पाठवण्यात आली :

1. अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन

2. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

3. CIA चे माजी संचालक जॉन ब्रेनान

4. माजी महाधिवक्ता एरिक होल्डर

5. उदारमतवादी विचारवंत जॉर्ज सोरोस

6. रॉबर्ट डी नीरो

पाकिटात काय होतं?

या पाकिटांत पाईप बॉम्ब असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ओबामा आणि क्लिंटन यांना पाठवण्यात आलेली पाकिटं त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधी सुरक्षा रक्षकांनी अडवली होती.

फोटो स्रोत, FBI

Manila Envelopesमध्ये ही पाकिटं पाठवण्यात आली होती. यावर कॉम्प्युटर प्रिटेंड लेबल लावण्यात आलं होतं.

डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीचे माजी अध्यक्ष डेबी वासरमॅन यांनी हे पाकीट पाठवलं आहे, असा सेंडर म्हणून त्यावर उल्लेख केलेला होता. त्यांच्या नावाचं स्पेलिंग मात्र चुकलेलं होतं.

"माझं नाव का वापरण्यात आलं आहे हे मला समजत नाहीये, यामुळे मला खूप दु:ख झालं आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.

ब्रेनॉन बुधवारी CNNमधील कार्यक्रमात सहभागी होणार असल्यामुळे ही पाकिटं CNNच्या कार्यालयात पाठवण्यात आली होती, असं माध्यमांनी म्हटलं आहे.

"CNNला पाठवण्यात आलेल्या पाकिटात व्हाईट पावडर वापरण्यात आली होती, त्याची सध्या चौकशी सुरू आहे," असं न्यूयॉर्कचे पोलीस आयुक्त जेम्स ओ' नील यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)