पिट्सबर्ग ज्यू प्रार्थनास्थळावरील हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध

गोळीबार

फोटो स्रोत, Google

फोटो कॅप्शन,

गोळीबार

अमेरिकेच्या पीट्सबर्ग शहरात एका सिनेगॉगमध्ये झालेल्या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. गोळीबारानंतर बंदुकधाऱ्याने आत्मसमर्पण केलं.

पेनसिल्व्हेनिया राज्यातल्या Tree of Life या ज्यू समुदायाच्या प्रार्थनास्थळावर हल्ला झाला तेव्हा तिथे प्रार्थनासभा सुरू होती. गोळीबारानंतर ताबडतोब आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचली.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या हल्ल्याला "एका दुष्टाने केलेला संहार" म्हटलं आहे. तपास संस्था या गोळीबाराला द्वेषातून केलेलं कृत्य म्हणत आहेत.

अटक करण्यात आलेल्या 46 वर्षीय बंदूकधाऱ्याचं नाव रॉबर्ट बॉवर्स असून तो सुद्धा जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

याशिवाय गोळीबारात जखमी दोघांची नाजूक अवस्था आहे.

पेनसिल्व्हेनियामधील या भागात ज्यू लोकांची संख्या मोठी आहे. पेनसिल्व्हेनियाचे गर्व्हनर टॉम वुल्फ यांन ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. तसेच, न्यूयॉर्क पोलिसांनी शहरातल्या सर्व सिनेगॉगला संरक्षण पुरवलं आहे.

बीबीसीचे वॉशिंग्टनमधले प्रतिनिधी डॅन जॉनसन यांनी सांगितलं की, "गेल्या आठवड्यातील संशयित स्फोटकाच्या पाकिटांचं प्रकरण आणि आताचा गोळीबार, यामुळे मध्यावधी निवडणुकांच्या काळात अमेरिकेत राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे."

हा गोळीबार कसा झाला?

पेन्सिलव्हेनियातील स्क्विरेल हिल भागात ज्यू लोक मोठ्या संख्येने राहतात. इथल्या सिनेगॉगमध्ये लोक शनिवारी सकाळी प्रार्थनेसाठी गोळा झाले होते. याच प्रार्थनासभेत एक नामकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे हा आठवड्यातील सगळ्यांत गजबजलेला दिवस होता.

वेगवेगळ्या वृत्तांनुसार रॉबर्ट बॉवर्स नावाची एक श्वेतवर्णीय व्यक्ती एक रायफल आणि दोन पिस्तूल घेऊन सिनेगॉगच्या इमारतीत शिरली आणि बेछुट गोळीबार सुरू केला.

स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजताच्या सुमारास आपात्कालीन सेवेचे लोक आले. तेव्हा गोळीबाराचा आवाज ऐकू येत होता. प्राप्त माहितीनुसार जेव्हा पोलीस आले तेव्हा त्याने स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतलं.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

सिनेगॉगच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आहे.

पिट्सबर्गचे सार्वजनिक सुरक्षा विभागाचे संचालक वेंडल हिसरिच यांनी सांगितलं की पोलिसांनी नंतर बॉवर्सला ताब्यात घेतलं आणि तो जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केलं.

जिथे ही घटना घडली ती जागा भयावह होती, असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. "मी अगदी विमानं क्रॅशसारख्या दुर्घटना हाताळल्या आहेत. पण कालचा प्रसंग भयंकर होता."

आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध

राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी हा गोळीबार भीषण असल्याचं सांगितलं. शनिवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "इतकी वर्षं झाली तरी हे सारखं सारखं बघावं लागतंय, हे लाजिरवाणं आहे."

"अमेरिकेने मृत्यूदंडांची शिक्षा आणखी कडक करायला हवी. लोकांनाच याची किंमत मोजावी लागेल. हे थांबायला हवं," असं ते पुढे म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

मृतांसाठी प्रार्थना करताना

इस्रायलचे पंतप्रधान बेंयामिन नेतान्याहू यांनीही हा हल्ला अतिशय दु:खद आणि धक्कादायक असल्याचं सांगत या हल्ल्याचा निषेध केला. "ज्यू लोकांविरुद्ध झालेल्या निर्घृण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही अमेरिकेतील लोकांच्या बरोबर आहोत," असं एका व्हीडिओ मेसेजद्वारे ते म्हणाले.

UKच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनीसुद्धा या हल्ला धक्कादायक असल्याचं सांगितलं. "पिट्सबर्गमधील या भ्याड हल्ल्यात जे लोक बळी पडले, त्यांच्याप्रति मी सहवेदना व्यक्त करते," असं त्या म्हणाल्या.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो म्हणाले की त्यांच्या देशातील लोक पिट्सबर्गच्या ज्यू समुदायाच्या पाठीशी आहेत.

तर जर्मनीच्या चान्स्लर अँजेला मर्केल म्हणाल्या, "ज्यूद्वेषाविरोधात आपण एकत्र यायला हवं."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)