श्रीलंकेतील राजकीय संकटाला हिंसक वळण, गोळीबारात एकाचा मृत्यू

श्रीलंका

फोटो स्रोत, Reuters

श्रीलंकन मंत्र्याच्या बॉडीगार्डनं जमावावर केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. त्यांनतर श्रीलंकेत राजकीय आणखी वातावरण तापलं आहे.

राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणानंतर हा प्रकार घडला आहे.

बरखास्त केलेल्या मंत्रिमंडळातले तेलमंत्री अर्जुना रणतुंगा कार्यालयाकडे जात असताना त्यांची गाडी जमावानं अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या बॉडीगार्डनं केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे.

याआधी, राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांनी पंतप्रधान रनील विक्रमसिंगे यांना पदावरून हटवलं आणि माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांची पंतप्रधान म्हणून नेमणूक केली.

संविधानानुसार हा बदल केल्याचा सिरिसेना यांचा दावा आहे. एका भाषणात त्यांनी विक्रमसिंगे यांच्यावर जोरदार टीका करत ते भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला होता.

रनील विक्रमसिंगे यांनी मात्र अजूनही तेच पंतप्रधान असल्याचा दावा केला आहे. त्यांनी सरकारी घर सोडून जाण्यास नकार दिला आहे. त्यांना संसदेत बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यावी असं ते म्हणत आहेत.

गोळीबर कसा झाला?

अर्जुन रणतुंगा हे सिलोन पेट्रोलियम कार्पोरेशनच्या कार्यालयात जात असताना हा गोळीबार झाला.

गोळी लागलेल्या 34 वर्षीय व्यक्तीचा हॉस्पिटलमध्येच मृत्यू झाला, असं डॉक्टरांनी सांगितलं. तर इतर दोघं जखमी झाले आहेत.

प्रत्यक्षदर्शीनं AFP या वृत्त संस्थेला दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर श्रीलंकन क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि तेलमंत्री अर्जुन रणतुंगा यांना पोलीसांनी सुरक्षा कवच घालून सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले.

रणतुंगा यांच्या बॉडीगार्डला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी माहिती दिली.

राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना भाषणात काय म्हणाले?

फोटो स्रोत, Reuters

गेल्या तीन वर्षांपासून रनील विक्रमसिंगे यांच्याशी सरकारी धोरणांवरून मतभेद होते, असं राष्ट्रीय टीव्हीवर भाषण देताना मैत्रीपाला सिरिसेना म्हणाले.

श्रीलंकन सेंट्रल बँकेच्या वादग्रस्त बाँड विक्रीमध्ये विक्रमसिंगे यांचा हात होता. त्यामुळे देशाला 11 अब्ज श्रीलंकन रुपयांचं नुकसान झालं, असं ते पुढे म्हणाले.

तसंच एका कॅबिनेट मंत्र्याने राष्ट्राध्यक्षांना मारण्याचा प्लॅन केला आणि पोलिसांना त्याचा तपास करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी भाषणात केला आहे.

महिंदा राजपक्षे यांच्याशी केलेली आघाडी म्हणजे द्वेषाचं राजकारण नाकारून नव्या लोकशाही पर्वाची सुरुवात केली आहे, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)