ब्राझील निवडणूक : उजव्या विचारसरणीचे झैर बॉलसोनारू होणार नवे राष्ट्राध्यक्ष
पाहा व्हीडिओ : ब्राझीलचे नवे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत?
ब्राझील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अतिउजव्या विचारसरणीचे नेते झैर बॉलसोनारू विजयी झाले आहेत.
रविवारी पार दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान झालं. मतमोजणी जवळजवळ पूर्ण झाली असून त्यात, बॉलसोनारू यांना 55 टक्के मतं तर त्यांचे विरोधक आणि डाव्या विचारसरणीच नेते फर्नांडो हद्दाद यांना 45 टक्के मतं मिळाली आहेत.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार हल्ले चढवत समाजात ध्रुवीकरण केल्याचं दिसून आलं. आपला विरोधक निवडून आला तर देशाचं वाटोळं होईल, असा सूर दोन्ही पक्षांनी प्रचारमोहिमेत लावला होता.
या निवडणुकीत भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी हे सर्वांत मोठे मुद्दे ठरले. मतदानाआधी आलेल्या कल चाचणीतही बॉलसोनारू यांच्याबाजून कौल देण्यात आला होता.
बोलसोनारू आता राष्ट्राध्यक्ष माइकल टेमेर यांची जागा घेतील. टेमेर हे डेमोक्रॅटिक मुव्हमेंट पार्टीचे नेते आहेत. विजय स्पष्ट दिसत असताना बॉलसोनारू यांनी ट्वीट केलं की, "देवाची हीच इच्छा आहे. उद्या आमच्यासाठी एक नवीन स्वंतत्रता दिवस असेल."
राष्ट्राध्यक्ष बॉलसोनारू
कन्झरवेटिव्ह सोशल लिबरल पार्टीचे नेते असलेले बॉलसोनारू यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान चाकू हल्लाही झाला होता. या हल्ल्यात त्यांच्या शरीरातील 40 टक्क रक्त वाहून गेलं होतं. त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रियाही करावी लागली होती.
त्यानंतर त्यांनी जाहीर सभांमध्ये जाणं टाळलं आणि शेवटच्या टप्प्यात अधिकांश प्रचार सोशल मीडियावरच केला.
फोटो स्रोत, AFP
63 वर्षीय बॉलसोनारू लष्कराचे कॅप्टन राहिले आहेत. गर्भपात, नक्षलवाद, स्थलांतर, समलैंगिकता आणि शस्त्रांशी निगडीत कायद्यांवर बॉलसोनारू यांचे अतिकडवे विचार पाहता त्यांना 'ब्राझीलचे ट्रंप' म्हटलं जातं.
त्यांचा विजय ब्राझीलमध्ये उजव्या विचारसरणीचा वाढता प्रभाव दर्शवतो. 1964 ते 1985 दरम्यान ब्राझील लष्कराच्या ताब्यात होते.
विरोधक फर्नांडो हद्दाद
या निवडणुकीत बॉलसोनारू यांचे विरोधक आहेत 55 वर्षांचे फर्नांडो हद्दाद. हद्दाद यांचा जन्म लेबनानहून आलेल्या एका स्थलांतरित कुटुंबात झाला होता. ते सॉलो पावलोचे महापौर असून शिक्षणमंत्रीही होते.
फोटो स्रोत, Getty Images
फर्नांडो हद्दाद
हद्दाद हे वर्कर्स पार्टीचे उमेदवार आहेत. वर्कर्स पार्टीचे माजी राष्ट्राध्यक्ष लुइझ इनेसिओ लुला डि सिल्वा यांच्या जागी हद्दाद यांना उमेदवारी देण्यात आली होती.
निवडणुकीचा रंग
फोटो स्रोत, Getty Images
ब्राझील निवडणुका
ब्राझीलमध्ये गेल्या काही वर्षात गुन्हेगारी वाढल्याचं दिसून आलं आहे. त्याचबरोबर भ्रष्टाचाराने देश पोखरून काढला आहे, अर्थव्यवस्था कोलडमली आहे. 2015मध्ये आलेल्या मंदीमुळे देशाची अर्थव्यवस्थेतली वाढ 7 टक्क्यांनी खुंटली होती.
ब्राझीलमध्ये जवळपास 15 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत, ज्यांना मतदान करणं बंधनकारक आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)