इंडोनेशिया : लायन एअरचं 188 लोक घेऊन उडालेलं विमान जकार्ताजवळ कोसळलं

शोधकार्यात लागलेले अधिकारी Image copyright EPA
प्रतिमा मथळा शोधकार्यात लागलेले अधिकारी

जकार्ताहून उडालेलं लायन एअरचं एक विमान काही वेळातच समुद्रात कोसळलं. यात असलेल्या 188 लोकांचा अजून काहीही पत्ता लागलेलला नाही.

लायन एअरची JT-610 ही फ्लाईट स्थानिक वेळेनुसार साकाळी 6 वाजून 20 मिनटांनी इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून निघालं होतं. बांग्का बेलितुंग द्वीपवरील पंगकल पिनांग या शहराच्या दिशेनं ही फ्लाईट होती. पण उड्डाणाच्या काही वेळातच समुद्र पार करताना विमानाचा संपर्क तुटला आणि विमान क्रॅश झालं.

बोइंग 737 बनावटीच्या या विमानातल्या 178 प्रौढ, तीन लहान मुलं, दोन पायलट आणि पाच विमानसेवा कर्मचारी होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

30 ते 40 मीटर खोल पाण्यात हे विमान बुडाल्याची माहिती इंडोनेशियाच्या राष्ट्रीय शोध आणि बचाव पथकाचे प्रवक्ते युसूफ लतिफ यांनी दिली. "आम्ही अजूनही विमानाच्या अवशेषांचा शोध घेत आहोत," असं ते म्हणाले.

Image copyright FACEBOOK / BHAVYE SUNEJA
प्रतिमा मथळा भव्य सुनेजा

या विमानाचे कॅप्टन मूळ दिल्लीचे भव्य सुनेजा आहेत. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार त्यांनी 2009 साली बेल एयर इंटरनॅशनल येथून वैमानिकाचं लायसन्स मिळवलं आणि 2011मध्ये लायन एअरमध्ये रुजू झाले होते.

नंतर या बचाव संस्थेचे जनसंपर्क प्रमुख सुतोपो पुर्वो नुग्रोहो यांनी विमानाच्या मलब्याचे तसंच काही इतर साहित्याचे फोटो ट्वीट केले.

"कुणी वाचलंय का, हे आम्हाला आत्ताच सांगता येणार नाही," असं या बचाव संस्थेचे प्रमुख मुहंमद स्यॉगी यांनी सांगितलं. "पण आम्ही प्रार्थना करतोय की असं काही होऊ नये."

लायन एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एडवर्ड स्ट्रेट यांनी आधी रॉयटर्स संस्थेला "सध्याच काहीही सांगता येणार नाही," असं सांगितलं होतं. "आम्ही आणखी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतोय."

Image copyright AFP
प्रतिमा मथळा बचाव मोहिमेला लागलेले अधिकारी

लायन एअर ही इंडोनेशियाची बजेट विमानसेवा कंपनी आहे. 737 MAX 8 हे बोइंग कंपनीचं नवीन मॉडेल आहे, जे 2016 पासून वापरात आहे.

नागरी उड्डयन कन्सलटंट जेरी सोजातमन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की 737 MAX 8 मॉडेलमध्ये सुरुवातीपासूनच काही न काही गडबड लक्षात आली होती.

अनेक छोट्यामोठ्या बेटांच्या समूहापासून बनलेल्या इंडोनेशियात लोकांना बऱ्यापैकी विमान सेवेवर निर्भर राहावं लागतं. पण तिथल्या अनेक आंतरदेशीय एअरलाइन्स सुरक्षिततेच्या बाबतीत कुप्रसिद्ध आहेत.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा 2013 मध्ये लायन एअरची फ्लाईट 904 बालीच्या विमानतळावर लँड करताना समुद्रात क्रॅश झाली होती.

2013 मध्ये लायन एअरची फ्लाईट 904 बालीच्या विमानतळावर लँड करताना समुद्रात क्रॅश झाली होती. सुदैवाने त्यातले सर्व 108 लोक बचावले होते. 2004मध्ये याच कंपनीचं एक विमान सोलो सिटीमध्ये क्रॅश होऊन 25 जणांचा जीव गेला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)