बांगलादेश : माजी पंतप्रधान खालिदा झियांना सात वर्षांची शिक्षा

खालिदा झिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

खालिदा झिया

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनल पक्षाच्या प्रमुख खालिदा झिया यांच्यासह आणखी तिघांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सात वर्षांची शिक्षा झाली आहे.

ढाका शहरातल्या एका कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे. खालिदा यांच्याविरोधात सात वर्षापूर्वी तक्रार दाखल झाली होती. सोमवारी न्यायधीश अख्तरुजजामन यांनी त्यांना शिक्षा सुनावली.

शिक्षेबरोबरच त्यांना 10 लाख टका (बांग्लादेशी चलन) दंडही भरावा लागेल. दंड न भरल्यास त्यांना अतिरिक्त सहा महिन्यांची शिक्षा होईल.

फेब्रुवारी महिन्यापासून खालिदा झिया भ्रष्टाचारच्या दुसऱ्या एका प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा भोगत आहेत.

बांग्लादेशच्या अॅन्टी करप्शन कमिशनर (एसीसी) यांनी 8 ऑगस्ट, 2011 साली तेजगाव पोलीस ठाण्यामध्ये झिया चॅरिटेबल ट्रस्टमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात खालिदा यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीनुसार खालिदा यांनी सत्तेचा दुरुपयोग करत अज्ञात स्रोतांकडून आपल्या ट्रस्टसाठी सव्वा तीन कोटी टकांची देणगी घेतली होती.

एसीसीनं 16 जानेवारी 2012 साली या प्रकरणात खालिदांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. याची सुनावणी 19 मार्च 2013 पासून सुरू झाली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)