इंडोनेशिया विमान दुर्घटना : उड्डाणाच्या 3 मिनिटातच वैमानिकाने मागितली होती परतण्याची परवानगी

इंडोनेशिया विमान दुर्घटना Image copyright Getty Images

उड्डाणाच्या काही मिनिटांतच इंडोनेशियाचं विमान समुद्रात कोसळण्याची कारणं आता हळूहळू समोर येत आहेत.

या विमानात आधीच तांत्रिक बिघाड झाला होता. बीबीसीला या विमानाचा एक टेक्निकल लॉग मिळाला आहे. त्यात बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात.

हे विमान रविवारी बालीहून जकार्ताला पोहोचलं होतं. या उड्डाणादरम्यानचा हा टेक्निकल लॉग आहे. या उड्डाणादरम्यानच विमानात तांत्रिक बिघाड झाला होता, असं या टेक्निकल लॉगवरून स्पष्ट होतं.

लायन एअरलाईन्सचे कार्यकारी अधिकारी एडवर्ड सिराईड यांनी देखील हे कबूल केलं आहे. मात्र बिघाड नंतर दुरुस्त करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. सोमवारी हे विमान जकार्ताहून पंगकल पिनांग या इंडोनेशियातल्या पश्चिमेकडे असलेल्या शहरासाठी रवाना झालं.

बीबीसीला मिळालेल्या टेक्निकल लॉग नुसार वैमानिकाजवळ असलेलं एअरस्पीड रीडिंगचं उपकरण योग्य रीडिंग देत नव्हतं. म्हणजेच विमानाचा वेग किती आहे, याची खरी माहिती वैमानिकाला मिळत नव्हती.

Image copyright AFP

शिवाय वैमानिक आणि सहवैमानिकाजवळ विमानाच्या उंचीची आकडेवारी देणारी उपकरणंही वेगवेगळी माहिती देत होती. याच कारणामुळे चालक दलानं जकार्ताला परतण्याचा निर्णय घेतला होता.

विमानात नक्की काय झालं होतं?

  • - सोमवारी सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी हे विमान जकार्ताहून निघालं. एका तासात पंगकलला पोहोचणं अपेक्षित होतं.
  • - 6 वाजून 23 मिनिटांनी कॅप्टन भव्य सुनेजा यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे परतण्याची परवानगी मागितली, त्यांना परवानगी मिळाली.
  • - 6 वाजून 33 मिनिटांनी म्हणजे अवघ्या 13 मिनिटात विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी संपर्क तुटला.
  • - विमान 1580 मीटर उंचीवर होतं त्याचवेळी हे घडलं. यानंतर विमान जावाच्या समुद्रात 35 मीटर खोल पाण्यात कोसळलं.

एविएशन सेफ्टी वेबसाईटने दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानाच्या डेटाचं विश्लेषण करून सांगितलं की, या विमानाचा वेग आणि उंची खूपच अस्थिर होती. उड्डाणानंतर हे विमान डावीकडे 650 मीटर उंच उडालं आणि त्यानंतर 450 मीटर खाली आलं होतं. यानंतर विमान वर गेलं आणि तिथं ते बरंच डगमगत होतं.

आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की लायन एअरलाईन्सचे कार्यकारी अधिकारी एडवर्ड यांच्या म्हणण्यानुसार विमानातला बिघाड दुरुस्त करण्यात आला होता तर कॅप्टन भव्य सुनेजा यांनी माघारी येण्याची परवानगी का मागितली होती?

या दुर्घटनेत आतापर्यंत कुणीही जिवंत सापडलेलं नाही. विमानाच्या आणि त्यातील प्रवाशांच्या शोधासाठी ड्रोन आणि सोनार तंत्राचा वापर करण्यात येतोय.

करवांगजवळ विमानाशी शेवटचा संपर्क झाला होता. तिथंच सोनार तंत्राचा वापर करून विमानाचा शोध घेण्यात येतोय, अशी माहिती इंडोनेशियाच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे प्रमुख सुतोपो पूर्वो नुग्रोह यांनी ट्वीटरवरून दिली आहे.

विमान आणि त्याच्या फ्लाईट डेटा रेकॉर्डरचाही शोध घेणं सुरू आहे. या डेटा रेकॉर्डरवरून अपघात नेमका कशामुळे झाला, याची माहिती मिळू शकेल.

बचाव दलाला काही मृतदेह, प्रवाशांचं थोडं सामान आणि लहान मुलांचे काही शूज सापडले आहेत. पीडित कुटुंबीयांना हॉस्पिटलमध्ये जाऊन मृतदेहांची ओळख पटवण्यास सांगण्यात आलं आहे. कुणी जिवंत सापडलं तर तो चमत्कारच असेल, असं युसूफ लतीफ या अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.

दुर्घटनाग्रस्त झालेल्या फ्लाईट JT 610 या विमानाचे वैमानिक भव्य सुनेजा भारतीय होते. दिवाळीच्या सुट्टीत ते आपल्या कुटुंबीयांना भेटायला दिल्लीतल्या आपल्या घरी जाणार होते.

लायन एअरलाईंसचं म्हणणं आहे की वैमानिक आणि सहवैमानिकांना एकूण अकरा हजार तासांच्या विमान उड्डाणाचा अनुभव होता. इतक्या तासांचा अनुभव प्रदिर्घ अनुभव मानला जातो.

Image copyright BHAVYE SUNEJA/FACEBOOK

दोन वैमानिकांव्यतिरिक्त विमानत तीन प्रशिक्षणार्थी आणि एक तंत्रज्ञ होता. बीबीसीला मिळालेल्या माहितीनुसार या विमानात इंडोनेशियाच्या अर्थ मंत्रालयातले वीस कर्मचारीदेखील होते.

विमानाविषयी माहिती

बोईंगचं 737 MAX8 या मॉडेलचं हे विमान होतं. 2016 पासून हे विमान व्यावसायिक वापरात आहे. लायन एअरलाईन्सने सांगितलं आहे की, हे विमान याच वर्षी तयार करण्यात आलं आहे आणि 15 ऑगस्टपासून त्याचा वापर सुरू झाला होता. हे विमान कमी अंतराच्या प्रवासासाठी तयार करण्यात आलं होतं. याची आसन क्षमता 210 होती.

सुरक्षेच्या दृष्टीने कशी आहे लायन एअरलाईन्स?

इंडोनेशियामध्ये बरीच बेटं आहेत आणि एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जाण्यासाठी विमान प्रवास एक विश्वसनीय पर्याय आहे. मात्र इंडोनेशियाच्या या एअरलाईन्सचा रेकॉर्ड फार चांगला नाही.

Image copyright Getty Images

लायन एअर इंडोनेशियातली सर्वांत मोठी किफायतशीर एअरलाईन्स कंपनी आहे. या कंपनीच्या फ्लाईट्स ऑस्ट्रेलिया आणि आखाती देशांतही जातात. 1999 साली ही कंपनी स्थापन झाली. मात्र या कंपनीचा विमान प्रवास फारसा सुरक्षित नाही, असंच आतापर्यंतची आकडेवारी सांगते.

2013 साली लायन एअरचं विमान बालीच्या समुद्रात उतरवलं गेलं होतं. विमानात 108 प्रवासी होते. सर्व सुखरूप बचावले. त्यापूर्वी 2004 साली याच एअरलाईन्सच्या विमानाने सोलो शहरात क्रॅश लँडिंग केलं होतं. त्या दुर्घटनेत 25 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)