प्रेषित मोहम्मद निंदा प्रकरण : आसियांच्या सुटकेनंतर पाकिस्तानात लोक रस्त्यावर

आसिय बिबी

आसिया बिबी नावाच्या ख्रिश्चन महिलेला पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने ईशनिंदा प्रकरणी निर्दोष मुक्त केलं आहे. शेजाऱ्यांशी भांडतांना प्रेषित मोहम्मदांचा अपमान केल्याचा त्यांचावर आरोप होता.

2010 साली त्यांना हायकोर्टाने दोषी ठरवलं होतं. त्यानंतर त्यांनी त्याविरोधात अपील केलं होतं. त्यांना आठ वर्षं तुरुंगात आणि एकांतवासात काढावी लागली. मी निर्दोष आहे, असं त्या सुरुवातीपासून म्हणत होत्या.

या प्रकरणामुळे पाकिस्तानात ईशनिंदा कायद्याविषयी मोठी चर्चा झाली. या कायद्याला अनेकांनी विरोध केला असला, तरी समाजमत मोठ्या प्रमाणात कायद्याच्या बाजूने आहे.

त्यामुळे या निकालानंतर हिंसा होण्याची प्रशासनाला भीती आहे. राजधानी इस्लामाबादमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धार्मिक पुढाऱ्यांनी त्यांच्या पाठीराख्यांना रस्त्यांवर येऊन निदर्शनं करण्याचं आवाहन केलं आहे.

सरन्यायाधीश साकिब निसार यांनी इस्लामाबादमध्ये सुप्रीम कोर्टात हा निकाल काही वेळापूर्वीच जाहीर केला.

"अपील मान्य करण्यात येत आहे आणि त्यांना निर्दोष मुक्त करण्यात येत आहे. हायकोर्ट आणि सत्र न्यायालयाचे निकाल रद्द ठरवण्यात येत आहेत," असं ते म्हणाले.

वेगवेगळ्या शहरांमध्ये निदर्शनं

कोर्टाच्या निर्णयानंतर पाकिस्तानमधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. संपूर्ण पंजाब प्रांतामध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

बीबीसी प्रतिनिधी शहज़ाद मलिक यांनी दिलेल्या माहिती नुसार लोकांनी फ़ैज़ाबाद - इस्लामाबाद हाय वे रोखून धरला आहे.

वेगवेगळ्या मशिदींच्या भोंग्यांमधून लोकांना रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचं आवाहन केलं जात आहे.

फोटो स्रोत, AFP

कराचीतील बीबीसी प्रतिनिधी रियाज़ सोहैल यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक लोक लाठ्याकाठ्यांसह रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.

तर काही मानवाधिकार संस्थांनी आयिसा बीबी यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या वकिलांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे.

राज्यपालाची हत्या

ईशनिंदा कायद्याचे विरोधक म्हणतात की पाकिस्तानात या कायद्याचा अनेकदा दुरुपयोग होतो. वैयक्तिक भांडणांमध्ये बदला घेण्यासाठी हा कडक कायदा वापरला जातो आणि अतिशय कमी पुराव्यावरही लोकांना दोषी ठरवलं जातं.

राज्यपाल सलमान तसीर यांनी विनंती केली होती की आसिया बिबींना शिक्षेतून सूट दिली जावी. त्यानंतर त्यांची इस्लामाबादच्या चौकात त्यांच्या सुरक्षारक्षकाने हत्या केली. त्यामुळे आसिया बिबींच्या प्रकरणाकडे देशाचं आणि जगाचं लक्ष वेधलं.

तसीर यांच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झाली, पण अनेकांनी त्याला 'हिरो' म्हटलं.

फोटो स्रोत, Getty/ASIF HASSAN

फोटो कॅप्शन,

आसियांविरोधात पाकिस्तानात निदर्शनं.

आसियांनी काय म्हटलं होतं?

लाहोरजवळच्या शेखूरपुरामध्ये आसिया आणि इतर महिलांमध्ये एक बादली पाण्यावरून भांडण झालं. ही घटना 2009 सालची आहे.

आसियांनी त्या पाण्याला स्पर्श केल्यामुळे इतरांचा धर्म भ्रष्ट झाला असा आरोप या महिलांनी केला. आसिया ख्रिश्चन तर इतर महिला मुस्लीम आहेत.

या महिलांनी पुढे आग्रह धरला की आसियांनी इस्लाम धर्म स्वीकारावा. त्यानंतर आसियांनी प्रेषित मोहम्मदांबद्दल तीन अपमानास्पद शब्दं काढले, असा महिलांचा आरोप आहे. या महिलांना आसियांना चोप दिल्यानंतर आसियांनी ईशनिंदेची कबुली दिली, असा महिलांचा दावा आहे. पोलीस तपासानंतर आसियांना अटक करण्यात आली.

मी रागावून शेजाऱ्यांशी बोलले, पण ईशनिंदा केली नाही आणि कबुलीही दिली नाही, असा आसियांचा दावा आहे.

आसियांच्या जिवाला धोका

इस्लाम हा पाकिस्तानचा राष्ट्रीय धर्म आहे आणि त्यांच्या न्यायव्यवस्थेचा गाभा आहे. त्यामुळे ईशनिंदेला कठोर शिक्षेची तरतूद आहे आणि या तरतुदीला लोकांचा पाठिंबा आहे.

फोटो स्रोत, Getty/FAROOQ NAEEM

फोटो कॅप्शन,

सिद्रा आणि ईशाम या आसियांचा मुली

पण आंतरराष्ट्रीय पातळीवर या कायद्यावर आणि आसियांना दोषी ठरवल्याबद्दल जोरदार टीका झाली. हे मानवी हक्कांचं उल्लंघन आहे, असा आरोप झाला.

आसियांविरोधात निदर्शनांची भीती असल्यामुळे अनेक देशांनी त्यांना आश्रय देऊ केलाय. सुटका झाल्यानंतर आसिया देश सोडण्याची शक्यता आहे.

आसियांना चार अपत्ये आहेत. त्यांची मुलगी ईशाम आशिक यांनी AFP संस्थेशी बोलताना आधी म्हटलं होतं, "तिची सुटका झाल्यावर मी तिला मिठी मारेन आणि ईश्वराचे आभार मानेन."

आसियाच्या कुटुंबीयांना जिवाची भीती आहे आणि त्यांनी पाकिस्तान सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)