रोमन सैन्यावर मात करणाऱ्या या राणीबद्दल हे वाचायलाच हवं...

राणी

ब्युडिका हे एक प्रसिद्ध मात्र तेवढंच वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे. काहींना ती पहिली स्त्रीवादी आणि स्वातंत्र्यसैनिक वाटते. तर काहींना ती क्रूर योद्धा आणि अतिरेकी वाटते. कोण आहे ही राणी?

जवळपास 2000 वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर एक शूर राणी होऊन गेली... ती होती ब्युडिका (किंवा बोडिसिआ)... या वीरांगनेने त्या काळी सर्वशक्तिमान समजल्या जाणाऱ्या रोमन सैन्याला धूळ चारली. रोमन सैन्याला या राणीच्या शौर्यामुळे माघारी परतावं लागलं.

ब्युडिकाचा वारसा कसाही असला तरी वेगवेगळ्या जमातींना एकत्र आणून मोठं सैन्य उभारणारी ती एक शक्तिमान नेता होती.

या वीरांगनेच्या कथांमधून नेतृत्वाचे कोणते धडे गिरवता येतील?

1. छाप पाडणारी वेशभूषा

कुठल्याही व्यवसायात वेशभूषेला असलेलं महत्त्व आपण सारेच जाणतो. मात्र ब्युडिकाला तर ते अधिकच चांगलं कळलं होतं. पाठीवरून मोकळे केस उडत असलेली, भाला फिरवत रथावर स्वार झालेली आवेशपूर्ण आणि शूर स्त्री, सर्वसाधारणपणे असं तिचं चित्र रेखाटलं जातं.

ती नेमकी कशी दिसायची हे कुणालाच माहिती नाही. मात्र तिच्या मृत्यूच्या अनेक दशकांनंतर रोमन इतिहासकार कॅसिअस डिओ यांनी तिचं वर्णन केलं आहे. ते म्हणतात, "तिचा बांधा उंच, तिची उपस्थिती थरकाप उडवणारी आणि तिचे डोळे प्रखर तेजाने चमकणारे होते. तिचे दाट तांबडे केस कमरेच्याही खाली यायचे. गळ्यात सोन्याचा मोठा हार असायचा आणि रंगीबेरंगी अंगरखा घालून त्यावर सुंदर ठसठशीत ब्रोचने घट्ट आवळलेला सैलसर जाड झगा ती घालायची."

ब्युडिकाची वेशभूषा पॉवर ड्रेसिंग म्हणजे छाप पाडणारी होती, यात शंकाच नाही. त्याचा परिणामही तसाच विलक्षण असायचा.

2. भारदस्त नाव

ब्युडिका हे नाव अतिप्राचीन ब्रिथोनिक शब्द असलेल्या (boud) ब्युडपासून आला आहे. ब्युड म्हणजे विजय. ब्युडेग म्हणजे विजय मिळवणारा. या ब्युडेगचा स्त्रीलिंगी शब्द ब्युडेगा म्हणजे जिने विजय संपादन केला अशी ती. यावरून सहज अंदाज बांधता येतो की ब्युडिका हे नाव या वीरांगनेला जन्मतः मिळालेलं नाही तर पुढे तिनेच हे नाव आत्मसात केलं. सैन्याचं नेतृत्व करताना या भारदस्त नावाची मदतच झाली असणार. तथापि, अखेर पराभूत झालेल्या या राणीला आपल्या नावाला जागता आलं नाही.

3. क्षमता कमी लेखू नका

ब्युडिगाचा नवरा प्रसुटॅगस पूर्व अँजेलिया प्रांतातल्या आयसेनी जमातीचा राजा होता. तो साम्राज्यविस्तार करणाऱ्या रोमनांप्रति सहिष्णू होता. त्यामुळेच रोमनांनी त्याला राज्यकारभाराची मुभा दिली. मात्र प्रसुटॅगसच्या मृत्यूनंतर रोमन राजाने हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जमीन बळकावली.

ब्युडिकाने भरमसाठ कर भरायला नकार दिल्यावर तिला भररस्त्यात यातना देण्यात आल्या. तिच्या मुलींवर बलात्कार करण्यात आला. मात्र त्यांनी या अपमानित झालेल्या राणीला कमी लेखलं. तिने लढायचा निर्णय घेतला. ब्युडिकाने स्वतःच्या आणि आसपासच्या जमातीच्या लोकांना एकत्र करून त्यांचं सैन्य उभारलं आणि नवव्या रोमन राजावर यशस्वीपणे मात केली.

इतकंच नाही तर त्याकाळच्या रोमन ब्रिटनची राजधानी असलेलं कोलचेस्टर शहर उद्ध्वस्त केलं. लंडन आणि सेंट अलबांस ही शहरंही जमीनदोस्त केली.

4. प्रशिक्षण नव्हतं...

लंडन आणि सेंट अलबांस धुळीला मिळाल्यानंतर रोमन गव्हर्नरांनी ब्युडिकाच्या सैन्याशी युद्धाचा निर्णय घेतला. ब्युडिकाकडे मोठं सैन्य होतं. मात्र ब्रिगेड केनडल यांनी म्हटल्याप्रमाणे, "त्या वीरांगनेचे सैनिक बेशिस्त होते. शिवाय त्यांच्याकडे चांगली शस्त्रास्त्रही नव्हती. उलट रोमन सैनिक प्रशिक्षित आणि अधिक कुशल होते. त्यांच्याकडे भरपूर शस्त्रसाठा होता. अर्थातच रोमन सैन्यापुढे ब्युडिकाच्या सैन्याचा टिकाव लागणं शक्य नव्हतं."

ब्युडिकाकडे दहापट जास्त सैनिक असूनही तिचा पराभव झाला.

5. गर्दीपासून वेगळं दिसावं

रोमन सैन्यावर केवळ ब्युडिकानेच हल्ला चढवला होता, असं नाही. तर ती एक स्त्री होती म्हणून या आक्रमणाला इतिहासात वेगळं महत्त्व आहे.

डॉ. जेन वेबस्टर सांगतात, "स्त्री नेतृत्त्वामुळे रोमनांची संवेदनशीलता दुखावली गेली होती. ही सामान्य गोष्ट नव्हती. म्हणूनच रोमन साम्राज्यात झालेल्या लढायांपैकी आपल्याला या विद्रोहाबद्दल अधिक माहिती आहे."

मिरांडा अल्डहाऊस-ग्रीन म्हणतात, "ब्युडिका एक असामान्य व्यक्तिरेखा होती. कारण रोमन साम्राज्याविरोधात उभ्या राहणाऱ्या मोजक्या स्त्रियांपैकी ती एक होती." (खरंतर साम्राज्यविस्तार करणाऱ्या सैन्याविरोधात ब्रिटनच्या विविध जमातींना एकत्र करून लढा देणारी ती एकमेव स्त्री होती.) ब्युडिकाविषयी आपल्याला फार माहिती नाही. तपशीलही नाही आणि जे आहे त्यातही बरीच विसंगती आहे. मात्र "साहित्यात तिचं स्थान कायम राहिलं आहे आणि विद्रोहाचं एक उत्तम उदाहरण म्हणून तिच्याकडे बघितलं जातं", असं जेन म्हणतात. कारण ती एक स्त्री होती. हे तिचं वेगळेपण होतं.

6. आदर्श असणं महत्त्वाचं

16व्या शतकात शास्त्रीय लेखकांमध्ये लोकांची रुची पुन्हा वाढू लागली आणि त्याकाळचे थोर रोमन इतिहासकार मानले जाणारे टॅसिटस यांनी ब्युडिकाबद्दल जे लिहिलं त्यावर पुन्हा लिखाण सुरू झालं. या पुरुषप्रधान जगातली आणखी एक महत्त्वाची आणि बलशाली स्त्री म्हणजे एलिझाबेथ प्रथम. त्यांनाही ब्युडिकाच्या कथांमधून प्रेरणा मिळाली. शिवाय विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटनमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळावा, यासाटी सफरगेट नावाने मोहीम सुरू झाली होती. त्या मोहिमेतल्या स्त्रियांसाठीही ब्युडिका आदर्श होती. ब्युडिकाबद्दल इतकी कमी माहिती असूनही ती आदर्श का ठरली, हे प्राध्यापक हिंग्ले उलगडून सांगतात. त्यांचं म्हणणं आहे, "ते (ब्युडिका) एक लवचिक आणि अनेक अर्थ निघणारं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकजण तिला वेगळ्या नजरेतून बघतो."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)