आसिया बिबी प्रकरण : मुस्लिमाशी असभ्य बोलणाऱ्याला का होते पाकिस्तानात शिक्षा?

प्रेषित मोहम्मद निंदा प्रकरण Image copyright ARSHAD ARBAB

आसिया बिबी यांना पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने ईशनिंदा प्रकरणी निर्दोष मुक्त केल्यानंतर या मुद्द्यावर लोकांना भडकवणाऱ्यांची पंतप्रधान इम्रान खान यांनी कानउघडणी केली आहे.

आसिया बिबी या ख्रिश्चन महिलेला प्रेषित मोहम्मद यांची निंदा केल्याच्या आरोपाखाली खालच्या कोर्टाने आणि हाय कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. सुप्रीम कोर्टाने बुधवारी त्यांची निर्दोष मुक्तता केली. त्यांच्या मुक्ततेनंतर पाकिस्तानात कट्टरपंथी रस्त्यावर उतरले आहेत.

"राजकीय हितासाठी कट्टरवाद्यांनी लोकांना भकवणे बंद करावे. असं करून ते इस्लामची सेवा करत नाहीत," असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ते बोलत होते.

स्वत:च्या सुरक्षेसाठी आसिया बिबी यांना लवकर पाकिस्तान सोडून जावं लागेल, अशी खंत त्यांच्या वकिलांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केली आहे.

आसिया बिबी यांना 2010 साली हायकोर्टाने दोषी ठरवलं होतं. त्यांनी त्याविरोधात अपील केलं होतं. त्यांना आठ वर्षं तुरुंगात आणि एकांतवासात काढावी लागली.

पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टानं बुधवारी निकाल जाहीर केल्यानंतर कराची, लाहोर, मुलतान आणि पेशावरमध्ये निदर्शनं झाली. पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाचीच्या घटनाही घडल्या.

Image copyright EPA

"हा निकाल देणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना जगण्याचा काहीही हक्क नाही," असं तेहरिक-ए-लबैक या कट्टरवादी पक्षाचे नेते मोहम्मद अफजल कादरी यांनी म्हटलं आहे. या निकालानंतर इस्लामाबादमधील सुप्रीम कोर्टाच्या परिसराची पोलिसांनी नाकेबंदी केली आहे.

"निदर्शकांनी सरकारला धाब्यावर बसवलं तर सरकार काम कसं करू शकेल?" असा सवाल इम्रान खान यांनी केला आहे.

"सामान्य आणि गरीब पाकिस्तानी लोकांना याचा फटका बसत आहे. रस्ते अडवून तुम्ही लोकांच्या जगण्याचं साधन हिरावून घेत आहात. हे फक्त मतपेटीचं राजकारण आहे," असं ते म्हणाले.

नेमकं प्रकरण काय आहे?

2009मध्ये लाहोरजवळच्या शेखूरपुरामध्ये आसिया आणि इतर महिलांमध्ये एक बादली पाण्यावरून भांडण झालं.

आसियांनी पाण्याला स्पर्श केल्यामुळे इतरांचा धर्म भ्रष्ट झाला, असा आरोप या महिलांनी केला. आसिया ख्रिश्चन तर इतर महिला मुस्लीम आहेत.

Image copyright AFP

या महिलांनी पुढे आग्रह धरला की आसियांनी इस्लाम धर्म स्वीकारावा. त्यानंतर आसियांनी प्रेषित मोहम्मदांबद्दल तीन अपमानास्पद शब्दं काढले, असा महिलांचा आरोप आहे. या महिलांना आसियांना चोप दिल्यानंतर आसियांनी ईशनिंदेची कबुली दिली, असा महिलांचा दावा आहे. पोलीस तपासानंतर आसियांना अटक करण्यात आली.

मी रागावून शेजाऱ्यांशी बोलले, पण ईशनिंदा केली नाही आणि त्याची कबुलीही दिलेली नव्हती, असं आसियांनी वारंवार सांगितलं आहे.

पाकिस्तानात श्वरनिंदा म्हणजे काय?

ईश्वरनिंदा विरोधातला कायदा 1860मध्ये ब्रिटिश सरकारने अंमलात आणला होता. धार्मिक भावना दुखावणे, दफनभूमीवर अतिक्रमण, धार्मिक मेळाव्यांत व्यत्यय आणणं किंवा जाणीवपूर्वक देवाची मूर्ती किंवा धार्मिक स्थळाची तोडफोड केल्यावर पाकिस्तानमध्ये 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. नंतरच्या काळात या कायद्यात नव्या तरतुदींची भर पडत गेली.

1980च्या दशकांत पाकिस्तानचे सर्वेसर्वा जनरल झिया-उल-हक यांनी या कायद्यात बरेच बदल केले आणि त्यात नव्या तरतुदींची भर घातली.

1980 - मुस्लीम व्यक्तीशी असभ्य भाषेत बोलल्यावर तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास

1982 - कुराणाची प्रत फाडली तर आजीवन कारावास

1986 - प्रेषित मोहम्मद यांची निंदा केली तर फाशी किंवा आजीवन कारावास.

सुप्रीम कोर्टानं काय निर्णय दिला?

पुरेशा पुराव्यांअभावी आसिया यांना निर्दोष ठरवण्यात येत आहे, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा आसिया यांचे पती

कमकुवत पुराव्यांच्या आधारावर हा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात योग्य तपास झालेला नाही, जमावाने जीवे मारण्याची धमकी देऊन संशयित व्यक्तीकडून कबुली घेतली, असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलं आहे.

हा निकाल देताना सुप्रीम कोर्टानं कुराण आणि इस्लामच्या इतिहासाचा बराच आधार घेतला. हादीसमधल्या वाक्याने या निकालाची सांगता केली. मुस्लिमांनी इतर लोकांना चांगली वागवणूक द्यावी, असं प्रेषित मोहम्मद म्हणाले होते, असा दाखलाही सुप्रीम कोर्टाने या निकालात दिला आहे.

या केसवर एवढ्या संमिश्र प्रतिक्रिया का?

इस्लाम हा पाकिस्तानचा राष्ट्रीय धर्म आहे आणि इस्लाम पाकिस्तानातील न्यायव्यवस्थेचा गाभा आहे. त्यामुळे ईशनिंदेला कठोर शिक्षेची तरतूद आहे आणि या तरतुदीला लोकांचा पाठिंबा आहे.

मतं मिळवण्यासाठी कट्टरवादी नेते कठोर कारवाईचं नेहमी समर्थन करत आले आहेत. तर वैयक्तिक प्रकरणांत सूड घेण्यासाठी या कायद्याचा वापर होण्याची उदाहरणं आहेत, असं टीकाकारांचं मत आहे.

या कायद्यात सुरुवातीला मुस्लीम आणि अहमदिया पंथातील लोकांना शिक्षा झाली. पण 1990नंतर अनेक ख्रिस्ती लोकांना या कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये ख्रिश्चनांची लोकसंख्य 1.6 टक्के आहे.

गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानतल्या ख्रिश्चन समुदायाला लक्ष केलं जात आहे.

1990पासून ईश्वरनिंदेच्या आरोपावरून जवळजवळ 65 लोकांची हत्या झाली आहे.

1971ला जन्म झालेल्या आसिया बिबी यांना चार मुलं आहेत. ईश्वरनिंदेच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा होणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती ठरल्या असत्या.

आंतरराष्ट्रीय पातळीवरही या प्रकरणात मोठी टीका झाली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)