हवामान बदलामुळे समुद्राला उष्णतेची भरती; नव्या संकटांची चाहूल

  • मॅट मॅकग्रथ
  • पर्यावरण प्रतिनिधी
समुद्र

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या 25 वर्षांत जगातील समुद्रांनी जास्त उष्णता शोषून घेतली आहे, पण याकडे दुर्लक्ष होत असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. या नव्या संशोधनामुळे पृथ्वीचं तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी असलेल्या आव्हानांची व्याप्ती किती तरी जास्त असलयाचं दिसून आलं आहे.

नवीन संशोधनानुसार समुद्रांमध्ये आधीच्या अंदाजापेक्षा 60 टक्के अधिक उष्णता शोषली गेली आहे, असं दिसून आलं आहे. त्यामुळे खनिज तेलांच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या उत्सर्जनांसाठी पृथ्वी अधिकच संवेदशील असल्याचा निष्कर्ष निघतो.

तसंच या शतकात जागतिक तापमान वाढ आवाक्यात ठेवणं आणखी अवघड होणार आहे, असंही या संशोधनातून दिसून येतं.

नवीन संशोधनात काय दिसून आलं?

हरित वायूमधून बाहेर पडणाऱ्या उष्णतेपैकी 90 टक्के उष्णता ही समुद्रामध्ये शोषून घेतली जाते असं Intergovernmental Panel on Climate Change (IPCC)च्या एका व्यापक अभ्यासात दिसून आलं होतं.

पण, नवीन संशोधनानुसार, गेल्या 25 वर्षांपासून दरवर्षी जगभरात वीजनिर्मितीसाठी जितकी उर्जा लागते त्याच्या 150 पट उष्णता समुद्रात जाते. आधीच्या अंदाजापेक्षा हे प्रमाण 60 टक्के जास्त आहे.

पृथ्वी किती तापली आहे, याचा अंदाज घेण्यासाठी संशोधक आकडेवारीचा आधार घेतात. यामध्ये मानवी कृतींमुळे उत्सर्जित होणाऱ्या हरित वायूमुळे निर्माण होणाऱ्या अधिकच्या उष्णतेचा विचार केला जातो.

फोटो स्रोत, Getty Images

शास्त्रज्ज्ञांच्या आधीच्या अंदाजापेक्षा अधिक उष्णता समुद्रात शोषली जात आहे, असं नव्या संशोधनांतून दिसून येतं. याचा अर्थ असाही होती की मानवीकृतींमुळे उत्सर्जित झालेल्या हरित वायूंमुळे पूर्वीच्या अंदाजापेक्षा अधिक उष्णता निर्माण करत आहेत. शिवाय हरित वायूंचं प्रमाण तितकच असताना जास्त उष्णता निर्माण होत असेल तर पृथ्वी CO2 साठी अधिक संवेदनशील आहे, हेही दिसून येतं.

नवीन अभ्यासातून काय लक्षात येतं?

IPCCने औद्योगिकक्रांतीच्या आधीच्या तापमानापेक्षा 1.5 डिग्री सेल्सिअसने कमी तापमान ठेवण्याचे फायदे काय असतील, हे विषद केले आहेत. पण नवीन अभ्यासातून हाती आलेली आकडेवारी पाहाता पॅरीस करारातील हवामान बदलाचं उद्दिष्ट गाठणं आव्हानात्मक असणार आहे, हेही स्पष्ट झालं आहे.

"ही मोठी चिंतेची बाब आहे. आमच्या अभ्यासानुसार IPCCचं लक्ष्य गाठणं आता अधिक आव्हानात्मक आहे. कारण तापमान कमी करण्याचे सोपे मार्ग जगाने आधीच बंद केले आहेत. तापमानात होणारी वाढ 2 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाऊ नये, यासाठी कार्बनचं उत्सर्जन 25 टक्क्यांनी कमी करावं लागेल," अशी माहिती प्रिन्सटन युनिव्हर्सिटीतल्या डॉ. लौ रेस्प्लेंडी यांनी दिली.

समुद्रावर याचा काय परिणाम होऊ शकतो?

21व्या शतकाच्या अखेरपर्यंत जागतिक तापमान 1.5 किंवा 2 डिग्री सेल्सिअसने कमी करणं अशक्य ठरू शकतं. जर असं घडलं तर पृथ्वीवरील अतिरिक्त उष्णता समुद्रात शोषली जाईल. त्यामुळे समुद्राच्या पाण्याचं तापमानात वाढेल.

"गरम पाण्यात ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे सागरी जिवांवर त्याचा परिणाम होईल," रेस्प्लेंडी सांगतात.

व्हीडिओ कॅप्शन,

तापमानवाढ रोखली नाही तर 10 लाख लोकांवर ओढावेल पूरसंकट

"तापमान वाढल्यामुळे समुद्राचं पाणी प्रसरण पावेल. त्यामुळे समुद्राच्या पाण्याचा पातळीत आणखी वाढ होईल," असंही त्या म्हणाल्या.

नवीन संशोधनाचा आधार काय आहे?

या संशोधनासाठी शास्त्रज्ज्ञांनी 4,000 Argo floatsया प्रणालीचा आधार घेत जगभरातील समुद्राचं तापमान आणि त्यातील क्षारांचं प्रमाण मोजलं आहे.

याआधी समुद्राचं तापमान आणि क्षारता मोजणाऱ्या यंत्रणेत अनेक त्रुटी होत्या. आता हे अचूकपणे मोजता येणार आहे, असं शास्त्रज्ज्ञांच मत आहे.

हवेतील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणाचा आधार घेऊन समुद्राचे तापमान मोजता येणार आहे. या प्रणालीमुळे 1991पासून समुद्राच्या तापमानाची आकडेवारी मिळणार आहे.

समुद्राच्या पाण्याचं तापमान जसं वाढतं तसं त्या पाण्यातून ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. पाण्याचं तापमान वाढलं की पाण्यातील वायूंचं प्रमाण कमी होतं.

समुद्रातील उष्णता बाहेर पडली तर?

याचं उत्तर होय, असं आहे. पण यासाठी दीर्घकाळ लागणार आहे.

"आपण हरित वायूंचं प्रमाण कमी करून पृथ्वी थंड करू लागलो तर समुद्रातील उष्णता बाहेर पडू लागेल," असा रेस्प्लेंडी यांचा दावा आहे.

मुद्दा असा आहे की समुद्रातील अतिरिक्त उष्णता भरपूर प्रमाणात आहे. ती परत पृथ्वीच्या वातावरणात परत सोडली जाऊ शकते, त्यामुळे पृथ्वीचं तापमान कमी ठेवणं अजून अवघड जाणार आहे.

सुमद्राचे तापमान हे समुद्राच्या प्रवाहांनुसार कमी जास्त होते. या प्रवाहांत बदल व्हायला शेकडो वर्षं लागतात. म्हणजे, समुद्राचे अतिरिक्त तापमान बाहेर पडायला शेकडो वर्षं लागू शकतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)