'त्यांच्यासाठी आम्ही सेक्स टॉय होतो' : उ. कोरियात महिलांचा छळ

उत्तर कोरिया अधिकारी

फोटो स्रोत, HRW

जगभरातील महिला लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवत आहेत. #MeToo या मोहिमेच्या माध्यमातून अनेक महिलांनी लैंगिक शोषणाच्या घटनांबद्दल सोशल मीडियावर लिहिलं आहे. याताच उत्तर कोरियातील महिलांच्या लैंगिक शोषणांसंदर्भात Human Rights Watch (HRW)चा नवा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. उत्तर कोरियातील सरकारी अधिकारी कोणत्याही शिक्षेची तमा न बाळगता महिलांचं लैंगिक शोषण करतात, असं या अहवालात म्हटलं आहे.

इथं लैंगिक शोषणाच्या घटना इतकी सामान्य बाब आहे की, या घटना म्हणजे दैनंदिन जीवनाचा एक भागच बनल्या आहेत, असंही या अहवालात म्हटलं आहे.

उत्तर कोरियाच्या 62 व्यक्तींशी बोलून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या व्यक्तींनी देश सोडला असून त्यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या बलात्कार तसेच लैंगिक शोषणाच्या घटनांबद्दल सविस्तर महिती दिली आहे.

मनमानीपद्धतीनं होणार लैंगिक शोषण आणि दडलेल्या लैंगिक संस्कृतीचा चेहरा या अहवालाने उघड केला आहे, असं HRWचं म्हणणं आहे.

यामध्ये मुख्यत्वे पुरुषांकडून झालेल्या लैंगिक शोषणाचा समावेश आहे.

"ते आम्हाला एखाद्या खेळण्यासारखं समजतात. आम्ही त्यांच्या दयेवर जगत आहोत. कधी-कधी तर कारण नसताना आजही रात्री आम्ही रडतो, " असं 40 वर्षांच्या ओ जंग-ही यांनी या अहवालात सांगितलं आहे.

प्रत्येक बाबतीत गोपनीयता बाळगणाऱ्या उत्तर कोरियासारख्या देशातून अशी माहिती मिळवणं खूपच अवघड काम आहे आणि तिथून असे अहवाल खूपच कमी प्रमाणात येतात.

'माझं जीवन त्यांच्या हातात होतं'

"उत्तर कोरियात लैंगिक शोषण इतकी सामान्य गोष्ट झाली होती की यात काही चूक आहे, असं आम्हाला वाटत नव्हतं," असं काही महिलांनी म्हटलं आहे. लैंगिक शोषण दैनंदिन जीवनाचा एक भाग म्हणून तिथं स्वीकारलं आहे, असं काही महिलांनी सांगितलं.

लैंगिक शिक्षणाची कमी आणि अधिकारांचा चुकीचा वापर हे या मानसिकतेमागील कारण आहे, असं या अहवालात म्हटलं आहे. लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तींमध्ये उच्चपदस्थ अधिकारी, तुरुंगाचे गार्ड, पोलीस आणि सैनिकांचा समावेश आहे, असंही या अहवालात म्हटलं आहे.

फोटो स्रोत, CARL COURT

जेव्हा एखादा अधिकारी एखाद्या महिलेची निवड करत असे तेव्हा त्याचं म्हणणं ऐकण्याशिवाय त्या महिलेकडे दुसरा पर्याय नसायचा.

असं एका महिलेसोबत झालं होतं. उत्तर कोरिया सोडताना या महिलेला पकडण्यात आलं होतं आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली होती.

पार्क युंग-ही नावाच्या महिलेनं सांगितलं की, "त्यानं मला एकदम जवळ बसवलं. तो नेहमी माझ्या पायांच्या मधोमध स्पर्श करत होता. माझं जीवन त्याच्या हातात होतं, त्यामुळे त्याला हवं ते मी करत होते. याशिवाय मी काय करू शकत होते?"

फोटो स्रोत, Science Photo Library

लैंगिक शोषणाच्या घटनांवर लक्ष द्यावं आणि याला एक गुन्हा समजावं, असा सल्ला HRWनं उत्तर कोरियाला दिला आहे.

2014मध्ये आलेल्या UNच्या अहवालातही उत्तर कोरियात सरकारकडून मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचं म्हटलं आहे. उत्तर कोरियात कैदेत असताना बळजबरीनं गर्भपात, बलात्कार आणि लैंगिक शोषण केलं जातं, असंही या अहवालात म्हटलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)