जमाल खाशोग्जी हत्या : 'त्यांचा मृतदेह अॅसिडमध्ये टाकला'

खाशोग्जी

फोटो स्रोत, EPA

पत्रकार जमाल खाशोग्जी यांच्या मृतदेहाचे तुकडे केल्यावर त्यावर अॅसिड टाकण्यात आल्याचा दावा उच्चपदस्थ तुर्की अधिकाऱ्यानं केला आहे.

यासिन अॅक्टे म्हणाले की, इस्तंबूलमध्ये जमाल यांना ठार करण्यात आल्यावर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. त्याचा कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून हाच एकमेव तर्क आहे.

खाशोग्जी हे सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांचे टीकाकार होते. गेल्या वर्षापासून ते अमेरिकेत राहत होते. ते वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रासाठी स्तंभलेखन करायचे. 2 ऑक्टोबरला त्यांना इस्तंबूलमध्ये शेवटचं पाहण्यात आलं होतं.

मैत्रिणीबरोबर त्यांचं लग्न ठरलं होतं. त्याविषयीच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ते सौदी अरेबियाच्या दुतावासात गेले होते. तिथेच त्यांना ठार करण्यात आलं.

अर्थात, त्यांचा मृतदेह अॅसीडमध्ये टाकण्यात आला यास कोणताही फॉरेन्सिक पुरावा देण्यात आलेला नाही.

"खाशोग्जी यांच्या मृतदेहाचा काहीच थांगपत्ता लागू नये म्हणून तो अॅसीडमध्ये टाकण्यात आला," असं अॅक्टे म्हणाले. तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचे अॅक्टे हे सल्लागार आहेत. त्यांनी हुरिएत डेली या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे.

"त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले आणि मग तो नष्ट करण्यात आला," असं अॅक्टे यांचं म्हणणं आहे.

युवराज काय म्हणाले?

दरम्यान, पत्रकार जमाल खाशोग्जी हे एक धोकादायक इस्लामवादी व्यक्तिमत्त्व होतं, असं युवराज सलमान यांनी अमेरिकेला सांगितल्याचा दावा अमेरिकेतल्या माध्यमांनी केला आहे.

खाशोग्जी यांची हत्या झाल्याचं सौदी अरेबियानं मान्य करण्यापूर्वी युवराज सलमान यांनी व्हाईट हाउसमध्ये फोन केला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)