मौलाना समी उल हक : तालिबानच्या 'गॉडफादर'ची पाकिस्तानात हत्या

मौलाना समी उल हक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

मौलाना समी उल हक

पाकिस्तानमधल्या जमियत उलेमा-ए-इस्लाम या शाखेचे प्रमुख मौलाना समी उल हक यांची रावळपिंडीमधल्या घरी शुक्रवारी सायंकाळी हत्या करण्यात आली.

मौलाना समी उल हक यांना पाकिस्तानमधल्या तालिबानचा जनक मानलं जातं. ते एक महत्त्वाचे धर्मगुरू होते; त्यांनी अनेक तालिबानी तरुणांना प्रशिक्षण दिलं.

रावळपिंडी पोलिसांनी बीबीसी उर्दूचे प्रतिनिधी शहझाद मलिक यांना सांगितलं की, समी उल हक यांच्यावर त्यांच्या रावळपिंडीतल्या घरी हल्ला झाला.

त्याचं घर रावळपिंडीतल्या बहरिया टाऊन सफारी वन व्हिला परिसरात आहे.

मौलाना समी यांचा नातू अब्दुल हक यांनी माध्यमांना सांगितलं की, अज्ञात हल्लेखोरानं त्यांच्यावर सुऱ्यानं वार केला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

त्यावेळी मौलाना घरात एकटेच होते. त्यांचे सुरक्षारक्षक आणि वाहनचालक १५ मिनिटांसाठी घराबाहेर गेले होते. त्याच काळात हा हल्ला झाला. ते घरी परतले तेव्हा मौलाना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.

मौलाना यांना ईशनिंदा कायद्याच्या बाबत सुरू असल्लेल्या आंदोलनात सहभागी होण्याची इच्छा होती. पण रस्ते बंद असल्याने ते बाहेर पडू शकले नाहीत, असं अब्दुल हक यांनी सांगितलं.

पोलिसांनी मौलाना यांचे चालक आणि सुरक्षारक्षक यांची चौकशी सुरू केली आहे. कारण ते कधीही मौलाना यांना एकटं सोडत नसत.

मौलाना यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर आबपरा भागात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

तालिबानचे रुहानी नेता

  • मौलाना समी उल हक 80 वर्षांचे होते.
  • 1988 पासून ते दारूल उलून हक्कानियाचे अध्यक्ष होते. याच मदरशात हजारो तालिबान मुलांना इस्लामचं प्रशिक्षण दिलं जातं.
  • मौलाना यांनी मुल्ला ओमर याला त्यांचा सर्वोत्तम शिष्य म्हटलं होतं.
  • मौलाना दोन वेळा पाक संसदेत निवडून गेले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)