पाकिस्तान : आसिया बिबींच्या वकिलाने जीव वाचवण्यासाठी देश सोडला

आसिया बिबी

फोटो स्रोत, ASIA BIBI

फोटो कॅप्शन,

आसिया बिबी

पाकिस्तानमधल्या ईशनिंदा खटल्यात आसिया बिबी यांची बाजू मांडणारे वकील सैफ मुलुक यांनी जीवाच्या भीतीनं देश सोडला आहे.

एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना मुलुक म्हणाले की, "आसिया बिबीची बाजू मांडण्यासाठी मला जगणं आवश्यक आहे. म्हणूनच मी पाकिस्तान सोडतो आहे."

"सरकारनं घेतलेला निर्णय दुर्देवी आहे. ते देशात सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अमलबजावणीही करू शकत नाहीत,"असं मुलुक यांनी देशाबाहेर पडण्यापूर्वी एएफपीला सांगितलं.

दरम्यान, पाकिस्तान सरकार आणि आसिया बिबी यांच्या निर्दोष मुक्ततेचा विरोध करणारे आंदोलक यांच्यात समझोता झाला आहे. यानुसार आंदोलक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध अपील करू शकणार आहेत, तर आसिया बिबी यांना तुर्तास पाकिस्तान सोडण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे.

आसिया बिबींवरील हे निर्बंध किती दिवस असतील, हे स्पष्ट झालेलं नाही. तसंच, त्यांचा सध्याचा ठावठिकाणाही माहिती नाही.

प्रेषित मोहम्मद यांची निंदा केल्याच्या आरोपावरून आसिया बिबी यांना 2010ला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाकिस्तानातील सुप्रीम कोर्टाने बुधवारी त्यांची निर्दोष मुक्तता केली. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाविरुद्ध पाकिस्तानातील कट्टरपंथी रस्त्यावर उतरले होते.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

आसिया बीबी यांचे वकील सैफ उल मुलुक

पाकिस्तानचे माहिती खात्याचे मंत्री फवाद चौधरी म्हणाले, "आमच्याकडे दोन पर्याय होते एक म्हणजे बळाचा वापर करा, दुसरा म्हणजे चर्चा करा. बळाचा वापर केला असता तर लोक मारले गेले असते. कोणत्याही सरकारला हे नको असतं. आम्ही चर्चा केली. चर्चेत काही मिळवण्यासाठी काही गमवावं लागतं."

ते म्हणाले, "कट्टरतावादाविरुद्ध पावलं उचलावी लागतील. अशा प्रकारच्या हिंसक निदर्शनांविरुद्ध कायमचा उपाय शोधावा लागेल. आम्ही जे करत आहोत ती तातडीची उपाय योजना आहे. या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे."

आसिया बिबींना देश सोडायला बंदी घालण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचं पालन होईल तसेच त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, असे ते म्हणाले.

समझोता काय आहे?

या आंदोलनाचे नेतृत्व करणारा तहरीक-ए-लबैक या पक्षाचे प्रतिनिधी आणि सरकार यांच्यात ही तडजोड झाली. यानुसार सरकार आसिया बिबींवर देश सोडून जाण्यास निर्बंध घातले जातील. तसेच आंदोलकांनी सुप्रीम कोर्टात अपील दाखल केले तर सरकार ते थांबवण्याचे प्रयत्न करणार नाही.

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES

या आंदोलनात ज्यांना अटक झाली त्यांची मुक्तता केली जाईल आणि त्यांच्यावर हिंसा झाली असेल तर त्याची चौकशी केली जाईल. तर तहरीक-ए-लबैक पक्ष आंदोलन मागे घेईल.

आशिया बिबींनी या आठवड्यात मुक्त केलं जाणार होतं. त्यांचे वकील सैफूल मुलूक यांनी त्यांना सुरक्षेसाठी पाश्चात्य देशात जावं लागेल, असं सांगितलं होतं. अनेक देशांनी त्यांना आश्रय देण्याची तयारी दर्शवली आहे.

काय आहे प्रकरण ?

लाहोरजवळच्या शेखूरपुरामध्ये आसिया आणि इतर महिलांमध्ये एक बादली पाण्यावरून भांडण झालं. ही घटना 2009 सालची आहे.

आसियांनी त्या पाण्याला स्पर्श केल्यामुळे इतरांचा धर्म भ्रष्ट झाला असा आरोप या महिलांनी केला. आसिया ख्रिश्चन तर इतर महिला मुस्लीम आहेत.

फोटो स्रोत, Reuters

या महिलांनी पुढे आग्रह धरला की आसियांनी इस्लाम धर्म स्वीकारावा. त्यानंतर आसियांनी प्रेषित मोहम्मदांबद्दल तीन अपमानास्पद शब्दं काढले, असा महिलांचा आरोप आहे.

या महिलांनी आसियांना चोप दिल्यानंतर आसियांनी ईशनिंदेची कबुली दिली, असा महिलांचा दावा आहे. पोलीस तपासानंतर आसियांना अटक करण्यात आली.

मी रागावून शेजाऱ्यांशी बोलले, पण ईशनिंदा केली नाही आणि कबुलीही दिली नाही, असा आसियांचा दावा आहे.

या केसवर एवढ्या संमिश्र प्रतिक्रिया का?

इस्लाम हा पाकिस्तानचा राष्ट्रीय धर्म आहे आणि इस्लाम पाकिस्तानातील न्यायव्यवस्थेचा गाभा आहे. त्यामुळे ईशनिंदेला कठोर शिक्षेची तरतूद आहे आणि या तरतुदीला लोकांचा पाठिंबा आहे.

मतं मिळवण्यासाठी कट्टरवादी नेते कठोर कारवाईचं नेहमी समर्थन करत आले आहेत. तर वैयक्तिक प्रकरणांत सूड घेण्यासाठी या कायद्याचा वापर होण्याची उदाहरणं आहेत, असं टीकाकारांचं मत आहे.

फोटो स्रोत, AFP

या कायद्यात सुरुवातीला मुस्लीम आणि अहमदिया पंथातील लोकांना शिक्षा झाली. पण 1990नंतर अनेक ख्रिस्ती लोकांना या कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये ख्रिश्चनांची लोकसंख्या 1.6 टक्के आहे.

गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानतल्या ख्रिश्चन समुदायाला लक्ष केलं जात आहे.

1990पासून ईश्वरनिंदेच्या आरोपावरून जवळजवळ 65 लोकांची हत्या झाली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)