अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये भारतीय वंशाच्या उमेदवारांचा बोलबाला

मतदान

अमेरिकेत सध्या मध्यावधी निवडणुका होत आहेत. अमेरिकी काँग्रेसच्या काही जागांसाठी मतदान होणार असून त्या निवडणुकांमध्ये भारतीय वंशाचे काही उमेदवार आपलं नशीब आजमवत आहेत.

डेमोक्रेटिक पक्षाने 12 भारतीय वंशाच्या उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीची चर्चा अमेरिकेतही होत आहे. त्यांना तगडे प्रतिस्पर्धी समजलं जात आहे.

या निवडणुकांवर डोनाल्ड ट्रंप यांचं भविष्य अवलंबून आहे असं म्हटलं जात आहे. डोनाल्ड ट्रंप हे रिपब्लिकन पक्षाचे आहेत आणि सध्या सिनेटमध्ये याच पक्षाचं बहुमत आहे.

आपल्याकडे जशी राज्यसभा असते तसं तिथं सिनेट हे सभागृह आहे. जर या निवडणुकांमध्ये सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला बहुमत मिळालं तर ट्रंप यांच्यावर महाभियोगही दाखल केला जाऊ शकतो. पण जर रिपब्लिकन पक्षाला बहुमत मिळालं तर ट्रंप यांच्या धोरणांना पाठबळ मिळू शकतं.

रिपब्लिकन पक्षाकडे 51 तर डेमोक्रॅटिक पक्षाकडे 49 जागा आहेत. सिनेटच्या एक तृतीयांश जागांसाठी मध्यावधी निवडणुका होत आहेत.

अमेरिकेच्या दुसऱ्या सभागृहाला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतात. या सभागृहात 240 सदस्य रिपब्लकिनचे तर 195 डेमोक्रॅटिक पक्षाचे आहेत.

विद्यमान राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांना पायउतार करण्यासाठी विरोधी पक्ष सरसावला आहे. मात्र त्यासाठी सभागृहातल्या सदस्यांची मंजुरी लागते. अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत असं घडलेले नाही.

भारतीय वंशाच्या या उमेदवारांना समोसा ब्रिगेड असं म्हटलं जातं. कोण आहेत ही मंडळी, जाणून घेऊया. सध्या अमेरिकी प्रतिनिधीगृहामध्ये चार तर सिनेटमध्ये एकमेव भारतीय वंशाचे प्रतिनिधी आहेत.

अमी बेरा, प्रमिला जयपाल, राजा कृष्णमुर्ती, रो खन्ना आणि कमला हॅरिस हे पाचही जण पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

1. अमी बेरा

गुजरातमधल्या राजकोट शहराची पार्श्वभूमी असणारे अमी बेरा व्यवसायाने डॉक्टर आहेत. कॅलिफोर्नियातल्या सातव्या जिल्ह्याचे ते प्रतिनिधी आहेत. अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये प्रतिनिधित्व करणारे बेरा हे भारतीय वंशाचे सगळ्यात जुने प्रतिनिधी आहेत.

फोटो स्रोत, Tom Williams

2. प्रमिला जयपाल

हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह सदनात निवडून आलेल्या इंडो-अमेरिकन वंशाच्या त्या पहिल्याच महिला प्रतिनिधी आहेत.

राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी त्या नागरी हक्कांसाठी काम करत होत्या. स्थलांतरितांसाठी काम करणाऱ्या एका गटाशी त्या संलग्न आहेत. 2001 मध्ये अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रमिला यांनी हेट फ्री झोन या संस्थेची स्थापना केली.

फोटो स्रोत, Pramila jaipal

सोमालियाच्या 4,000 स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्यासंदर्भात तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश प्रशासनाच्या निर्णयाविरोधात प्रमिला यांनी यशस्वी लढा दिला होता. चेन्नईत जन्म झालेल्या प्रमिला यांचं बालपण इंडोनेशिया आणि सिंगापूर इथे गेलं आहे. वयाच्या 16व्या वर्षी त्या अमेरिकेत गेल्या.

3. राजा कृष्णमूर्ती

दिल्लीत जन्मलेले राजा यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं आहे. राजा हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रचार मोहिमेचा एक भाग होते.

राजा यांच्या ध्येयधोरणात मध्यमवर्ग केंद्रस्थानी आहे. सामाजिक सुरक्षा, आरोग्यव्यवस्था या मुद्यांवर त्यांनी भर दिला आहे. मुलांना जन्म द्यायचा की नाही हा निर्णय महिलांचा आहे असं ते मानतात आणि याबाबतीतल्या महिलांच्या स्वातंत्र्याचे ते ठाम पुरस्कर्ते आहेत.

राजा यांची InSPIRE नावाची संस्था आहे जी सौरऊर्जा तंत्रज्ञानासंदर्भात काम करते.

4. रो खन्ना

रो उर्फ रोहित खन्ना वकील आहेत. बौद्धिक संपदा हक्क हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. त्यांचे आईवडील पंजाबचे आहेत. खन्ना यांनी 'Entrepreneurial Nation: Why Manufacturing is Still Key to America's Future ' हे पुस्तक लिहिलं आहे.

2012 मध्ये खन्ना यांची कॅलिफोर्नियाच्या वर्कफोर्स इन्व्हेस्टमेंट बोर्डावर नियुक्ती झाली होती. पाणी संवर्धन आणि वीजेचा वापर कमी व्हावा यासाठी काम करणाऱ्या स्मार्ट युटिलिटी सिस्टम्स कंपनीचे खन्ना उपाध्यक्ष आहेत.

5. हिरल तिपिर्नेनी

हिरल यांचा जन्म मुंबईचा आहे. त्या तीन वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंबीय अमेरिकेतील क्लिव्हलँड, ओहिओ येथे स्थायिक झालं. हिरल यांनी नॉर्थइस्ट ओहिओ मेडिकल युनिव्हर्सिटीतून डॉक्टर ऑफ मेडिसिनची डिग्री घेतली.

'कॅन्सर रिसर्च अडव्होकेट' म्हणून मॅरिकोपा हेल्थ फाऊंडेशनसाठी त्या गेली 10 वर्ष कार्यरत आहेत.

फोटो स्रोत, US Congress website

6. कमला हॅरिस

जमैकाचे डोनाल्ड हॅरिस आणि भारतीय श्यामला गोपाळन यांच्या कमला या कन्या आहेत.

राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयात त्यांनी शिक्षण घेतलं. त्यानंतर हेस्टिंग्ज कॉलेज ऑफ लॉ मधून त्यांनी ज्युरिस डॉक्टर अर्थात डॉक्टर ऑफ ज्युरिसप्रुडेन्स ही डिग्री प्राप्त केली.

राजकारणात प्रदीर्घ काळ सक्रिय असणाऱ्या कमला यांनी कॅलिफोर्नियाच्या अटर्नी जनरल म्हणूनही काम केलं आहे. गंभीर गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा देण्यास त्यांनी विरोध केला होता. अमेरिकेतल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनांमध्ये घट होण्यासाठी बंदुकीच्या वापरावर नियंत्रण असण्याच्या भूमिकेचं त्यांनी समर्थन केलं आहे.

7. अनिता मलिक

हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये अॅरिझोनाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अनिता यांनी एका कंटेट मॅनेजमेंट कंपनीचं चीफ ऑपरेटिंग ऑफिसर हे पद सोडलं.

अमेरिकेतल्या कन्सास शहरात अनिता यांचा जन्म झाला. त्या सात वर्षांच्या असताना त्यांच्या पालकांनी अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

संगणक विज्ञान आणि अर्थशास्त्रात पदवीचं शिक्षण घेतलेल्या अनिता यांनी पत्रकारितेत पदव्युतर शिक्षण घेतलं. 2004 मध्ये इस्टवेस्ट मॅगझिन त्यांनी सुरू केलं. बहुसांस्कृतिक अमेरिका हे अनिता यांचं स्वप्न आहे.

फोटो स्रोत, US Congress website

8. श्री प्रेस्टन कुलकर्णी

भारतीय कादंबरीकार व्यंकटेश कुलकर्णी आणि अमेरिकेच्या मार्गारेट प्रेस्टन यांचे चिरंजीव श्री प्रेस्टन कुलकर्णी. कुलकर्णी अमेरिकेचे मुत्सदी अधिकारी म्हणून 14 वर्ष कार्यरत होते.

या कामाचा भाग म्हणून त्यांनी इराक, रशिया, इस्र्यायल, तैवान आणि जमैकामध्ये काम केलं. सिनेट आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीतील सिनेटर कर्स्टन गिलीब्रँड यांच्यासाठी परराष्ट्र धोरणांचे सल्लागार म्हणून प्रेस्टन यांनी काम केलं.

कुलकर्णी यांना इंग्रजी, स्पॅनिश, हिंदी, मँडरिन, रशियन आणि हिब्रू या भाषा येतात. टेक्सास भागातून ते रिंगणात आहेत.

9. आफ्ताब पुरेवल

आफ्ताब पुरेवल हे हॅमिल्टन कंट्री क्लर्क ऑफ कोर्ट्स आहेत. हे पद भूषणवणारे ते गेल्या शंभर वर्षांतील पहिले डेमोक्रॅट आहेत अशी माहिती त्यांच्या वेबसाइटवर आहे. त्यांनी सरकारी कामांमध्ये पारदर्शकता आणली आणि त्यातून त्यांनी सरकारचे 9 लाख डॉलर्स वाचवले असं वेबसाईटवर म्हटलं आहे. ते ओहियोतून निवडणूक लढवत आहेत.

10. संजय पटेल

फ्लोरिडातून नशीब आजमावणाऱ्या संजय यांच्याकडे तंत्रज्ञान, स्ट्रॅटेजी आणि प्रोजेक्ट मॅनजमेंटचा दोन दशकांचा अनुभव आहे. स्वत:चा बिझनेस सांभाळणाऱ्या संजय यांनी एका स्वयंसेवी संस्थेचीही स्थापना केली होती.

मात्र आता ते राजकीय चळवळ प्रक्रियेत सक्रिय आहेत. समाधानकारक वेतन, सर्वसमावेशक आरोग्य यंत्रणा आणि शिक्षणात सुधारणा या मुद्दांवर ते निवडणूक लढवत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)