इराकमध्ये ISच्या ताब्यातील शहरांत 200 सामूहिक कबरींमध्ये 12 हजार मृतदेह

सामूहिक कबरी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा इराकमध्ये यापूर्वीही सामूहिक कबरी मिळाल्या आहेत.

इराकमधील एका प्रदेशात 200 सामूहिक कबरी सापडल्या आहेत. या कबरींमध्ये हजारो मृतदेह सापडले आहेत. या प्रदेश इस्लामिक स्टेट्च्या ताब्यात होता.

संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या तपासात या कबरी सापडल्या.

या कबरींमध्ये जवळपास 12000 लोकांचे मृतदेह असण्याची शक्यता संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे.

2014मध्ये इराकच्या बऱ्याच भागावर इस्लामिक स्टेटने ताबा मिळवला होता. विरोध करतील त्या सर्वांना मारून टाकण्याचा सपाटा इस्लामिक स्टेटने लावला होता.

अमेरिका, इराक आणि मित्रराष्ट्रांच्या फौजांसमोर इस्लामिक स्टेटचा पाडाव झाला. सध्या इराकमधील फारच कमी भूप्रदेश इस्लामिक स्टेटच्या ताब्यात आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे की, आतापर्यंत 212 सामूहिक कबरी मिळून आल्या आहेत. त्यातील 95 कबरी निनेवाहत, 37 किरकूकमध्ये आणि 36 कबरी सलाह अल-दिनमध्ये आणि 24 कबरी अनबारमध्ये मिळाल्या आहेत.

या कबरींमध्ये महिला, वृद्ध, अपंग, परदेशी नागरिक, इराकचे सैनिक आणि मुलांचे मृतदेहही मिळाले आहेत.

इराकमधील संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी असलेले जान कुबीस म्हणाले, "आमच्या अहवालातून या प्रदेशांतील वेदना, कौर्य दिसून येतं. ज्या कुटुंबाचा याचा फटका बसला त्यांना न्याय मिळण्यासाठीही एक पायरी आहे."

जे बेपत्ता आहेत, त्यांना भेडसावत असलेल्या समस्या यातून दिसल्या आहेत.

इस्लामिक स्टेटने 2014ला इराकच्या मोठ्या भूभागावर कब्जा केला. 2017मध्ये इराकच्या पंतप्रधानांनी इस्लामिक स्टेट विरुद्धचं युद्ध संपल्याची घोषणा केली.

हेही वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)