प्रेयसीसाठी गरोदर बायको, दोन मुलींचा खून केल्याचा नवऱ्यावर आरोप

प्रेयसी Image copyright Getty Images

गरोदर बायको आणि दोन मुलींचा खून केल्याची कबुली पतीनं दिल्याची धक्कादायक घटना अमेरिकेतील कोलोरॅडो शहरात घडली आहे. ख्रिस वॅट्स असं या व्यक्तीचं नाव आहे.

वॅट्स यांनी त्यांच्यावरील नऊ आरोपांची कबुली दिल्यानं न्यायालयानं फाशीची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

34 वर्षीय शॅनॉन वॉट्स 15 आठवड्यांच्या गरोदर होत्या. ख्रिस आणि शॅनॉन दांपत्याच्या सेलेस्ट (3) आणि बेला (4) या दोन मुली होत्या. या तिघीजणी ऑगस्ट महिन्यापासून गायब होत्या.

ख्रिसवर खून, मृतदेहांची विटंबना तसंच बेकायदेशीर पद्धतीने गर्भ पाडून टाकण्याचे आरोप होते.

ख्रिसच्या दाव्यानुसार, त्यानं आपल्या अफेयरची कबुली पत्नीला दिली होती. हे समजल्यावर तिनं एका मुलीला मारून टाकलं असं ख्रिसनं न्यायालयासमोर सांगितलं होतं. त्याने पत्नीवर हल्ला केला तेव्हा ती दुसऱ्या मुलीला मारत होती असा दावा ख्रिसनं केला.

19 नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीवेळी वॉट्स याला आता सलग तीन जन्मठेपांची शिक्षा सुनावली जाऊ शकते.

Image copyright Shanainn watts/Insta
प्रतिमा मथळा ख्रिस, शॅनॉन आणि दोन मुली

'खटल्याची सुनावणी पूर्ण होण्यासाठी लागलेल्या विलंबामुळे शॅनॉन यांच्या कुटुंबीयांनी ख्रिस याला फाशीच व्हावी हा आग्रह सोडून दिला', असं जिल्ह्याच्या अटॉर्नी मायकेल रुके यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

वॉट्स कुटुंबीयांची भूमिका या खटल्याच्या सुनावणीत महत्त्वाची आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ऑगस्ट महिन्यात पत्नी आणि मुलं बेपत्ता झाल्यानंतर ख्रिसने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. मुलींसह ती सुरक्षित असेल असं विधान ख्रिसनं त्यावेळी केलं होतं.

त्यानंतर 24 तासांच्या आत पोलिसांनी ख्रिसला अटक केली होती.

काय झालं होतं नक्की?

शॅनॉन यांचा मृतदेह ख्रिस काम करत असलेल्या पेट्रोलियम कंपनीच्या परिसरातील एका तेलसाठ्याजवळच्या परिसरात आढळला होता. बेला आणि सेलस्टी या दोन मुलींचे मृतदेह त्यांच्या आईचा मृतदेह सापडला त्याठिकाणीच आढळले.

न्यायालयाला सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ख्रिस यांचं ऑफिसातीलच एका सहकारी महिलेबरोबर प्रेमप्रकरण होतं. पोलिसांना जवाब देताना मात्र ख्रिसने या गोष्टीचा इन्कार केला होता.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ख्रिस वॉट्स याने गरोदर पत्नी आणि दोन मुलींचा खून केल्याची कबुली दिली आहे.

'या दोन्ही मुली माझं जग आहे. माझं त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे. त्या किती वेगाने मोठ्या होत आहेत', असं शॅनॉन यांनी एका इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं होतं.

इन्स्टाग्रामवरच शॅनॉन यांनी पती ख्रिस यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. 'माझ्या आयुष्यात ख्रिसला आणल्याबद्दल देवाचे आभार. तो माझा सर्वोत्तम समर्थक आहे. तो आमच्या मुलींचा खंबीर बाप आहे. नवरा म्हणूनही तो भारी आहे', असं शॅनॉन यांनी म्हटलं होतं.

आपण विभक्त होऊया असं पत्नी शॅनॉन यांना ख्रिसने सांगितलं होतं. घटस्फोटाच्या प्रक्रियेसाठी मी पुढाकार घेईन असं ख्रिसने प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं. पत्नीबरोबरचं संभाषण नेहमीसारखं होतं आणि आम्ही भांडत नव्हतो असा दावाही ख्रिसने केला.

Image copyright Insta
प्रतिमा मथळा शॅनॉन यांची इन्स्टा पोस्ट

त्यानंतर बेला पलंगावर गतप्राण स्थितीत दिसल्याचं ख्रिसने न्यायालयाला सांगितलं. शॅनॉन दुसरी मुलगी सेलस्टी हिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा ख्रिसनं केला. हे पाहून रागाच्या भरात शॅनॉनची गळा दाबून हत्या केली असं ख्रिसनं मान्य केलं.

तिन्ही मृतदेह ऑफिसच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रकमध्ये भरून तेलसाठ्यांच्या दिशेने गेल्याचं ख्रिसने सांगितलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये शॅनॉन न आल्यानं एका मित्रानं विचारणा केली. गॅरेजमध्ये शॅनॉन यांची गाडी आणि त्यात लहान मुलींसाठी बसण्याची व्यवस्था होती.

त्या मैत्रिणीने ख्रिसला फोन करून घरी येण्यास सांगितलं. शॅनॉन यांना त्वचेचा एक आजार असल्यानं आजारी असतील असं मैत्रिणीला वाटलं. ख्रिस घरी परतण्याआधीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

Image copyright Instagram
प्रतिमा मथळा शॅनॉन यांची इन्स्टा पोस्ट

शॅनॉन यांची हँडबॅग स्वयंपाकघरात आढळली. पोलिसांनी घराची झडती घेतली मात्र आक्षेपार्ह काहीच आढळलं नसल्याचं पोलिसांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं.

माझी बायको आणि मुली सुरक्षित असतील. त्या सुखरुप घरी परत याव्यात एवढीच इच्छा आहे, असं ख्रिसनं जाहीर आवाहनात म्हटलं होतं.

काही दिवसांतच ख्रिसने हत्याकांडाची कबुली दिल्याने शॅनॉन यांच्या घरच्यांसह मित्रमैत्रिणी आणि आप्तेष्टांना जबर धक्का बसला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)