ओझोन : पृथ्वीचं सुरक्षा कवच होत आहे पूर्ववत, पण...

पृथ्वी

फोटो स्रोत, Getty Images

पृथ्वीचं सुरक्षा कवच असलेलं आणि धोकादायक अतिनील किरणांपासून बचाव करणारा ओझोनचा थर पूर्ववत होत आहे. 1985मध्ये ओझोनच्या थराला छिद्र पडल्याच लक्षात आलं होतं. नव्या संशोधनातून ओझोनचा थर पूर्ववत होत असल्याचं दिसून आलं आहे. 2030पर्यंत उत्तर गोलार्धावरील आणि 2060पर्यंत अंटार्क्टिकावरील ओझोनच्या थरातील छिद्र पूर्णपणे बुजतील.

संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्या नव्या अहवालात जागतिक पातळीवरील प्रयत्न काय करू शकतात, हे यातून दिसून येतं असं म्हटलं आहे. मानवनिर्मित क्लोरोफ्लुरो कार्बनमुळे ओझोनच्या थराचं नुकसान झालं होतं.

ओझोन वायूचा थर पृथ्वीपासून 6 मैल अंतरावर आहे. रंगहीन असलेला हा वायू ऑक्सिजनच्या विशिष्ट रेणूंपासून बनला आहे. सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून ते पृथ्वीचं रक्षण करत. या किरणांमुळे त्वचेचा कॅन्सर, डोळ्यांचे आजार तसेच पिकांचं नुकसान होऊ शकतं.

Chlorofluorocarbons (CFCs) मुळे या थराचं नुकसान होत होतं. फ्रिज, एअर कंडिशनर, फोम आदींमध्ये Chlorofluorocarbons असतो. 1985मध्ये दक्षिण ध्रुवावर ओझोनच्या थराला मोठं छिद्र पडल्याचं दिसून आलं होतं. 1990च्या दशकात जवळपास ओझोनच्या थरात 10 टक्के घट झाल्याचं दिसलं होतं.

त्यानंतर Montreal Protocol हा करार आकाराला आला. यामध्ये उद्योगांनी पर्याय शोधण्याचं मान्य केलं. 180 देशांनी या करारावर सह्या केल्या होत्या. या देशांनी Chlorofluorocarbonsच्या वापरावर निर्बंध घालण्याचं मान्य केलं. 2000पासून दर दशकात 3 टक्के इतकी ओझोनमध्ये सुधारणा झाली.

पण ओझोनमध्ये सध्या झालेली सुधारणा म्हणजे पूर्ण यश नाही, असं युनिव्हर्सिटी ऑफ कोलरॅडोचे प्रा. ब्रायन टून यांनी सांगितलं. ते म्हणाले, "आता कुठं ओझोन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. बराच असा भाग आहे, जिथला ओझोनचा थर अजून दुरुस्त व्हायचा आहे."

फोटो स्रोत, NASA/SCIENCE PHOTO LIBRARY

फोटो कॅप्शन,

2000मध्ये अंटार्क्टिकावरील ओझोनचे छायचित्र

क्लोरिन असलेल्या काही रसायनांच्या उत्सर्जनांमुळे ओझोनमध्ये होत असलेल्या या सुधारणेला खीळ बसू शकते असंही संशोधकांना वाटतं.

नासामधील Goddard Space Flight Centreमधील संशोधक आणि या अहवालावर काम करणारे पॉल न्यूमन यांनी ओझोनमधील सुधारणा उत्साहवर्धक असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)