ख्वाकीन अल चॅपो गझमन: ड्रग्ज तस्करांच्या अब्जाधीश गॉडफादरला जन्मठेप

ख्वाकीन अल चॅपो गझमन Image copyright EPA
प्रतिमा मथळा ख्वाकीन अल चॅपो गझमन

मेक्सिकोचा कुख्यात ड्रग माफिया ख्वाकीन 'अल चॅपो' गझमन याला अमेरिकेच्या एका कोर्टाने जन्मठेप आणि 30 वर्षांची अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे.

मेक्सिकोमध्ये दोन वेळा पोलिसांना गुंगारा देऊन तुरुंगातून पळून गेलेला अल चॅपो पोलिसांच्या हाती लागल्यानंतर अखेर त्याची रवानगी अमेरिकेत करण्यात आली होती. तेव्हापासून तो "आधुनिक काळातला सर्वांत कुख्यात गुन्हेगार" म्हणून ओळखला जाऊ लागला.

अमेरिकेचे पोलीस 20 वर्षांपासून त्याच्या मागावर होते. इतकंच नाही तर शिकागो क्राईम कमिशनने सर्वांत कुख्यात गुन्हेगारांची जी पहिली यादी बनवली त्यात अल चॅपोचा क्रमांक सर्वात वर होता. त्याला पब्लिक एनिमी नंबर 1 म्हणण्यात आलं आहे.

त्याच्या हस्तांतरणाच्या जवळपास दोन वर्षांनंतर आता हा खटला सुरू झालेला आहे. सिनालोआ कार्टल या गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख असल्याचा आणि 14 अब्ज डॉलर्सचे अंमली पदार्थ, ज्यात कोकेन आणि हिरोईन यांचाही समावेश आहे, अमेरिकेत तस्कारी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

गुन्हेगारी, हिंसाचार, हत्या आणि विध्वंस करण्यातच आयुष्य घालवलेल्या या 61 वर्षांच्या कैद्याला त्याचं उरलेलं आयुष्य अमेरिकेतल्या सर्वाधिक सुरक्षा असलेल्या तुरुंगात घालवावं लागेल, यासाठीचे पुरेसे पुरावे आपल्या हाती असल्याचा अमेरिकी सरकारी वकिलांचा दावा आहे.

अल चॅपो म्हणजेच बुटका हे टोपण नाव असलेल्या ज्योकीनविरोधात अकरा गुन्हे दाखल आहेत. त्यात अंमली पदार्थांची तस्करी, अवैधपणे बंदूक बाळगणे आणि पैशांची अफरातफर यांचा समावेश आहे. त्यानं आपण दोषी नसल्याचं म्हटलं आहे.

हा खटला चार महिन्यात निकाली निघेल, असा अंदाज आहे. सोमवारपासून खटल्याच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली आहे. सोमवारी न्यायमूर्तींची निवड करण्यात आली तर मंगळवारी पहिली सुनावणी झाली.

अल चॅपोचा हा खटला वैशिष्ट्यपूर्ण असण्यामागे चार कारणं आहेत.

1. पैसा

अल चॅपोवर पैशाची अफरातफर केल्याचा आरोप आहे आणि त्याची 14 अब्ज डॉलरची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश कोर्टाने द्यावे, अशी सरकारी वकिलांची मागणी आहे. यात कार्टल चालवण्यासाठी लागणारा खर्च गृहित धरलेला नाही, असं काही विश्लेषकांना वाटतं.

2009 साली फोर्ब्स मासिकानुसार अल चॅपोची संपत्ती 1 अब्ज डॉलर होती. शिवाय सिनालोआ कार्टलकडून त्याला दरवर्षी तीन अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त महसूल मिळायचा.

Image copyright AFP

त्याकाळी मेक्सिकोतून अमेरिकेत होणाऱ्या अंमली पदार्थांच्या एकूण तस्करीपैकी तब्बल 25% तस्करी याच कार्टलकडून व्हायची.

अल चॅपोमुळे हेरोईन, कोकेन, अफू आणि मेथामफेटामिन यांसारख्या अंमली पदार्थांची जगभरात मोठ्या प्रमाणावर तस्करी होऊ लागली, असंही सरकारी वकिलांचं म्हणणं आहे.

2. आरोप

एल चॅपोविरोधातला हा खटला अंमली पदार्थांच्या अमेरिकी इतिहासातला सर्वांत मोठा खटला मानला जात आहे.

या खटल्यात सरकारी वकील हजारो कागदपत्रं, फोटो आणि जवळपास एक लाख सतरा हजार ऑडियो रेकॉर्डिंग्ज सादर करणार आहेत. जवळपास 33 हत्यांमध्ये त्याचा हात असल्याचे आरोप आहेत.

मात्र एकूण किती हत्यांमध्ये अल चॅपोचा हात आहे, याची नेमकी आकडेवारी वकिलांनी सादर करावी, असे आदेश न्यायमूर्ती ब्रायन कोगन यांनी प्राथमिक सुनावणीत दिले होते.

न्यूयॉर्क टाईम्सनुसार न्या. कोगन म्हणाले, "हा अंमली पदार्थ तस्करीचा खटला आहे. ज्यात हत्याही झाल्या आहेत. त्यामुळे मी अंमली पदार्थांचा समावेश असलेला हत्येचा खटला म्हणून याची सुनावणी होऊ देणार नाही."

Image copyright AFP/GETTY IMAGES

या सुनावणीला वारंवार विलंब होत गेला. सरकारी वकिलांनी चौदा हजार पानांचे पुरावे दिले आहेत. त्यामुळे ही सुनावणी आणखी पुढे ढकलण्याला न्यायमूर्तींनी गेल्याच आठवड्यात नकार दिला होता. मात्र एवढ्या पुराव्यांची पडताळणी करणं अशक्य असल्याचं बचाव पक्षाचं म्हणणं आहे.

सरकारी पक्ष आणि बचाव पक्ष दोघांनाही समज देत न्यायमूर्ती म्हणाले, "या खटल्याची सुनावणी सुरू व्हावी, असं आमच्यापेक्षा जास्त कुणालाच वाटत नसेल."

3. सुरक्षा

एल चॅपो यापूर्वी दोन वेळा तुरुंगातून पळून गेला आहे. शिवाय त्याच्या गुन्हेगारी संघटनेचा धोका लक्षात घेता चार महिन्यांच्या या सुनावणीदरम्यान अभूतपूर्व अशी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे.

12 मुख्य न्यायमूर्ती आणि सहा वैकल्पिक न्यायमूर्तींना कोर्टात ने-आण करण्याची जबाबदारी अमेरिकेतल्या मार्शल्सवर सोपवण्यात आली आहे. कोर्टाच्या सुरक्षेसाठी कोर्टाबाहेर सशस्त्र पोलीस अधिकारी आणि बॉम्बनिरोधक श्वानपथकं खडा पहारा देत आहेत. प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहेत.

अल चॅपोच्या प्रत्यार्पणानंतर त्याला दक्षिण मॅनहॅटनमधल्या सर्वाधिक सुरक्षा व्यवस्था असलेल्या तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. त्याला दिवसातले 23 तास स्वतंत्र सेलमध्ये एकटं ठेवलं जातं.

Image copyright Reuters

प्रत्यक्ष खटला सुरू होण्यापूर्वी ब्रुकलीनमध्ये काही सुनावण्या झाल्या. त्यावेळी न्यूयॉर्कमधल्या दोन भांगाना जोडणारा पूल सामान्य जनतेसाठी बंद असायचा. अल चॅपोला घेऊन जाणाऱ्या पोलीस ताफ्यासोबत कुख्यात गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी सर्वांत प्रभावी समजली जाणारी लॉस एंजेलिसची SWAT टीम आणि एक अॅम्ब्युलंसही असायची. या संपूर्ण ताफ्यावर हेलिकॉप्टरच्या मदतीने देखरेख ठेवली जायची.

ही सगळी कसरत पुन्हा करावी लागू नये, यासाठी सुनावणीदरम्यान अल चॅपोला कोर्टाच्या परिसरातच ठेवलं जाण्याची शक्यता आहे.

या कुख्यात ड्रग्ज तस्कराने दोन वेळा मेक्सिकोच्या तुरुंगातून पळ काढला होता. एकदा लॉन्ड्रीच्या गाडीत लपून तर दुसऱ्यांदा तुरुंगातल्या बाथरुममधल्या टनेलमधून तो पळून गेला होता.

4. जनतेचं लक्ष

न्या. कोगन यांनी न्यायाधिशांना अतिरिक्त सुरक्षा देण्यात यावी, यासंबंधी दिलेल्या निकालात म्हटलं आहे, "एका अर्थानं हा खटला अभूतपूर्व असा आहे. अगणित लोकांचं लक्ष या खटल्याकडे लागून आहे."

न्यायमूर्तींनी त्या प्रकरणांचाही दाखला दिला ज्यात लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमांमध्ये सुनावणी सुरू होण्याआधीच त्याच्यावरचे आरोप रंगवून सांगण्यात आले होते.

Image copyright Getty Images

अल चॅपोच्या आयुष्याने अनेक चित्रपट निर्माते आणि केट डेल कॅस्टिलो आणि सिन पेन सारख्या कलाकारांनाही भुरळ पाडली होती. त्याचा दाखला न्यायमूर्तींनी दिला होता.

पेन यांनी 2016 सालच्या रोलिंग स्टोन मुलाखतीसाठी अल चॅपेलची भेट घेतली होती. या भेटीमुळेच तपास अधिकाऱ्यांना तुरुंगातून पळून गेलेल्या या कुख्यात ड्रग तस्कराचा ठावठिकाणा पुन्हा शोधता आला होता.

न्यूयॉर्क सिटी विद्यापीठाच्या जॉन जे स्कूल ऑफ क्रिमिनल जस्टिसमधले सहायक प्राध्यापक असलेले फ्रित्झ अम्बाक यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं, "हा केवळ एका गुन्हेगाराचा किंवा अंमली पदार्थाविरोधी मोहिमेचा मुद्दा नाही तर तो (अल चॅपो) फोफावत चाललेल्या पॉप कल्चरचा हिरो बनला होता."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)