कराचीतल्या चिनी दूतावासानंतर खैबर पख्तूनख्वामध्ये हल्ला 15 ठार

स्फोट Image copyright Getty Images

पाकिस्तानच्या कराची शहरात झालेल्या सशस्त्र हल्ल्यात किमान दोन पोलीस ठार आणि एक सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत.

कराची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहराच्या क्लिफ्टन भागातल्या या दूतावासाजवळ सकाळी साडेनऊ वाजता प्रथम गोळ्यांचा आवाज ऐकू आला.

त्याच दरम्यान चार शस्त्रधाऱ्यांनी दूतावासात शिरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना सुरक्षारक्षकांनी अडवलं. यानंतर झालेल्या गोळीबारात तीन हल्लेखोर ठार झाले आहेत.

तर या हल्ल्यानंतर वायव्य पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा इथल्या बाजारात झालेल्या स्फोटात 15 लोक ठार झाले आहेत.

Image copyright Getty Images

बलोचिस्तान प्रांताल्या एका फुटीरतावादी गटाने हा हल्ला केल्याचं म्हटलं आहे.

पोलिसांनी या भागातून नागरिकांना दुसरीकडे हलवलं असून इथे सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. दूतावासातले सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली.

आधी एक स्फोटही झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. स्फोटानंतर घटनास्थळातून धूर निघतानाची दृश्यं काही स्थानिक चॅनेल्सवर दिसली.

पाकिस्तानचा मित्रराष्ट्र समजला जाणाऱ्या चीनने पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. त्यातून सध्या तिथे युद्धपातळीवर पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत.

यापैकीच एका मोठ्या प्रकल्पाचं केंद्रस्थान बलोचिस्तान आहे, जो बऱ्याच अंशी मागासलेला भाग आहे.

दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. "कुठल्याही दहशतवादी घटनेसाठी कोणतंही कारण खपवता येणारं नाही. या हल्ल्याच्या मागे असलेल्या लोकांना तातडीने शासन व्हावं. अशा दहशतवादी हल्ल्यांमुळे जगाचा दहशतवादाचा बीमोड करण्याचा निर्धार आणखी भक्कम होतो," परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)