BBC 100 Women : नगरची 'सीडमदर' राहीबाई प्रेरणादायी महिलांच्या जागतिक यादीत

राहीबाई Image copyright BBC/sharad badhe

'सीडमदर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई सोमा पोपेरे यांचा 100 Women बीबीसीच्या प्रेरणादायी महिलांच्या जागतिक यादीत समावेश करण्यात आला आहे. विविध क्षेत्रात काम करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या जगातल्या 100 महिलांची ही यादी म्हणजे BBC 100 Women.

दर वर्षी बीबीसी ही यादी प्रसिद्ध करते. हे वर्ष "जागतिक स्त्री हक्क वर्षं" म्हणून साजरं होत आहे, हे औचित्त्य साधत "2018 BBC 100 Women" च्या यादीत समाविष्ट झालेल्या १०० महिला नवप्रवर्तनाच्या निदर्शक आहेत, ज्यांनी आंतरिक ओढ, असमाधान आणि उद्वेगाच्या उद्रेकातून भोवतालच्या जगात मूलभूत बदल घडवले आहेत.

चला तर, आपण करून घेऊ त्यांची ओळख. त्यांची ओळख करून घेताना, आपल्यासमोर निरनिराळ्या संकल्पना उलगडत जातील, पराकोटीच्या उद्वेगाचे रूपांतर सकारात्मक बदल घडवण्यात झालेले दिसेल, आणि त्या मागे दडलेले कर्तबगार महिलांचे चेहरे समोर येतील.

वय वर्षे 15 ते 94 वयोगटातील आणि 60 देशांतून बीबीसीनं निवडलेल्या 100 महिलांमध्ये काही नेत्या आहेत, काही नवनिर्मात्या आहेत तर काही इतरांचे दैनंदिन आयुष्य सुरळीत सुरू राहावे, यासाठी झटणाऱ्या सर्वसाधारण महिला आहेत.

यांतील काही जणी स्वतःच्या दुःखद, अडवणूक झाल्याच्या, अपयशाच्या, उघड करू नये, अशा अनुभवांच्या कहाण्या, आमच्या "फ्रीडम ट्रॅश कॅन" मध्ये टाकून सांगतील जो, अशा कहाण्यांसाठी आम्ही नेमलेला "डिजिटल बिन" आहे.

तर इतरांच्या कहाण्यांतून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशस्वी झालेल्या महिलांच्या यशोगाथा असतील. उदाहरणार्थ तुरुंगातील वेळ सत्कारणी लावत नाविन्यपूर्ण उद्योगाची सुरवात करणाऱ्या ब्रिटिश महिलेपासून ते जन्माने मुलगी असूनही मुलगा म्हणून वाढवल्या गेलेल्या अफगाणी बालिकेपर्यंत. आणि या जागतिक यादीत समाविष्ट झाल्या आहेत् नगरच्या राहीबाई.

पारंपरिक पिकांचे शेकडो देशी वाण जतन करण्यासाठी राहीबाई यांनी मोठे योगदान दिले आहे. BAIF या संस्थेच्या मदतीने त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावात बियाणे बँक सुरू केली. त्यामुळे शाश्वत शेतीला मोठं वरदान मिळतंय.

राहीबाईंच्या बँकेत आदिवासी परंपरेने जपलेल्या 53 पिकांचे 114 गावरान वाण आहेत. अहमदनगरच्या अकोलेसह चार तालुक्यात 50 टक्के शेतकरी गावरान बियाणे वापरतात.

पाहा व्हीडिओ - राहीबाईंची देशी बियाण्यांची बँक

बीबीसीने प्रसिद्ध केलेली ही १०० महिलांची यादी इंग्रजी वर्णाक्षर क्रमाने दिली आहे. त्यांचे नाव, व्यवसाय, देश आणि थोडक्यात परिचय यासह दिली आहे.

१] अबिसोय अजाय एकिनोफॉलरीन - ३३ वर्षं, नायजेरिया, सामाजिक प्रश्नं सोडवण्यासाठी उद्योगाचा वापर

अबिसोय या "गर्ल्स कोडिंग" या नायजेरियातील सेवाभावी संस्थेच्या संस्थापक आहेत. नायजेरियातील मागासलेल्या, दुर्गम भागातील आणि अप्रगत जमातीतील मुलींना कम्प्युटर कोडींग, वेबसाईट डिझायनिंग, यासारखी कामे शिकवून स्वतःच्या आणि समाजाच्या उद्धारासाठी सक्षम बनवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

२] इस्रा अल शेफई- वर्ष ३२ - मजाल.

ऑर्ग बहारीन च्या कार्यकारी संचालिका, या संस्थेद्वारा त्यांनी मध्यपूर्वेकडील आणि उत्तर आफ्रिकेतील उपेक्षित, दुर्बल समाजघटकांना, जगासमोर व्यक्त होण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञांनाचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले.

३] स्वेतलाना अलेक्स्वा- वय १८ - मॉडेल, रशिया

एका अपघातात स्वेतलानाचा जीव वाचला पण, तिचे अर्धे अंग भाजून निघाले, जळलेल्या जखमांचे व्रण अंगावर वागवत खचून न जाता समाज माध्यमांच्या मदतीने ती "सोशल मॉडेल" बनली. अशाप्रकारच्या संकटांचा सामना करणाऱ्या व्यक्तीना धीर देत, सकारात्मकतेने जीवन जगण्यासाठी स्वेतलाना मदत करते.

४] लीझ्ट अल्फान्सो- वय ५१ - संचालक आणि नृत्य प्रशिक्षक, क्युबा

या महिलेने फ्युजन नृत्य प्रकार शिकवणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था स्थापन केली, आणि जगातील १०० हून अधिक शहरांत नृत्याचे सादरीकरण केले.

५] निमको अली- वय ३५ - लेखिका, कार्यकर्त्या

सोमालीलँडमध्ये Female Genital Mutilation किंवा स्त्रियांची खतना या अपप्रथेविरोधात कार्य करणाऱ्या पुरस्कार विजेत्या सामाजिक कार्यकर्त्या.

६] इजाबेल अलेंद- वय ७६ - लेखिका, पेरू

पेरू देशांत जन्म घेतलेल्या या लेखिकेचे आईवडील चिली होते. अनेक देशांतल्या वाचकांमध्ये प्रसिद्धी लाभलेल्या या लेखिकेने "स्पॅनिश" भाषेत लेखन केले. त्यांच्या पुस्तकांचा ४२भाषांतून ७० लाखाहून अधिक खप झाला.

७] बुशरा यहा अल्मुतावाकेल, वय ४९, कलावंत, छायाचित्रकार, आणि कार्यकर्त्या, येमेन.

आंतरराष्ट्रीय प्रकाशनांतून त्यांच्या कामाला प्रसिद्धी मिळाली आहे, ब्रिटीश म्युझियमनेही त्यांची छायाचित्रे संग्रही ठेवली आहेत. असे सन्मान मिळवणाऱ्या या येमेन मधील पहिल्या स्त्री व्यावसायिक छायाचित्रकार आहेत.

८] अलिना अॅनिसिमोवा वय १९ - काँम्प्युटर प्रोग्रामिंग विद्यार्थी

किरगीझस्तान देशातून पहिला उपग्रह अवकाशात सोडण्याचे ध्येय असलेल्या किरगीझ गर्ल्स स्पेस स्कूलचे, अलिना नेतृत्व करते.

९] फ्रान्सिस अर्नोल्ड - वय वर्ष ६२ - केमिकल इंजिनिअरिंग आणि बायोइंजिनिअरिंग आणि बायोकेमिस्ट्रीच्या प्राध्यापक, अमेरिका,

या २०१८ सालच्या रसायनशास्त्र विषयातील नोबेल पुरस्कार विजेत्या आहेत. त्यांनी "एन्झाइम" {सजिवांच्या पेशीत तयार होणारे रसायन, ज्याचा वापर अन्य शारीरिक क्रियांसाठी केला जातो उदाहरणार्थ चयापचय.} बाबत केलेले कार्य, प्रयोगशाळांतून, प्रगत औषधांचे निर्माण, जैवइंधन, कपड्यांसाठीचे डीटर्जंट अशा सर्व गोष्टींच्या निर्माणा साठी उपयोगात आणले जाते.

१०] उमादेवी बडी - वय वर्षे ५४, लोकसभा सदस्य, नेपाळ

उमादेवी, नेपाळ मधील "बडी" या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीचे प्रतिनिधित्व करतात. समाजातील अस्पृश्य विरोधी विचारधारा बदलण्यासाठी कार्य करतात.

११] ज्युडिथ बल्काझर - वय वर्ष ६५ - निवृत्त फॅशन डिझायनर, UK

काही कारणाने मुत्र विसर्जनावरील नियंत्रण गमावलेल्या महिलांच्या सोयी साठी खास प्रकारचे अंतर्वस्त्र बनवणाऱ्या "गिगल निकर्स" कंपनीच्या या सहसंस्थापक आहेत. त्या आधी त्यांनी अनेक फॅशन कंपन्यांची स्थापना केली आहे..

१२] सिंडी अर्लेट कनटेराज बटीस्टा, वय वर्षे २८, पेशाने वकील, पेरू

मित्राकडून त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे चित्रण समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर, सिंडी अर्लेट, देशातील निउना मेनोस {नॉट वन वूमन लेस} या घरेलू हिंसा प्रतिबंध चळवळीच्या प्रणेत्या बनल्या.

१३] लेला बेलालोवा वय वर्ष ६१ - विद्यापीठ व्याख्याता, उझबेकिस्तान

विद्यापिठात व्याख्यात्या असलेल्या या महिला पर्यावरणीय संवर्धन कार्यकर्त्या ही आहेत, देशातील पर्वतीय जैवसंस्था, शिकारी पक्षी{गरुड, बहिरी ससाणा} आणि अन्य पक्षांच्या प्रजातींची जोपासना आणि रक्षणासाठी कार्य करतात.

१४] अनेलीआ बोर्त्झ - वय वर्षे ५१ - डॉक्टर, ज्यू धर्मवेत्ता आणि बायोएथिकीस्ट{जैव नीतीतज्ञ}, अर्जेन्टिना

व्यवसायाने डॉक्टर आणि बायोएथिकिस्ट असणाऱ्या या महिला, समग्र उपचारपद्धती द्वारा {होलिस्टिक ट्रीटमेंट} वंध्यत्व पीडित महिलांवर उपचार करतात.

१५] फिलोफॅनी ब्रउन - वय वर्षे ३५ - यॉट मास्टर, समोआ

या समोआ तसेच पहिल्या पॅसिफिक महिला यॉट मास्टर म्हणून ओळखल्या जातात. त्याच प्रमाणे पारंपारिक "कॅनो" ही वापरतात.

१६] रनीन बुखारी - वय वर्ष ३१- सौदी अरेबिया

या संग्रहालय प्रमुख, कला सल्लागार म्हणून काम करतात, त्याचबरोबर कुटुंबातील डिझाईन उद्योगासाठीही काम करतात.

१७] जॉय बुओलाम्विनी - वय वर्ष २८ - आर्टीफिशियल इंटेलिजन्स आर्टिस्ट आणि संशोधक, कॅनडा

"पोएट ऑफ कोड" जॉय यांनी, आर्टीफिशियल इंटेलिजन्सचे सामाजिक परिणाम प्रकाशात आणण्याचे काम केले. {एखादा कॉम्प्युटर किंवा रोबोट किंवा कम्प्युटर प्रोग्राम माणसासारखाच बुद्धीमत्तेचा वापर करून काम करतात- याला आर्टीफिशियल इंटेलिजन्स असे संबोधले जाते} यासाठी त्यांनी कलेचा आणि संशोधनाचा वापर केला.

१८] बार्बरा बर्टन , वय वर्ष ६२- CEO बिहाईंडब्राज, UK

वयाच्या पन्नाशीत तुरुंगवासाचा अनुभव घेतल्यानंतर, कैदी महिलांना, सुटकेनंतर, बाह्य जगात उदरनिर्वाहासाठी आवश्यक कौशल्ये शिकवून फॅशन उद्योगात सामावून घेण्याच्या उद्देश्याने त्यांनी "बिहाईंडब्राज" या कंपनीची स्थापना केली.

१९] तमारा चेर्म्नोवा - वय ६२ - लेखिका, रशिया

सेरेब्रल पाल्सी या विकाराने ग्रस्त तमारा, परीकथा लेखिका असून, "स्टोरीटेलर ऑफ सैबेरिया" नावाने प्रसिद्ध आहेत.

२०] चेल्सा क्लिंटन - वय ३८ क्लिंटन फौंडेशनच्या उपाध्यक्ष, अमेरिका

अनेक पुस्तकांचे लेखन केलेल्या, चेल्सा क्लिंटन, क्लिंटन फौंडेशनच्या उपाध्यक्षा असून, अनेक कार्यांच्या प्रणेत्या राहिल्या असून, सक्षम नवनेतृत्व घडवण्यासाठीही कार्यरत आहेत.

२१] स्टेसी कनिंगहॅम, वय ४४ - न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज (NYSE) अध्यक्षा

यांना न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजच्या ६७व्या अध्यक्षपदाचा मान मिळाला, इतकेच नव्हे तर कंपनीच्या २२६ वर्षांच्या इतिहासात पहिले महिला अध्यक्षपद भूषवण्याचीही संधी मिळाली.

२२] जेनी डेव्हिडसन- वय वर्ष ५० - अमेरिका, स्टँड अप प्लेसर कंपनीच्या CEO

या घरेलू हिंसाचाराने पिडीत व्यक्ती, लैंगिक हल्ल्यांतून वाचलेल्या, मानवी तस्करी अशा समस्यांच्या शिकार झालेल्या व्यक्तींना, आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांनाही मदत करतात, व आश्रयगृह चालवतात.

२३] अशा द वोस - वय वर्ष ३९ - मरीन बायोलॉजिस्ट (समुद्री जैवअभ्यासक), श्रीलंका

या समुद्री जैवविविधतेची जोपासना, संवर्धन, या क्षेत्रातील सहभाग आणि संधी यांमध्ये वाढ होण्यासाठी कार्य करतात.

२४] गॅब्रीएला दी लासीओ वय ४४ - ब्राझील

या आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सोप्रानो गायिका आहेत, आणि उत्तम स्त्री संगीतकारांचा सन्मान, अप्रकाशित स्त्री संगीतकारांच्या कार्याची दखल घेणे यासाठीच्या "डन: वूमन इन म्युझिक" च्या संस्थापिका .

२५] झीओमारा दिआझ - वय ३४ - उद्योजक, उपहारगृह मालक आणि सेवासंस्था संस्थापिका, निकारागुहा

या आपल्या व्यवसायिक संबंधांचा योग्य वापर करून लैंगिक शोषणा विरोधात लढा देतात आणि या बाबत निकारागुहात जनजागृती घडवून आणतात.

२६] नोमा दमेझ्वेनी ४९ - अभिनेत्री, एस्वातीनी {पूर्वीचे स्वाझीलँड},

न्यूयॉर्क मधील ब्रॉडवे आणि लंडन मधील वेस्टएंड मध्ये, सादरीकरण झालेल्या हॅरी पॉटर अँड द कर्स्ड चाईल्ड या नाटकातील मोठेपणीच्या हर्मायनी ग्रँगर या पात्राचा अभिनय करणारी पहिली अभिनेत्री.

२७] चायदेरा इग्र वय २३ - "स्लमफ्लॉवर" ब्लॉगर यु.के.

या सर्वाधिक खपाच्या लेखिका असून, समाजाने स्त्री देहाला जसे आहे तसे स्वीकारण्याच्या नवीन मतप्रवाहाचे अभिसरण घडवणाऱ्या, समाजमाध्यमावरील "सॅगीबूब्जमॅटर" या चळवळीच्या प्रणेत्या आहेत.

२८] श्रूक एलेत्तर, वय २६ इलेक्ट्रॉनिक डिझाईन इंजिनिअर,इजिप्त या निर्वासित असून, पेशाने पूर्णवेळ इंजिनीअर आहेत, त्याच बरोबर, बेली डान्स नृत्यप्रकाराच्या सादरीकरणातून, समलिंगी स्त्री आणि पुरुष , भिन्नलिंगी, उभयलिंगी यांच्या हक्कांबाबत प्रसार आणि जागृती घडवण्याचे काम करतात.

२९] निकोल एव्हान्स - वय ४४ - ऑनलाईन रिटेल सेल्स फॅसिलिटेटर

निकोल यांना, वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी, अंडाशय निकामी {ओव्हरीअन फेल्युअर} होण्याच्या व्याधीला तोंड द्यावे लागले, आता त्या, कमी वयात रजोनिवृत्तीला सामोऱ्या जाणाऱ्या स्त्रीयांना आधार देण्याचे काम करत आहेत.

३०] राघ्दा एझाल्दिन वय वर्ष २६ - फ्री डायव्हर इजिप्त

सर्व विक्रम मागे टाकत, कृत्रिम श्वसन साधनांच्या मदतीशिवाय कितीही खोल पाण्यात सूर मारणाऱ्या विक्रमी फ्री डायव्हर आहेत.

३१] मायत्रा फर्जंदेह - इराण मधील ४२ वर्षीय, ह्या कलावंत असून शारीरिक दृष्ट्या अपंग आहेत. अपंगत्वासह जगण्याच्या अनुभवाविषयी त्या विचार मांडतात.

३२] मामितू गाशे - वय वर्षे ७२ सिनियर नर्स, फिस्तुला सर्जन इथिओपिया

मामितू यांना स्वतःला फिस्चुला व्याधीचा सामना करावा लागला होता, इथियोपियातील हॉस्पिटलमध्ये सर्जनच्या हाताखाली काम करताना त्या एक कुशल फिस्चुला सर्जन बनल्या. आज मात्र त्या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त फिस्चुला सर्जन म्हणून ओळखल्या जातात.

३३] मीना गायेन, वय वर्ष ३६, व्यावसायिक, भारत

मीना यांनी सुंदरबन भागातील रहिवासी महिलांसह काम करून बाह्यजगाशी संपर्क सुकर व्हावा यासाठी त्या रहात असलेल्या खेड्यात विटांचा रस्ता बांधण्याचे काम केले.

३४] जी.इ.एम. वय २७ गायक आणि संगीतकार, चीन

या चीन मधील सर्वाधिक खपाच्या संगीतकार असून, या लोकप्रियतेचा वापर, संगीत, शिक्षण आणि गरीब यासाठी काम करणाऱ्या संस्थांना देणगी मिळवून देण्यासाठी करतात.

३५] फबिओला जायनोती, वय ५८ पार्टिकल फिजीसिस्ट

या पार्टिकल फिजीसिस्ट असून, सर्न द युरोपियन ऑर्गनायझेशन ऑफ न्युक्लीअर रिसर्च या परमाणू संशोधन करणाऱ्या संस्थेत २०१६ मध्ये डायरेक्टर जनरल म्हणून यांची नेमणूक झाली.

३६] ज्यूलिया गिलर्ड, वय ५७ ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधान.

यांना ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मान मिळाला होता आता त्या स्त्रिया आणि मुलींमध्ये शिक्षण आणि नेतृत्वगुणांचा प्रसार करतात.

37] एलेना गोरोलोवा, वय ४९, सामाजिक कार्यकर्त्या, झेक रिपब्लिक

देशातील बेकायदा निर्बीजीकरणाविरोधात या काम करतात, त्याचप्रमाणे विविध संस्थांतून ठेवण्यात आलेल्या (आरोग्यकेंद्रे, मानसोपचार केंद्रे, सुधारगृहे) बालकांना त्यांच्या कुटुंबात सोपवण्याच्या कार्यातही त्या मदत करतात.

३८] रँडी हिसो ग्रीफ्फिन वय ३०, ऑलिम्पिक आईस हॉकी खेळाडू आणि डेटा सायिन्टीस्ट यु.एस.

डाटा सायिन्टीस्ट असलेल्या या महिलेने योग्य त्या माहितीचा वापर करून आईस हॉकी महिला खेळाडू, समाज माध्यमांवर पुरुषा खेळाडू इतक्याच लोकप्रिय असल्याचे सिद्ध करत ,स्त्री आईस हॉकी खेलाडूंच्या 'समान मानधना साठी टीकाकारांना आव्हान दिले. २०१८ मध्ये युनायटेड कोरिया ऑलिम्पिक चमू साठी तिने पहिला गोल करण्याचे यश मिळवले.

३९] जॅनेट हर्बिक, वय ३३, निस्वार्थ सरोगेट असून आणि टॅनिंग सल्लागार, कॅनडा

या स्वतः "वर्किंग वूमन" असून, ५ अपत्यांच्या आई आहेत, त्याचबरोबर परोपकाराच्या भावनेतून सरोगसी चा पर्याय स्वीकारत आता दुसऱ्यांदा सरोगेट आई होणार आहेत.

४०] जेसिका हेस, वय ४१ , शिक्षिका यु.एस.

जेसिका पेशाने शिक्षक असून, स्वतःला येशूची वधू मानत त्यांनी आजन्म ब्रम्ह्चर्य व्रत घेतले आहे. त्या शाळांतून धार्मिकविषयांचे शिक्षण देतात आणि सल्लागार म्हणून काम करतात.

४१] थँदो होपा, वय २९ मॉडेल, वकील, कार्यकर्त्या, साउथ आफ्रिका

या डायव्हर्सिटी आणि इन्क्लुजन आडव्होकेट असून, २०१८ च्या "पिरेली" कलेंडर मध्ये {दिनदर्शिकेत} कृष्ण वर्णीय असूनही समावेश करण्यात आलेल्या त्या पहिल्या व्यक्ती आहेत..

४२] हिंडोउ ओमारू इब्राहीम , वय ३५ , चॅड. पर्यावरणसंवर्धक, स्त्रिया, स्थानिक समाजघटकांच्या खंद्या समर्थक

या चॅडमधील स्थानिक जनतेचे प्रतिनिधत्व करतात, पर्यावरण संरक्षण, आणि स्थानिक जनतेच्या हक्कांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर संरक्षण करण्यासाठी समन्वयक म्हणून कार्य करतात.

४३] रेहान जमालोवा वय १६ - विद्यार्थी आणि उद्योजक, अझरबैजान

रेहान एक तरुण उद्योजिका असून, पावसाच्या पाण्यातून उर्जानिर्मिती करणाऱ्या "रेनर्जी" या कंपनीची संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.

४४] जमीला जमील वय ३२, अभिनेत्री, लेखिका, कार्यकर्ती, सूत्रसंचालक युके

माईक शर यांच्या वादग्रस्त ठरलेल्या एन.बी.सी. मालिका "द गुड प्लेस" मध्ये अभिनेत्री आहे. स्वतःच्या वाढलेल्या वजनाबद्दल न्यूनगंडाने वैतागलेल्या दर्शकांच्या विचारांना वाट मिळावी म्हणून जमीला यांनी समाजमाध्यमांवर @i.weigh हा मंच दिला.

४५] लिझ जॉन्सन, वय ३२ , पॅरालिम्पियन आणि उद्योजक, यु.के.

यांनी बीजिंग येथील पॅराऑलिम्पिक मध्ये पोहोण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते, अपंगांना रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी एका रिक्रुटमेंट एजन्सीची स्थापना केली आहे.

४६] लाओ खँग - वय २६ रग्बी खेळाडू आणि प्रशिक्षक, लाओस

यांनी लाओस वूमन्स नॅशनल रग्बी टीम ला आंतरराष्ट्रीय पातळीवर ऐतिहासिक विजय प्राप्त करून दिले, रग्बी प्रशिक्षक म्हणून परवाना मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या.

४७] जॉय मेड किंग - वय ४४ , मॉडेल, फिलिपाइन्स

जॉय या पूर्ण आशियात मॉडेल आणि सादरकर्त्या म्हणून काम करतात. त्या आणि त्यांचा जोडीदार अंजेलिना मेड किंग यांनी सादर केलेल्या माहितीपटात अंजेलिना भिन्न लिंगी असल्याचे समजल्या नंतरचा जोडप्याचा वैचारिक सहप्रवास दिसतो.

४८] कृष्णा कुमारी, वय ४०, राजकारणी, पाकिस्तान

स्त्री हक्कांसाठी मोहीम उघडल्यानंतर, कृष्णा कुमारी, पाकिस्तान मंत्रीमंडळात निवडून आल्या. त्या आधी तीन वर्ष त्याना वेठबिगार कामगार म्हणून काम करावे लागले होते.

४९] मारी लगुरे, वय २२ स्थापत्य अभियंता, वास्तुविशारद विद्यार्थी, फ्रांस

नाहक त्रास देणाऱ्या रस्त्यावरील व्यक्तीचे व्हिडियो चित्रण समाजमाध्यमांवर पसरवल्याने, याच प्रकारचे अनुभव अन्य स्त्रीयांना व्यक्त करता यावेत यासाठी यांनी मंच उपलब्ध करून दिला.

५०] वीस्ना चिया लेथ, वय ४४ , पेशाने वकील, कंबोडिया

या कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या कंबोडियातील रॉयल युनिव्हर्सिटी ऑफ लॉ अँड एकॉनॉमिक्स च्या त्या पहिल्याच विद्यार्थीनी होत्या. महिला वसतीगृह उपलब्ध नसल्याने विद्यापीठाच्या तळघरात राहून त्यांना शिक्षण घ्यावे लागले.

५१] अॅना ग्रसिएला सागास्टम लोपेझ, वय ३८ एल साल्व्हाडोर,प्रॉसिक्युटर (वकील)

अॅना ग्रसिएला यांना २०१६ मधील विविध स्त्री हत्या घटनांचा शोध घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या चमूच्या प्रमुख म्हणून नेमण्यात आले होते. आणि आधीच्या वर्षी, एल साल्वाडोर महिला आणि स्त्रीहत्या विशेष समन्वयक वकील म्हणून ओळखले गेल्या.

५२] मारिया कोरीना मचादो, वय ५१, व्हेनेझुएला तील राजकारणी नेतृत्व.

या एक राजकारणी नेत्या असून, त्यांनी व्हेनेझुएला तील लोकशाही प्रणालींचे रक्षण करण्याची मोहीम राबवली आहे.

५३] नॅनिआ माहुता, वय ४८, मंत्री, न्यूझीलंड

यांनी, न्यूझीलंड च्या मंत्रीमंडळात २२ वर्ष योगदान दिले, न्यूझीलंड मधील माओरी संस्कृतीची ओळख सांगणारा माओरी फेस टाटू वापरणाऱ्या त्या पहिल्या महिला संसदसदस्य होत्या.

५४] साक्दिया मारुफ, वय ३६, स्टँड अप कॉमेडीयन, इंडोनेशिया

स्त्रीयांबाबतचा इस्लामी कट्टर धर्मवाद, आणि स्त्री हिंसा, यांना विनोदाचा आधार घेत आव्हान देणाऱ्या, इंडोनेशियातील या पहिल्या महिला ठरल्या.

५५] लिसा म्कॅगी, वय ३८ लेखिका यु.के.

या उत्तर आयर्लंड च्या नाट्यलेखिका असून, चॅनेल4 वरील डेअरी गर्ल्स ही त्यांची विनोदी मालिका २००४ सालापासून लोकप्रिय आहे.

५६] किर्स्टी म्क्गृएल वय ३० चरिटी कोओर्डीनेटर यु.के.

यांनी स्थापन केलेल्या 4लुईस या सेवाभावी संस्थेद्वारा, अपत्याच्या मृत्यूने दुःखी असलेल्या पालकांना मानसिक आधार देण्यासाठी "मेमरी बॉक्सेस" दिले जातात. त्यांनी स्वतः ही हे दुःख सोसले होते.

५७] बेकी मेकीन, वय ५२, जनरल मॅनेजर, शेपिंग अवर लाइव्ज, यु.के

सेवा केंद्रांनी, घरेलू हिंसा पिडीत अपंगाना व्यापक सेवा पुरवण्याचा सल्ला, बेकी देतात

५८] रुथ मेदुफिया, वय वर्षे २७ धातू जोडणी कामगार, घाना

रुथ या शहरातील झोपडपट्टीत राहतात, स्त्री असूनही त्या स्वतः धातूजोडणी, वेल्डिंगचे काम करतात. बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या तरुणींसाठी, त्यांना स्वतःच्या उदाहरणातून आदर्श उभा करायचा आहे.

५९] लारीसा मिखालोत्स्वा, वय ६६, मॉडेल, संगीत शिक्षिका, युक्रेन

लारीसा अकॉर्डीयन शिक्षिका आहेत, आणि वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांना मॉडेल होण्याची प्रथम संधी मिळाली.

६०] अमिना जे. मोहम्मद, वय ५७ युनायटेड नेशन्स च्या डेप्युटी सेक्रेटरी जनरल, नायजेरिया

अमिना या नायजेरियाच्या माजी पर्यावरण मंत्री होत्या, तसेच युएन सेक्रेटरी जनरल बान कि मून यांच्या विशेष सल्लागार म्हणूनही त्यांनी पदभार सांभाळला होता.

६१] येनार मोहोम्म्द, वय ५८ ऑर्गनायझेशन ऑफ वूमन्स फ्रीडम इन इराकच्या अध्यक्ष

हिंसापिडीतांना आसरा देण्यासाठी त्यांनी इराक मध्ये आश्रयगृहांची साखळी राबवली आहे, तसेच विविध हिंसात्मक घटनांतून ८०० हून जास्त महिलांची त्यांनी सुटका करण्यासाठी मदत केली आहे.

६२] जॉस्लीन इस्टेफिना वेलास्क़्वेज़ मोर्ल्स, वय २६, विद्यार्थी आणि एन.जी.ओ समन्वयक, ग्वाटेमाला

मोर्ल्स या मुली आणि तरुणींशी संपर्क साधून लैंगिक आणि लैंगिक संबंधाबाबत तसेच नातेसंबधविषयक शिक्षण देतात आणि बळजबरीने होत असलेले विवाह थांबवण्यासाठी प्रयत्न करतात.

६३] रॉबिन मॉर्गन, वय ७७, लेखिका आणि कार्यकर्त्या, यु.एस.

यांनी २० पुस्तके लिहिली असून त्या युएस वूमन्स मुव्हमेंट चे नेतृत्व करतात, तसेच द सिस्टरहूड इज ग्लोबल इन्स्टिट्यूट अँड द वूमन्स मिडिया सेंटर च्या त्या संचालिका आहेत.

६४] न्युजीन मुस्तफा वय १९, विद्यार्थिनी, सीरिया

व्हीलचेअर वरील अपंग न्युजीनने युद्धग्रस्त सिरीयातून हजारो मैल अंतर पार करून स्थलांतर केले, आणि आता अपंग निर्वासितांच्यावतीने ती विविध मोहिमा राबवते आहे.

६५] दिमा नश्वी, वय ३८, कलावंत, सीरीया

दिमा स्वतः एक कलावंत, ग्राफिक्स, आणि अनिमेशन च्या माध्यमांचा वापर करणाऱ्या, व्हिज्युअल स्टोरी टेलर आहेत. त्यांच्या कथा या सिरीयातीलच असतात.

६६] हेलेना न्दुमे, वय ५८, ऑप्थालमोलॉजिस्ट, नामिबिया

हेलेना यांनी नामिबिया तील ३५,००० रुग्णांवर दृष्टी परत मिळवण्यासाठी मोफत शस्त्रक्रिया केली. त्यांपैकी बरेच जण त्यांना "नामिबियातील चमत्कार" संबोधतात.

६७] केली ओद्वायर, - वय ४१, संसद सदस्य, ऑस्ट्रेलिया

केली या ऑस्ट्रेलियन मंत्री मंडळात रोजगार आणि औद्योगिक संबंध आणि महिलांसाठी मंत्री म्हणून कार्यभार सांभाळतात, कामकाजाच्या ठिकाणी कार्यरत असताना, अपत्याला जन्म देणाऱ्या त्या ऑस्ट्रेलियन संसदेतील पहिल्या मंत्री ठरल्या आहेत.

६८] युकी ओकदा, २३, खगोलशास्त्रज्ञ, जपान

युकी भौतिकशास्त्र अभ्यासक आहे, सूर्यमालेच्या निर्मितीवर प्रकाश टाकू शकेल अशा नवीन ताऱ्याचा शोध सर्वप्रथम लावण्याचे श्रेय तिने मिळवले आहे.

६९] ऑलीवेट ओटेल, वय ४८, इतिहास प्राध्यापक, बाथ स्पा विद्यापीठ, कॅमरून

ह्या इतिहासतज्ञ आणि मेमरी स्कॉलर असून युरोपातील वसाहतपूर्व इतिहास आणि वसाहतींचा, तेथील समाजजीवन, तेथील संस्कृतीवर झालेला परिणाम अभ्यासण्याचे काम करतात.

७०] क्लॉडीया शेइन्ब्म पार्दो, वय ५६, मेक्सिको शहराच्या महापौर, मेक्सिको

त्या मेक्सिको शहराच्या पहिल्या महिला महापौर असून, नोबेल पुरस्कार विजेत्या भौतिकशास्त्रज्ञ आहेत.

७१] पार्क सु येओन, वय २२ डिजिटल कॅम्पेनर, दक्षिण कोरिया

डिजिटल तंत्रज्ञान वापरून होणाऱ्या लैंगिक गुन्ह्यांचे उच्चाटन करण्यासाठी त्यांनी एका संस्थेची उभारणी केली आहे.

७२] ओफेलिया पास्त्राना, वय ३६- कॉमेडीयन आणि मिडिया पर्सनॅलिटी

त्या भौतिकशास्त्रज्ञ आणि अर्थतज्ञ तसेच कॉमेडीयन असून समाजमाध्यमांवर परखडपणे व्यक्त होणाऱ्या भिन्नलिंगी आहेत.

७३] विजी पेंकुट्टू, वय ५० कार्यकर्त्या, भारत

विजी यांनी केरळ मध्ये स्त्रियांची संघटना उभारली, आणि स्त्री विक्रेत्यांच्या मूलभूत हक्कांसाठी [कामाच्या ठिकाणी, कामाच्या वेळात, बसण्यासारख्या] लढा दिला.

७४] ब्रीगेत सोसोउ पेरेनेई, वय २८ माहितीपट निर्मात्या, घाना

त्यांनी स्वतःच्या आयुष्यावर निर्मिलेला माहितीपट. यात कुटुंबाचे पापक्षालन करण्यासाठी कुटुंबातील मुलींना देवस्थानातील धर्मगुरूची सेवा करण्याच्या ट्रोकोसी प्रथे मुळे आलेल्या स्वानुभवांवर आधारित माहितीपट पुरस्कार विजेता ठरला.

७५] विकी फेलन, वय ४४ शैक्षणिक व्यवस्थापक, आयर्लंड

या आणि यांच्यासारख्याच शंभर महिलांना, देण्यात आलेले कॅन्सर तपासणीचे रिपोर्ट चुकीचे असल्याचे, त्यांना सांगण्यात आले नव्हते, हे लक्षात येताच त्यांनी आयर्लंड मधील सर्व्हिकल चेक स्क्रीनिंग स्कँडल उघडकीस आणले.

७६]राहिबा सोमा पोपेरे, वय ५५ शेतकरी, देशी बियाणे बँकेच्या संस्थापक, भारत

कसदार शेतीसाठी आणि संकरित बियाण्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी, देशी गावरान बियाण्यांचे जतन आणि त्याचा शेतीसाठी वापर करून कसदार शेतीउत्पादन करण्याची मोहीम स्थानिक परिसरात, पश्चिमभारतातील त्यांच्या जवळपासच्या गावांत राहीबाई यांनी राबवली.

७७] वेलेन्तिना क़्विन्तेरो, ६४ पत्रकार, वेनेझुएला

वेनेझुएलातील कोपरा आणि कोपरा, प्रत्येक ठिकाण आपल्या पर्यटन आणि पर्यावरण विषयक लेखनातून, टीव्ही वरील कार्यक्रमांतून दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा यांनी पुरेपूर प्रयत्न केला.

७८] सॅम रॉस, वय ३०, कॅटरिंग असिस्टंट

यांनी १० वर्ष ग्लासगो सिटी कॉलेज मध्ये कॅटरिंग असिस्टंट म्हणून काम पाहिले आहे आणि आता त्या डाऊन सिंड्रोमग्रस्त रुग्णांचे प्रतिनिधित्व करत जगभर प्रवास करतात.

७९] फातमा समौरा, ५६, फिफा सेक्रेटरी जनरल,सेनेगल

फिफाचे सेक्रेटरी जनरलपद भूषवणाऱ्या या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन ठरल्या आहेत.

८०] ज्युलिया सरांगांत, वय ५३ , गार्डन डिझायनर, टांझानिया

कोणतीही जागा जितकी चांगली दिसेल तितकं चांगलं वाटतं यासाठी काम करणाऱ्या गार्डन डिझायनर, ज्युलीयेट अत्यंत कल्पक आणि कुशल बागकाम तज्ञ आहेत. त्या २०१६ च्या चेल्सा फ्लॉवर शो च्या सुवर्णपदक विजेत्या आहेत.

८१] सिमा सरकार, वय ४४, पूर्ण वेळ आई , बांगलादेश

स्वतःच्या १८ वर्षांच्या अपंग मुलाला, परीक्षाकेंद्रावर, शब्दशः कडेवर घेऊन जात असतानाचे, त्यांचे छायाचित्र समाजमाध्यमांवर पसरले होते.

८२] श्पारक श्जारीझादेह, वय ४३, कार्यकर्त्या इराण

इराण मधील माहिलांवर हिजाब घालण्याच्या "हिजाब रुल" चा निषेध म्हणून, त्यांनी सार्वजनिक ठिकाणी सर्वांसमक्ष स्वतःचा बुरखा काढून टाकला. परंतु याची शिक्षा म्हणून त्याना तडीपारी आणि, २० वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला सामोरे जावे लागले.

८३] हॅवेन शेपर्ड, वय वर्ष १५, विद्यार्थी आणि स्विमर

आगामी पॅरालाम्पिक स्पर्धेत स्विमर होण्याची आशा बाळगलेली हॅवेन, पालकांनी तिच्यासह आत्महत्या करण्यासाठी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात, स्वतःचे दोन्ही पाय गमावून बसली आहे.

८४] नेंनी शुशैदा बिंती शमसुद्दीन, वय ४२ न्यायाधीश, मलेशिया,

नेन्नी न्यायालयात येणाऱ्या मुस्लीम महिलांच्या सरक्षणासाठी कृतीशील असतात आणि शरीयत कायद्याचे लावले जाणारे नकारात्मक अर्थ बदलण्याची त्यांची इच्छा आहे.

८५] हयात सिंडी - इस्लामिक डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षांचे चीफ सायन्टिफिक अॅडवायजर, सौदी अरेबिया

हयात सिंडी, जागतिक स्तरावरील आघाडीच्या जैवतंत्रज्ञा असून, त्या युनेस्को च्या विज्ञान विभागाच्या सदिच्छादूत आहेत, तसेच आय 2 इन्स्टिट्यूट फॉर इमेजिनेशन अंड इंजेन्यूइटी (कल्पकता आणि चातुर्य) या संस्थेच्या संस्थापिका आहेत.

८६] जकलीन स्ट्रब, वय २८, धार्मिकविषयातील तज्ञ, पत्रकार आणि लेखक, जर्मनी

जाक्लीनला कॅथलिक प्रीस्ट व्हायचे आहे. "ब्रेक द व्हॅटीकन ग्लास सिलिंग" ही मोहीम ती राबवत आहे.

८७] डोंना स्ट्रीकलँड, वय ५९ भौतिकशास्त्र प्राध्यापक, कॅनडा

या वॉटरलू विद्यापिठात भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका असून, २०१८ सालच्या भौतिकशास्त्राच्या नोबेल पुरस्कार विजेत्या आहेत.

८८] कनप्स्सोर्न सुरीयासंगपेच, वय ३० दंतवैद्य/ तंत्रज्ञान उद्योजक, थाईलंड

स्वतः मानसिक समस्यांच्या अनुभवांतून गेल्यानंतर, त्यांनी थाईलंड मध्ये प्रथमच मानसिक स्वास्थ्य जपणाऱ्या मेंटल वेलनेस अॅपची निर्मिती केली.

८९] सेत्सुको ताकामिझवा, वय ९० , निवृत्त

टोक्यो मध्ये २०२० मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धाकाळात, शहरात येणाऱ्या विदेशी पर्यटकांना मार्गदर्शन करणे शक्य व्हावे यासाठी, त्या या वयात उत्साहाने इंग्रजी शिकत आहेत.

९०] नर्गिस ताराकी, वय २१, एन.जी.ओ. कायदेशीर सल्लागार, अफगाणिस्तान

सलग पाच बहिणीमधली शेवटची नर्गिस, अफगाणी प्रथेप्रमाणे तिला आईवडिलांनी मुलासारखे वाढवले, मात्र त्यांनी तिचे शिक्षण पूर्ण करू दिले आणि आता ती स्त्री सक्षमीकरणाची मोहीम राबवत आहे.

९१] एलेन तेजले ३४, फान्झीन्गो या मिडिया हाउस च्या सी.ई.ओ, स्वीडन

चित्रपटांतील स्त्रियांच्या प्रतिनिधीत्वाबाबत जागृती पसरवण्यासाठी त्यांनी जागतिक स्तरावर A रेट मोहीम राबवली.

९२] हेलेन टेलर थोम्प्स्न, वय ९४ , माजी गुप्तहेर, सेवासंस्थेच्या संस्थापक, यु.के

हेलेन या माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या कारकिर्दीत दुसऱ्या महायुद्ध काळात गुप्त संदेश पाठवणाऱ्या "सीक्रेट आर्मी" त सहभागी होत्या, पुढे युरोपात एड्सग्रस्तांसाठी त्यांनी पहिले सेवाकेंद्र उभारले.

९३] बोला टीनुबु, वय ५१, वकील, नायजेरिया

बोला या कॉर्पोरेट क्षेत्रातील वकील असून त्यांनी नायजेरियात पहिली मोफत चिल्ड्रेन'स हेल्पलाईन सुरु केली.

९४] एरोलीन वॉलन, वय ६०, संगीतकार, बेलीझ

एरोलीन या संगीतकार, सादरकर्त्या असून त्यांनी १७ ऑपेरा चे लेखन केले आहे , आणि ivor novello क्लासिकल म्युझिक अॅवॉर्ड त्यांनी प्राप्त केले आहे.

९५] साफिया वझीर,वय २७ कार्यकर्त्या, अफगाणिस्तान

१६ वर्षांच्या असताना, साफिया यु.एस.ए तील न्यू हंपशायर मध्ये आल्या. आणि २०१८ च्या मध्यावधी निवडणुकांत न्यू हंपशायर मधून राज्य प्रतिनिधी म्हणून पहिल्या अफगाण निर्वासित म्हणून निवडून आल्या.

९६] ग्लाडेस वेस्ट, वय ८८, गणितज्ञ, यु.एस.ए.

माजी शिक्षक आणि गणितज्ञ असलेल्या ग्लाडेस यांच्या कार्याची दखल आता घेतली गेली, त्यांनी केलेल्या कामाची मदत, जी.पी.एस. प्रणाली विकसित करण्यासाठी झाली आहे.

९७] लुओ यांग, वय ३४ - छायाचित्रकार,चीन

लुओ यांग त्यांच्या "गर्ल्स" सीरिजसाठी २००७ पासून चीन मधील तरुण महिलांची छायाचित्रे घेत होत्या.

९८] मार्ल याझार्लू पॅट्रिक ३७- फॅशन डिझायनर, मोटरसायकलिस्ट, इराण

इराणमध्ये स्त्रियांनी रस्त्यावर बाईक वरून फिरण्यास मनाई आहे, त्याला आव्हान म्हणून मार्ल मोटरबाईकवरून जगप्रवास करत आहे.

९९] ताशी झान्ग्मो, वय ५५, भूतान नन्स फौंडेशनच्या कार्यकारी संचालक, भूतान

ताशी, भूतान मधील अती दुर्गम भागात लहानाच्या मोठ्या झाल्या, त्यांनी उच्च शिक्षण भारत आणि यु.एस. मधून पूर्ण केले आता त्या भूतान मध्ये नन्स फौंडेशन चालवीत आहेत.

१००] जिंग झाहो, वय ३५, उद्योजक, चीन

जिंग ऑनलाईन नेटवर्क चालवते, स्त्रियांच्या शारीरिक समस्या, लैंगिक इच्छा आणि गरजा, तसेच लैंगिक समाधान मिळवण्यासाठी, आणि आनंददायी संभोगासाठी मदत करणाऱ्या काही खास उत्पादनांबाबत ही ती माहिती देते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)