अणुबाँबपेक्षा हजारो पट ऊर्जा असणारी सौर वादळं पृथ्वीवर धडकली तर?

सौर वादळ Image copyright Getty Images

सूर्यावर भीषण वादळ उठलं तर पृथ्वीवरची संवाद यंत्रणा कोलमडून पडेल आणि मोठं आर्थिक नुकसान होईल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. सूर्यावर उठणारी वादळं इतकी धोकादायक का आहेत?

1972 साली व्हिएतनामच्या समुद्रात पेरून ठेवलेल्या भूसुरुंगांचा अचानक स्फोट झाला होता. हे स्फोट सौर वादळांमुळे झाल्याचं नुकतच सिद्ध झालं आहे.

ही वादळं पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर व्यत्यय निर्माण करू शकतात.

सूर्याच्या पृष्ठभागावर अशी वादळं उठली तर आजच्या काळात पृथ्वीवर त्याचे कितीतरी पटीने गंभीर परिणाम होतील. आज आपण उपग्रह ते विद्युत संयंत्र अशा अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून आहोत. ही सगळी यंत्रणाच या सौर वादळांमुळे कोलमडून जाण्याची भीती आहे. अशी काही दुर्दैवी घटना घडलीच तर त्यामुळे एकट्या ब्रिटनचं तब्बल 16 अब्ज युरोचं नुकसान होईल.

पृथ्वीपासून अब्जावधी किलोमीटर दूर घडणाऱ्या या घटनांचा आपल्यावर थेट परिणाम होण्याची शक्यता असण्यामागे अनेक कारणं आहेत.

सौर वादळं का येतात?

सूर्य हा तारा असून सूर्यातील सर्वाधिक वस्तुमान विद्युतभारित हायड्रोजनचं आहे.

सूर्यातील द्रव हलल्यामुळे सूर्याच्या क्लिष्ट अशा चुंबकीय क्षेत्रात ऊर्जा तयार होते.

ही चुंबकीय ऊर्जा प्रकाशाच्या अतितीव्र ज्वाळा (म्हणजेच सोलार फ्लेअर किंवा सौर ज्वाळा) तसंच मूलद्रव्य आणि चुंबकीय क्षेत्राच्या उद्रेकाच्या रूपात बाहेर पडते. यालाच कोरोनल मास इजेक्शन किंवा सौर वादळ म्हणतात.

Image copyright Getty Images

सौर ज्वाळांमुळे पृथ्वीवर रेडियो लहरींचं दळणवळण आणि विद्युत वहनामध्ये व्यत्यय निर्माण होऊ शकतो. तर सौर वादळामुळे त्याहूनही गंभीर परिणाम होऊ शकतात.

जगात असलेल्या एकूण अण्वस्त्रांच्या एक लाख पट अधिक ऊर्जा या सौर वादळात असते. मात्र ती संपूर्ण अंतराळात विखुरते.

सूर्य एखाद्या अग्निगोळ्यासारखा फिरत असतो. त्यातील ज्वाळांचा उद्रेक अंतराळात सर्वच दिशांनी होत असतो.

असा एखादा उद्रेक आपल्या ग्रहाच्या दिशेने झाला आणि त्यावेळी सूर्याचं चुंबकीय क्षेत्र विरुद्ध दिशेने पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या जवळ आलं तर या दोन्ही चुंबकीय क्षेत्रांचं विलीनीकरण होऊ शकतं. असं वादळ जवळून गेलं तर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा आकार शेपटीसारखा होतो.

जेव्हा हा आकार पूर्ववत होतो त्यावेळी अंतराळातले भारित कण पृथ्वीकडे ओढले जातात. हे कण पृथ्वीच्या वरच्या वातावरणाला धडकतात. या धडकेमुळे ते कण उजळून निघतात आणि आकाशात सुंदर प्रकाशयोजना दिसते. यालाच नॉर्दन किंवा सदन लाईट म्हणतात.

मात्र पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात होणाऱ्या अशा बदलाचे आणखीही काही महत्त्वाचे परिणाम होत असतात.

1972 साली याच कारणामुळे समुद्रातल्या भूसुरुंगांचा स्फोट झाल्याचं सांगितलं जातं. धातूच्या बोटींमुळे चुंबकीय क्षेत्रात होणाऱ्या छोट्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी ही स्फोटकं पेरण्यात आली होती. मात्र सौरमंडळातील घटनांचाही त्यावर तसाच प्रभाव पडेल, याचा अंदाज वैज्ञानिकांना आला नव्हता.

पुढचं सौर वादळ कधी येणार?

सूर्याच्या पृष्ठभागावर हे भीषण उद्रेक नेमके कशामुळे होतात, याचे काही धागेदोरे हाती लागतात का आणि एकदा का असे उद्रेक झाले तर अंतराळातून त्याचा शोध कसा लागणार, यासाठी शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत.

Image copyright Getty Images

एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापासून पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची माहिती उपलब्ध आहे. सौर वादळासारखी अंतराळातील भीषण घटना शंभर वर्षांतून एकदा घडते, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. मात्र छोट्याछोट्या घटना सतत घडतच असतात. सौर वादळाची आतापर्यंतची सर्वांत मोठी घटना 1859 साली घडलेली आहे. याला कॅरिंग्टन इव्हेंट असंही म्हणतात. त्यावेळी संपूर्ण टेलिग्राफ यंत्रणा कोलमडली होती आणि नॉर्दन लाईट थेट बहामासमध्ये दिसला होता.

यानंतर जर अशी काही घटना घडली तर त्याचे परिणाम अतिशय गंभीर असतील.

आपण दिवसेंदिवस तंत्रज्ञानावर जास्तीत जास्त अवलंबून राहू लागलो आहे.

2018मध्ये तर उपग्रह संवाद आणि दळणवळणाच्या केंद्रस्थानी आला आहे. उपग्रहाच्या मदतीने नेव्हिगेशन सहज शक्य झाल्याने आज विमानं एका खंडातून दुसऱ्या खंडात झेपावू लागली आहेत. विद्युत वहनाचं जाळं जगभर विणलं गेलं आहे.

एखादं भीषण सौर वादळ पृथ्वीवर धडकलं तर या सगळ्या यंत्रणेवर त्याचा मोठा परिणाम होईल.

अंतराळयान किंवा विमानामधल्या इलेक्टॉनिक यंत्रणा कोलमडतील आणि भारित कणांनी प्रवाही होऊन ते वातावरणात झेपावतील. जमिनीवरच्या विद्युत वाहिन्यांमध्ये अधिकचा करंट प्रवाहित होईल.

भविष्यातील योजना

या आधीच्या अवकाशीय घटनांमुळे अनेक उपग्रह आणि पॉवर ग्रीड निकामी झालेले आहेत. त्यामुळे भविष्यात सौर वादळ पृथ्वीवर कधी धडकेल, याचा अंदाज बांधण्यासाठी सूर्याचं बारकाईने निरीक्षण करण्याची गरज आहे.

Image copyright Getty Images

जगभरातले शास्त्रज्ञ याचा अभ्यास करत आहेत. ब्रिटनचं Met Office, ऑस्ट्रेलियातील Met Bureau आणि अमेरिकेतील Noaa Space Weather Prediction Center या सर्व ठिकाणी या अप्रिय घटनेविषयी अध्ययन सुरू आहे.

सगळं सुरळीत पार पडलं तर शास्त्रज्ञांना पुढचं सौर वादळ पृथ्वीवर कधी धडकेल, हे सांगता येईल. तसंच धडकण्याच्या सहा तास आधी त्याची सूचना मिळू शकेल. कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यासाठी हा वेळ खूपच कमी असला तरी यामुळे होणारं नुकसान कमी करता येईल. ब्रिटनचं 16 अब्ज युरोंऐवजी 3 अब्ज युरो इतकंच नुकसान होईल, असा एक अंदाज आहे.

ब्रिटनने संभाव्य संकटांची जी यादी तयार केली आहे, त्यात तापाची साथ, महापूर यासोबतच अंतराळातील या घटनेचाही समावेश करण्यात आला आहे. इतकंच नाही तर उष्णतेची भीषण लाट आणि एखाद्या नव्या साथीच्या आजाराइतकंच महत्त्व या संकटालाही देण्यात आलं आहे.

तिथल्या सरकारी संस्थांनी वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्या तसंच अंतराळयान आणि विमान चालवणाऱ्या कंपन्यांसोबत चर्चा सुरू केली आहे. अशी काही अप्रिय घटना घडलीच तर कमीत कमी नुकसान व्हावं, यासाठी कंपन्यांनी योजना आखावी, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

आपत्तीच्या काळात अन्न आणि औषधांचा साठा करण्यासाठी पुरेसा विद्युत पुरवठा उपलब्ध असेल, तसंच पाणी आणि इंधनही मिळू शकेल, याची व्यवस्था करणं गरजेचं आहे.

उपग्रहाशी संपर्क तुटला तर त्यासारख्या सॅट-नॅव्ह्ज आणि सॅटेलाईट टेलिव्हिजन या यंत्रणाही ठप्प होतील.

अशा घटनेमुळे अंतराळयानाचं होणारं नुकसान लवकर कसं भरून काढता येईल, याचा अभ्यास वैज्ञानिक करत आहे.

Image copyright Getty Images

भीषण सौर वादळाची अचूक माहिती मिळाली तर कंपन्यांना वादळ शमेपर्यंत यंत्राचं अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण करता येईल.

युरोपातून उत्तर अमेरिकेत जाताना अनेक विमानं उत्तर ध्रुवावरून उड्डाण करतात. अंतराळातील घटनांवेळी भारित कण ध्रुवांजवळच सर्वाधिक प्रमाणात पृथ्वीच्या वातावरणात शिरतात. त्यामुळे अशावेळी विमानं ध्रुवापासून दूर उडवली जातात.

वाढलेल्या रेडिएशनचा कमीत कमी परिणाम व्हावा आणि विश्वसनीय रेडिओ संवाद यंत्रणा स्थापन करता यावी, असा प्रयत्न आहे.

1972च्या घटनेनंतर आपण अंतराळातील वातवरणाबद्दल बरंच काही शिकलो आहोत. मात्र सूर्याकडून पृथ्वीवर येणाऱ्या धोक्यांपासून नवीन विकसित होणारं तंत्रज्ञान सुरक्षित रहावं, याची खबरदारी आपण घेतली पाहिजे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)