फ्रान्समध्ये इंधन दरवाढीविरोधात आंदोलन पेटलं: मॅक्रॉन म्हणाले, 'लाज वाटायला पाहिजे'

आंदोलन हिंसक Image copyright AFP
प्रतिमा मथळा आंदोलन हिंसक

फ्रान्समध्ये इंधनाच्या वाढत्या दरांविरुद्ध निदर्शनं करणाऱ्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनीही आंदोलकांवर टीका केली आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात काल चँप्स एल्यिस या ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये ठिणगी पडली.

घटनास्थळी गदारोळ सुरू झाला आणि पोलिसांनी अश्रुधुराचा आणि पाण्याचा मारा केला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था असूनसुद्धा ही घटना घडली आहे. पॅरिसमध्ये पाच हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, "फ्रान्सच्या संस्कृतीत हिंसाचाराला जागा नाही. या लोकांना लाज वाटायला पाहिजे पोलिसांवर दगडफेक करायला," असं मॅक्रॉन यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं.

आंदोलनाचा हा दुसरा टप्पा असून या आंदोलनाला Yellow Vest असं नाव देण्यात आलं आहे. साधारण 2,80,000 आंदोलकांनी या निदर्शनांमध्ये भाग घेतला असून 2000 विविध जागांवर गेल्या शनिवारपासून आंदोलन सुरू आहे.

Yellow Vest म्हणजे काय?

एखादी कार कुठे खराब झाली तर ड्रायव्हरने भडक पिवळ्या रंगाचं बनियनसदृश जॅकेट घालून ती दुरुस्त करणं फ्रान्समध्ये बंधनकारक आहे. कार खराब झाल्यावर रस्त्याच्या बाजूला एक रिफ्लेक्टर त्रिकोण ठेवावा लागतोच, पण त्याबरोबर हे पिवळं जॅकेटसुद्धा घालावं लागतं, अन्यथा दंड भरावा लागू शकतो.

हेच पिवळं जॅकेट किंवा वेस्ट या आंदोलनाचं प्रतीक बनलं आहे.

चँप्स एल्यिसला नक्की काय झालं?

चँप्स एल्यिस या ठिकाणी शनिवारी हजारो आंदोलक जमले. पोलिसांनी अनेक महत्त्वांच्या जागांवर रोखण्यासाठी अनेक ठिकाणी नाकाबंदी केली होती. त्यामुळे आंदोलक आणि पोलीस यांच्यात खटके उडाले.

आंदोलकांचा दावा आहे की हे आंदोलन शांततेत सुरू होतं. "आम्ही इथे पोलिसांबरोबर संघर्ष करायला आलेलो नाही. सरकारनं आमचं म्हणणं ऐकून घ्यावं, इतकीच आमची मागणी आहे," असं आंदोलकांच्या प्रवक्त्या लेटिटा डेवाल यांनी AFP वृत्तसंस्थेला सांगितलं.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा चँप्स एल्यिस या भागात 5000 आंदोलक जमले होते.

याच दरम्यान काही लोकांनी पोलिसांची नाकाबंदी तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जाळपोळ सुरू केली नि रस्त्यांवरील सूचना फलक तोडले. बॅरिकेड मोडण्याचा प्रयत्नही केला. पोलिसांवर दगडफेकही केली तसंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली.

हा गोंधळ दुपारपर्यंत सुरू होता. मात्र संध्याकाळपर्यंत पोलिसांनी हा भाग मोकळा केला.

पोलीस आणि आंदोलकांमध्ये उडालेल्या खडाजंगीत 19 लोक जखमी झाले. त्यात चार पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

आंदोलकांवर नॅशनल रॅली पार्टी या अतिउजव्या विचारसरणी असलेल्या पक्षाच्या नेत्या मरीन ला पेन यांचा प्रभाव असल्याचा आरोप गृहमंत्री ख्रिस्तोफ कास्टनर यांनी लावला आहे. ला पेन यांनी कास्टनर अप्रामाणिक असल्याचा आरोप एका ट्वीटद्वारे लावला आहे.

आंदोलकांच्या रोषाचं कारण काय?

फ्रान्समध्ये डिझेलच्या दरात गेल्या वर्षभरात 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या साधारण दर 1.51 युरो प्रतिलीटर म्हणजे अंदाजे 121 भारतीय रुपये एवढा असून, हा दरातला उच्चांक यापूर्वी 2000च्या आसपास होता.

जागतिक पातळीवर इंधनाच्या किमती वाढल्या, त्यानंतर कमीसुद्धा झाल्या. मात्र मॅक्रॉन सरकारने यावर्षी डिजेलवरील हायड्रोकार्बन टॅक्स प्रतिलिटर 7.6 सेंट्सने (100 सेंट्स = 1 युरो) वाढवला आहे. तसंच पेट्रोलवर ही वाढ प्रतिलीटर 3.9सेंट्सनी झाली आहे.

Image copyright Reuters

पण या सगळ्या प्रकरणात खरी ठिणगी तेव्हा पडली जेव्हा सरकारने सध्या असलेल्या दरांवर आणखी 6.5 सेंट्स प्रतिलीटर (डिजेल) कर आणि 2.9 सेंट्स प्रतिलीटर (पेट्रोल) कर लादण्याची घोषणा केली.

राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी इंधनवाढीसाठी जागतिक पातळीवरील तेलाच्या किमतींना दोषी ठरवले आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांशी निगडित प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठी खनिज तेलांवर जास्त कर लावावा लागेल, असं मॅक्रॉन म्हणाले आहेत.

फ्रान्सच्या इतर भागात काय स्थिती आहे?

संपूर्ण देशात निदर्शनं होत आहेत. वाहतुकीचा वेग कमी करण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलं आहे. गाड्या जाऊ देण्यासाठी काही टोलबूथ सरकारने आपल्या ताब्यात घेतले आहेत.

काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली असून एकूण 130 लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यापेक्षा हे आंदोलन अगदीच छोट्या प्रमाणात आहे. गेल्या आठवड्यात 2,80,000 लोकांनी आंदोलनात भाग घेतला होता. त्यापैकी 600 लोक जखमी झाले आणि दोन लोकांचा मृत्यू झाला.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा लैंगिक हिंसाचाराविरोधात आंदोलन करणाऱ्या स्त्रियांनी जांभळ्या रंगाचे कपडे घातले होते. स्त्रियांनी उभ्या केलेल्या सोशल मीडिया आंदोलनाचा हा रंग आहे.

या सगळ्या घडामोडींमुळे लैंगिक हिंसाचाराविरुद्ध सुरू असलेलं आंदोलन मागे पडलं आहे.

25 नोव्हेंबर हा दिवस International Day for the Elimination of Violence Against Women म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पॅरिसमध्ये अनेक ठिकाणी आंदोलनांची तयारी करण्यात आली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)