वयाच्या तिसाव्या वर्षी माझी मासिक पाळी बंद झाली होती

निकोल Image copyright Nicole evans

सर्वसाधारण चाळीशीनंतर महिलांत मेनोपॉज येतो. पण काही महिलांना मुदतपूर्व मेनोपाजला सामोर जावं लागतं. त्यातीलच एक म्हणजे निकोल इवान्स. त्यांना वयाच्या तिसाव्या वर्षी मुदतपूर्व मेनोपॉजचं निदान झालं. वंध्यत्वाच्या बसलेल्या या धक्क्याबद्दल त्या बीबीसी 100 Women या मालिकेत सांगत होत्या. हे निदान कसं झालं आणि त्यानंतर या धक्क्यातून त्या कशा सावरल्या हे त्यांच्याच शब्दांत.


गेल्या काही वर्षांपासून माझी मासिक पाळी अनियमित होती. मी हे जेव्हा न्यूझीलंडमधील आरोग्य सेवकांना सांगितलं तेव्हा गर्भनिरोधक गोळ्यांचा परिणाम आहे असं सांगत उडवूनच लावलं. जेव्हा एक महिना माझी पाळी चुकली तेव्हा मी डॉक्टरकडे गेले. मला वाटलं की मी गरोदर आहे.

माझ्या लग्नाला एक वर्ष झालं होतं आणि मूल होण्याबाबत आम्ही चर्चाही करू लागलो होतो.

मात्र माझी प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह आली. माझ्या डॉक्टरने मला रक्ताच्या तपासण्या करण्यास सांगितलं. माझ्या हॉर्मोनची पातळी योग्य प्रमाणात नाही असं स्पष्टीकरण डॉक्टरांनी दिलं. मला एका हॉर्मोनतज्ज्ञाकडे जाण्यास सांगितलं. त्यांनी मला मुदतपूर्व मेनोपॉज आल्याचं सांगितलं. या वयात अंडाशय काम करणं थांबवतं यावर माझा विश्वासच बसत नव्हता. हे ऐकून मला प्रचंड धक्का बसला.

सध्याचा स्त्रीवाद असं सांगतो की स्त्रीनं आपल्याला जे हवं तेव्हा आणि आपल्या सोयीनुसार ठरवावं. मात्र आपणच ठरवलेल्या मार्गावर जेव्हा अशा प्रकारचे अडथळे येतात तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी थोतांड असल्याचं लक्षात येतं.

प्रजननाबाबत सजगता निर्माण करण्याचा जिथे प्रश्न उद्भवतो तिथे सेलिब्रिटी लोकांचं वागणं जास्त प्रभाव पाडतं, असं मला वाटतं. कोणतीही स्त्री 50 वर्षांपर्यंत प्रजननक्षम असते, असा प्रचार यातून केला जातो. त्यामुळे अशा समस्यांकडे दुर्लक्ष करणंच योग्य, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र बाईची प्रजननक्षमता तिशीतही कमी होऊ शकते, याची मला कल्पना नव्हती.

आम्ही टेस्ट ट्यूब बेबीचा मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आम्ही आमच्या अगदी जवळच्या एका मैत्रिणीची मदत घेण्याचा निर्णय घेतला. मात्र तो अयशस्वी झाला. या प्रकियेत सहभागी असणाऱ्या सगळ्या व्यक्तींना तो धक्काच होता.

एका वर्षानंतर आणखी एका मित्राने मदतीचा हात दिला. पण यावेळी मलाच थोडी धाकधूक होत होती. सरकारी खर्चाने हा उपचार करण्याची शेवटची संधी होती. जेव्हा उपचार सुरू नव्हते तेव्हा मानसिकरीत्या मला शांत वाटत होतं. वंध्यत्वाच्या उपचारावेळी अगदी घराच्या बाहेर निघण्यासाठीही मला प्रचंड धैर्य एकवटावं लागायचं.

तेव्हा दुसऱ्यांदा आम्ही हे उपचार घेण्याचं ठरवलं कारण तेव्हापर्यंत माझं वय 32 होतं. वेळही निघून चालली होती.

Image copyright Nicole evans

दु:खद गोष्ट अशी झाली की यावेळीही ही प्रक्रिया यशस्वी ठरली नाही. तिसऱ्या वेळी टेस्ट ट्यूबची प्रक्रिया करायला आमच्याकडे पैसे नव्हते.

माझी मूल दत्तक घ्यायची तयारी नव्हती. आधीच शारीरिक पातळीवर माझे प्रचंड हाल झाले होते. त्यातच आमचं नातं, नोकरी, आर्थिकस्थिती या सगळ्या आघाड्यासुद्धा सांभाळायच्या होत्या. ते का गरजेचं आहे हे मला कळत होतं. मात्र मला जो त्रास झाला होता त्या पलीकडे जाऊन मला हा सगळा त्रास अजून सहन करायची ताकद नव्हती.

मी पूर्णपणे कोसळले होते. आम्ही कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरीही आमच्या होणाऱ्या बाळाला गमावल्याचं दु:ख फार मोठं होतं. एकदा माझी एक मैत्रीण तिच्या बाळाला घेऊन आली होती. जेव्हा ती गेली तेव्हा मला असं लक्षात आलं की मूल असण्याची इच्छा पूर्णपणे निघून गेली आहे, अगदी शून्य झाली आहे.

मला असं वाटतं की देवानेच माझी इच्छा मारून टाकली. कारण त्याने माझ्यासाठी एक वेगळी योजना आखली होती. मी देवाच्या आणखी जवळ गेले.

अनेक डॉक्टरांना मुदतपूर्व मेनॉपॉज म्हणजे काय हे माहिती नसतं. मी चालवत असलेल्या सपोर्ट ग्रुपमधल्या अनेक स्त्रियांशी बोलले. जेव्हा मासिक पाळी अनियमित झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा त्यांना तज्ज्ञांकडे पाठवलं.

जेव्हापासून मला या रोगाचं निदान झालं तेव्हापासून मी हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपीवर आहे. मी या उपचारपद्धतीची आभारी आहे कारण अगदी चाळीशीतसुद्धा मेनॉपॉजच्या लक्षणांबद्दल चर्चा करणं थोडं विचित्र वाटतंय. कारण एखाद्या गटात चर्चा करत बसतो तेव्हा लाजिरवाणं वाटतं.

प्रत्येक महिन्यातल्या सॅनिटरी पॅडचा खर्च वाचला हा या समस्येचा एक प्रकारे फायदाच झाला. मात्र ही जाणीव व्हायला मला बराच वेळ लागला.

वाढणारं वय, कष्टापासून पळ काढणं या पाश्चिमात्य देशाच्या संस्कृतीमुळे आयुष्यातील नैसर्गिक प्रक्रियांशी निगडित समस्येला तोंड देण्यासाठी आपण तयार नसतो. वास्तवापासून पळ काढण्यात आपण चांगलेच यशस्वी ठरले आहोत. स्वत:शीच आपण सोयीस्कर खोटं बोलतो. त्यामुळे समाधानकारक आयुष्य म्हणजे काय हेच आपल्याला कळत नाही.

मुदतपूर्व मेनॉपॉजमुळे मला भरपूर त्रास झाला. मात्र यौवन, उत्तम आरोग्य आणि परफेक्शन असणं म्हणजेच सुख असतं हा गैरसमजसुद्धा दूर झाला. वंध्यत्वाची समस्या हे आमच्यासाठी नक्कीच एक मोठं संकट होतं. मात्र त्यामुळे आम्ही वैयक्तिकरीत्या कणखर झालोच. त्याचबरोबर आमचं नातं आणखी दृढ झालं.

आम्हाला खूप शिकायला मिळालं. आपलं अस्तित्व हे उद्भवलेल्या परिस्थितीपेक्षा कितीतरी महत्त्वाचं असतं हे आम्हाला कळलं. आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष देणं, दुसऱ्यांबाबत संवेदनशील असणं, आयुष्याकडे खुल्या दृष्टिकोनातून बघणं असे अनेक धडे आम्ही शिकलो. आमच्याकडे आज सगळं आहे असं नाही मात्र ज्याची गरज आहे, ते मात्र सगळं आमच्याकडे आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)