कोहली-कृणालची कमाल; भारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-20 मालिका बरोबरीत

भारतीय क्रिकेट संघ, ऑस्ट्रेलिया, ट्वेन्टी-20 Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

फिरकीपटू कृणाल पंड्या आणि कर्णधार विराट कोहली यांच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या T-20 लढतीत सहा विकेट्सनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने तीन T-20 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. मेलबर्नमधील शुक्रवारचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 164 धावांची मजल मारली. डी आर्की शॉर्टने सर्वाधिक 33 धावा केल्या. आरोन फिंचने 28 तर अलेक्स केरीने 27 धावा केल्या. भारतातर्फे फिरकीपटू कृणाल पंड्याने 4 विकेट्स पटकावल्या.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा विकेट मिळवल्याचा आनंद साजरा करताना कृणाल पंड्या

प्रत्युत्तरादाखल खेळताना रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीने 67 धावांची सलामी दिली. धवनने 22 चेंडूत 41 धावा केल्या. त्याने 6 चौकार आणि 2 षटकारांसह ही खेळी सजवली. विराट कोहलीने 41 चेंडूत 61 धावांची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दिनेश कार्तिकने 18 चेंडूत 22 धावा करत त्याला चांगली साथ दिली.

तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिली ट्वेन्टी-20 ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. मेलबर्नची लढत पावसामुळे पूर्ण होऊ शकली नाही. तिसरी लढत जिंकत भारताने मालिकेत 1-1 बरोबरी साधली.

कृणाल पंड्याला मॅन ऑफ द मॅच तर शिखर धवनला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं.

दोन संघातील दरम्यानची टेस्ट सीरिज 6 डिसेंबरपासून सुरू होत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)