युक्रेनवर हल्ला करून रशियाने ताब्यात घेतल्या 3 नौका, तणाव शिगेला

रशिया Image copyright Reuters

रशियाने युक्रेनच्या क्रिमिअन व्दीपकल्प भागात हल्ला करून तीन युद्धनौका ताब्यात घेतल्या. या घटनेमुळे दोन्ही देशांत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

रशियाच्या सैन्याने दोन गनबोट आणि एक टगबोट (नौका वाहून जाणारी नौका) ताब्यात घेतल्या आहेत. या हल्ल्यात युक्रेनचे काही सैनिक जखमी झाले आहेत.

या प्रकरणी दोन्ही देश एकमेकांवर दोषारोप करत आहेत. सोमवारी युक्रेनमध्ये मार्शल लॉ ची अंमलबजावणी करण्याबाबत युक्रेनच्या संसदेत मतदान होणार आहे. संसदेची परवानगी मिळाल्यानंतर मार्शल लॉ'ची अंमलबजावणी होईल.

युक्रेनच्या नौका बेकायदेशीरपणे रशियाच्या सागरी सीमांमध्ये घुसखोरी करत असल्याचा आरोप रशियाने केला.

रशियाने कर्च सामुद्रधुनी जवळच्या एका पुलावर टँकर ठेवले होते. कर्च सामुद्रधुनी हा अझोव समुद्राकडे जाणारा एकमेव मार्ग आहे. अझोव समुद्र युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांना जोडतो.

युक्रेनच्या नॅशनल सिक्युरिटी आणि डिफेन्स काउन्सिलच्या बैठकीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांनी रशियाच्या ही कारवाई 'धक्कादायक आणि विनाकारण' केली असल्याचं म्हटलं आहे.

या प्रकरणी रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्रातल्या अमेरिकेचे राजदूत निकी हॅले म्हणाल्या की न्यूयॉर्कच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी चार वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे.

काळा समुद्र आणि क्रिमिअन द्विपकल्पातील अझोव समुद्र या भागातील तणाव गेल्या काही काळापासून वाढला आहे. या भागावर रशियाने 2014 मध्ये ताबा मिळवला होता.

पार्श्वभूमी

अझोव समुद्र क्रिमिअन द्विपकल्पाच्या पूर्वेला आणि युक्रेनच्या दक्षिणेला आहे. युक्रेनच्या दक्षिण भागातले काही प्रदेश रशियाच्या बाजूने असलेल्या फुटीरतावाद्यांनी ताब्यात घेतले आहेत.

या समुद्राच्या उत्तर भागात बेरडियांसक आणि मरिओपोल ही युक्रेनची बंदरं आहेत. ही बंदरं प्रामुख्याने धान्य, स्टील, कोळसा यांच्या निर्यातीसाठी वापरली जातात.

2003 मध्ये झालेल्या एका कराराने युक्रेन आणि रशियाने दोन्ही देशांच्या नौकांना या समुद्रातून मुक्त वाहतूक करण्याची मुभा दिली होती.

Image copyright Photoshot
प्रतिमा मथळा पुलाच्या खाली तैनात असलेले टँकर

पण गेल्या काही काळापासून रशियाने युक्रेनच्या या बंदरांतून येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. रशियाची एक मच्छिमार नौका ताब्यात घेतल्यानंतर रशियाने हे पाऊल उचललं होतं.

या महिन्याच्या सुरुवातीला या समस्येवर काही ठोस पावलं उचलणार असल्याचं युरोपियन महासंघाने म्हटलं होतं.

फुटीरतावाद्यांनी 2014 पासून युक्रेनविरुद्ध छुपं युद्ध पुकारल्यानंतर पूर्व डोनेस्टस्क आणि लुहान्सक भागात 10,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

युक्रेन आणि पाश्चिमात्य देशांनी रशियाने या फुटीरतावाद्यांना शस्त्रं पुरवल्याचा आरोप लावला केला आहे.

मॉस्कोने शस्त्र पुरवल्याच्या आरोप फेटाळले आहेत, मात्र त्याचवेळी रशियातील काही घटक बंडखोरांना मदत करत असल्याचं मान्य केलं.

आजचा घटनाक्रम

सकाळी युक्रेनच्या बर्डियांसक आणि निकोपोल या गनबोटी आणि याना कापा ही टगबोट काळ्या समुद्रातल्या ओडेसा बंदरावरून अझोव समुद्राजवळील मरिपोल या शहराकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या.

रशियाने या नौका रोखण्याचा प्रयत्न केल्याचं युक्रेनचं म्हणणं आहे. तसंच टगबोटीला धक्का देण्याचा प्रयत्न केला. तरीही त्या कर्च सामुद्रधुनीपर्यंत गेल्या. तिथे त्यांना रशियाच्या युद्धनौकांनी रणगाड्यांनी अडवलं.

रशियाने या भागात दोन फायटर जेट्स आणि दोन हेलिकॉप्टर्स तैनात केले होते. या नौका बेकायदेशीरपणे आमच्या सागरी हद्दीत प्रवेश करत आहेत असा आरोप रशियाने केला आहे. त्याचप्रमाणे सुरक्षेच्या कारणास्तव तिथली जलवाहतूक थांबवण्यात आली आहे.

Image copyright Getty Images

युक्रेनच्या नौदलाच्या मते नौका त्या भागातून जात असताना बंद पडल्या. या हल्ल्यात नौकेतील सहा लोक जखमी झाले.

समुद्रावाटे मरिओपोलला जाण्याच्या योजनेबाबत रशियाला माहिती दिल्याचंही युक्रेनचं म्हणणं आहे.

आंतरराष्ट्रीय प्रतिसाद

युरोपियन महासंघाने रशियाला कर्च सामुद्रधुनी भागातील मार्ग मोकळा करण्यास तसंच दोन्ही देशांना संयम बाळगण्यास सांगितलं आहे.

"युक्रेनच्या सार्वभौमत्वाला, त्यांच्या अधिपत्याखालील जलवाहतुकीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे," असं नाटोचं म्हणणं आहे. रशियाने अझोव समुद्रातील युक्रेनच्या बंदरांना पूर्ण स्वातंत्र्य द्यायला हवं असंही नाटोने सांगितलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)