मंगळाच्या अंतरंगाचा वेध घेणारी मोहीम : The InSight Landerचं काऊंट डाऊन सुरू

The InSight lander Image copyright NASA / Twitter
प्रतिमा मथळा The InSight landerचं मंगळावर उतरतानाचं कल्पना चित्र

अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था NASAचं यान आज मंगळावर उतरणार आहे. 'The InSight lander' या नावाचं हे यान एक प्रकारचा रोबो आहे. हे यान मंगळाच्या अंतरंगाचा वेध घेणार आहे. GMT वेळेनुसार रात्री 7 वाजून 53 मिनिटांनी हे यान मंगळावर उतरणार आहे.

मंगळावरील एलिजिएम प्लॅनिशिआ या मैदानी भागावर हे यान उतरेल.

मंगळावरील खडकाळ भागाचे अंतरंग कसे आहेत, हे शोधता येण्यासाठी या यानावर बरीच उपकरणं आहेत. यातील काही उपकरणं युरोपमध्ये बनली आहेत.

या यानाकडून येत असलेल्या सिग्नलवरून हे यान कोणत्या वेळी मंगळावर पोहोचेल, याचा अंदाज संशोधक घेत आहेत.

अशा यानाला मंगळाच्या अतिशय विरळ वातावरणातून पृष्ठभागावर पोहोचण्यासाठी 7 मिनिटांचा वेळ लागेल. हा सात मिनिटांचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या 7 मिनिटांना 'दहशतीची 7 मिनिटं' म्हटलं जातं. हायपरसोनिक वेगाने येणाऱ्या यानाची गती कमी करून सुरक्षितरीत्या पृष्ठभागावर उतरायचं असतं. यामध्ये बरेच यान अपयशीही ठरले आहेत. म्हणूनच नासाचे विज्ञान विभागाचे प्रमुख थॉमस झ्रुबुचेन मंगळावर पोहोचणं अत्यंत कठीण असल्याचं सांगतात.

नासाने 2007ला मंगळावर पाठवलेल्या फिनिक्स मोहिमेतील बरंच तंत्रज्ञान यात वापरलं आहे. एकप्रकारे यशाचा वारसा या मोहिमेला आहे.

कॅलिफोनिर्यातील Jet Propulsion Laboratoryतील अभियंत्यांना The InSight landerच्या यशाची पूर्ण खात्री आहे.

या मोहिमेचे व्यवस्थापक टॉम हॉफमन म्हणाले, "आमची टीम आणि यान सज्ज आहे. पण मंगळावरील वातावरण काहीवेळा विचित्र असतं. या मोहिमेसाठी मंगळ सज्ज आहे का नाही, हे पाहावं लागेल."

सद्यस्थिती काय आहे?

मंगळावर धुळीची वादळं सुरू होतात का यावर संशोधकांचं लक्ष आहे. वेगाने वाहणारे वारे, धुळीची वादळं याचा या यानांना अडथळा निर्माण होऊ शकतो. या यानाचं संपूर्ण नियंत्रण स्वयंचलित आहे. कारण पृथ्वी आणि मंगळ यांच्यातील अंतर 146 दशलक्ष किलोमीटर आहे. पृथ्वीवरून पाठवलेला संदेश या यानावर पोहोचण्यासाठी 8 मिनिटं लागतात.

दोन सॅटेलाईट ओव्हरहेडच्या मदतीने हे यान पृथ्वीवर संदेश पाठवेल. पृथ्वीवरील रेडिओ टेलेस्कोप या यानावर लक्ष ठेवून आहे.

मंगळावर उतरताच हे यान आजूबाजूच्या परिस्थितीचे फोटो घेईल आणि पृथ्वीवर पाठवेल. हे फोटो पृथ्वीवर यायला 30 मिनिटं लागतील.

ही मोहीम का महत्त्वाची आहे?

मंगळाचं भूगर्भ समजून घेण्यासाठीची ही पहिली मोहीम आहे. जगाची निर्मिती कशी झाली, हे संशोधकांना समजून घ्यायचं आहे.

ब्रिटिन आणि फ्रान्स यांनी बनवलेल्या Seismometersच्या साहायाने मंगळाच्या कंपनांचा अभ्यास होईल. यातून खडकांचे थर कसे आहेत, ते समजू शकेल.

Image copyright NASA
प्रतिमा मथळा The InSight lander सोमवारी मंगळावर उतरेल

जर्मनीने बनवलेलं एक उपकरण मंगळाच्या पृष्ठभागावर 5 मीटरपर्यंत खोदकाम करेल. मंगळाचं भूगर्भ किती सक्रिय आहे, हे यावरून समजेल. तर रेडिओ ट्रान्समिशनच्या मदतीने हा ग्रह स्वतःच्या अक्षाभोवती कसा फिरतो हे अचूक समजेल.

''मंगळाचं केंद्र द्रव आहे की घन हे आपल्याला माहिती नाही. कच्चं अंडं आणि उकडलेले अंडं फिरवलं तर दोन्हीच्या त्यांच्या स्वतः भोवती फिरण्याच्या पद्धतीमध्ये फरक असेल. कारण आहे त्यातील द्रव पदार्थ. मंगळाच्या केंद्राबद्दलची माहिती म्हणूनच आवश्यक आहे'', अशी माहिती हा मोहिमेच्या उपप्रमुख सुझेल म्रेकर यांनी दिली.

या मिशन का महत्त्वाचं आहे?

संशोधकांना पृथ्वीचं अंतरंग चांगल्यापैकी माहिती आहे. 4.5 अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमालेची निर्मिती कशी झाली असावी याचा अंदाज यावरून संशोधक करू शकतात. पण आपल्याकडे एकाच ग्रहाबद्दल माहिती आहे. त्यामुळे मंगळाची निर्मिती कशी झाली हे समजणं आवश्यक आहे.

InSight Landerचे प्रमुख संशोधक ब्रुस बेनार्ड म्हणाले, "ज्या पद्धतीने ग्रहांची निर्मिती आणि विकास झाला आहे, तेच ग्रहांवरील फरकांनाही कारणीभूत आहेत. उदाहरणार्थ पृथ्वीवर आपण एखाद्या ठिकाणी सुटीवर गेलो तर आपली त्वचा काळवंडते. पण शुक्रावर गेलो तर जळून खाक होऊ आणि मंगळाच्या काही भागात तर आपण गोठून जाऊ."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)