मंगळ ग्रहाविषयीच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Image copyright Science Photo Library
प्रतिमा मथळा मंगळ ग्रह

मंगळ ग्रहाचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी नासाच्या शोध मोहिमेचं 'The InSight lander' यान सोमवारी मंगळावर यशस्वीपणे उतरलं.

मंगळाच्या सविस्तर अभ्यासासाठी नासाने जवळपास सात महिन्यांपूर्वी (याचवर्षी पाच मे रोजी) हे यान मंगळावर पाठवलं होतं.

30 कोटी मैल म्हणजे 45.8 कोटी किलोमीटर अंतर पार करून या यानाने सोमवारी मंगळाच्या पृष्ठभागावर एलिसिएम प्लॅनिशिया नावाच्या एका सपाट मैदानावर लँडिंग केलं.

ही जागा या लाल ग्रहाच्या भूमध्य रेषेजवळ आहे आणि तिथला लाव्हाच्या चादरीसारखा आहे.

मंगळाच्या जमिनीखाली दडलेलं गूढ उकलून अधिक माहिती गोळा करणं, हे या यानाचं उद्दिष्ट आहे.

Image copyright Esa
प्रतिमा मथळा मंगळ ग्रह

इनसाईटने मंगळ ग्रहावरून सोमवारी आपण काम सुरू करायला तयार असल्याचे संकेत पृथ्वीवर पाठवले. या यानाने सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी आपले पॅनल उघडले आहेत आणि आता ते चार्ज होतंय.

नासाचे इनसाईट प्रोजेक्ट मॅनेजर टॉम हॉफमन म्हणतात, "हे याना आता सहज काम सुरू करू शकतं. सध्या ते आपली बॅटरी रिचार्ज करतंय."

चला मग मंगळ ग्रहाविषयीच्या 10 गोष्टी जाणून घेऊया.


1. सूर्यमालिकेत मंगळ ग्रह सूर्यापासून 22.72 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. सूर्यमालिकेत पृथ्वी तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर त्यानंतर म्हणजे चौथ्या क्रमांकावर मंगळ आहे. पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर 11.88 कोटी किलोमीटर आहे.

2. मंगळ ग्रह पृथ्वीच्या निम्मा आहे. पृथ्वीचा व्यास 12,681.6 किलोमीटर आहे तर मंगळाचा व्यास 6752 किलोमीटर आहे. मात्र त्याचं वजन पृथ्वीच्या एक दशांश आहे.

3. मंगळ सूर्याची एक प्रदक्षिणा 687 दिवसात पूर्ण करतो. याचाच अर्थ पृथ्वीच्या तुलनेत सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करायला मंगळ ग्रहाला जवळपास दुप्पट कालावधी लागतो. म्हणजेच मंगळावर एक वर्ष 687 दिवसांचं असतं.

4. मंगळावरचा एक दिवस (ज्याला सोलार डे असंही म्हणतात) 24 तास 37 मिनिटांचा असतो.

5. हाडं गोठवणारी थंडी, धुळीची वादळं आणि वावटळी हे सर्व पृथ्वीच्या तुलनेत मंगळावर खूपच जास्त आहे. तरीही जीवसृष्टीसाठी मंगळाची भौगोलिक स्थिती इतर ग्रहांच्या तुलनेत खूप चांगली असल्याचं मानलं जातं.

उन्हाळ्यात या ग्रहावर सर्वाधिक तापमान 30 अंश सेल्सियस असतं तर हिवाळ्यात तापमान शून्याखाली 140 अंश सेल्सियसपर्यंत घसरतं.

6. पृथ्वीप्रमाणेच मंगळावरही वर्षातले चार ऋतू असतात. पानगळ, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. पृथ्वीच्या तुलनेत मंगळावर प्रत्येक ऋतू दुप्पट काळ असतो.

7. पृथ्वी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांची गुरूत्वाकर्षणाची क्षमता वेगवेगळी आहे. त्यामुळे पृथ्वीवर सुमारे 45 किलो वजनाची व्यक्ती मंगळावर 17 किलो वजनाची होते.

8. मंगळाला दोन चंद्र आहेत. फोबोस, याचा व्यास 23 किलोमीटर आहे आणि डेमिओस, याचा व्यास 13 किलोमीटर आहे.

9. मंगळ आणि पृथ्वी दोन्हींच्या भूगर्भात चार स्तर आहेत. पहिला स्तर पर्पटी म्हणजे क्रस्ट जो लोहयुक्त बेसॉल्ट दगडापासून बनला आहे. दुसरा स्तर मँटल, हा सिलिकेट दगडांपासून बनला आहे. तिसरा आणि चौथा स्तर म्हणजे बाह्यगाभा आणि अंतर्गत गाभा. पृथ्वीच्या केंद्राप्रमाणे मंगळाचे हे दोन स्तरही लोह आणि निकेल यापासून बनलेले असू शकतात, असा अंदाज आहे. मात्र हे गाभे धातूप्रमाणे टणक आहेत की द्रव पदार्थांनी बनलेले आहेत, सध्या याची ठोस माहिती उपलब्ध नाही.

10. मंगळाच्या वातावरणात 96% कार्बन डाय ऑक्साईड आहे. तसंच 1.93% ऑर्गन, 0.14% ऑक्सिजन आणि 2% नायट्रोजन आहे.

याशिवाय मंगळाच्या वातावरणात कार्बन मोनॉक्साईडचे अंशही सापडले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)