रशियाच्या इशाऱ्यानंतरही आम्ही नौका थांबवल्या नाहीत, युक्रेन खलाशाची कबुली

खलाशी Image copyright Getty Images

रशियन सुरक्षा दलाने ताब्यात घेतलेल्या युक्रेनच्या नौकांवरच्या तीन खलाशांचे जबाब रशियाने प्रसिद्ध केले आहेत.

रशियाने युक्रेनच्या नौकांनी बेकायदेशीररीत्या समुद्रात प्रवेश केल्याचं म्हटलं आहे. युक्रेनचं कृत्य हे रशियाला चिथावणी देणारं होतं, अशी कबुली युक्रेनचे खलाशी व्होल्दोमिर लिसोव्यी यांनी दिली आहे.

दरम्यान, आमच्या खलाशांना बळजबरीने डांबून त्यांनी कबुली देण्यास भाग पाडलं आहे, असा दावा युक्रेन नौदलाच्या प्रमुखांनी केला आहे.

क्रीमियाच्या कोर्टाने ताब्यात घेतलेल्या 24 पैकी 12 खलाशांना 60 दिवस कैदेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर इतर खलाशांविषयी बुधवारी (28 नोव्हेंबर) निर्णय घेतला जाणार आहे.

खलाशी अँड्री ड्राच यांनी सांगितलं की आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही निकोपोल गनबोट घेऊन ओडेस्सा ते मरिओपोल या मार्गे जात होतो. "आम्ही रशियन कायद्याचं उल्लंघन करत आहोत, अशी ताकीद आम्हाला रशियन फेडरेशनने दिली होती. रशियन समुद्रातून चालते व्हा, असंही त्यांनी आम्हाला वारंवार बजावलं होतं."

सार्ही सिबिझोव्ह हेही निकोपोल गनबोटीवर उपस्थित होते. व्होल्दोमिर लिसोव्यी हे निकोपोलचे सुरक्षा प्रमुख होते, असं त्यांनी कबुल केलं. "मी जाणुनबुजून ultra-short-wave band द्वारे आलेल्या रशियाच्या विनंत्याकडे दुर्लक्ष केलं," असं ते म्हणाले.

दुसऱ्या बाजूला आमच्या खलाशांनी दबावाखाली येऊन खोटे जबाब दिले आहेत असं युक्रेन नौदलाचे प्रमुख इहोर व्होरोंचेंको यांनी युक्रेन टीव्हीवर बोलताना सांगितलं.

"निकोपोलच्या खलाशांना मी ओळखतो. त्यांनी आतापर्यंत त्यांचं काम चोख बजावलं आहे. पण ते आता जे काही सांगत आहेत ते खरं नाहीये," असं व्होरोंचेंको यांनी म्हटलं.

नेमकं काय घडलं?

रविवारी (25 नोव्हेंबर) सकाळी युक्रेनच्या बर्डियांसक आणि निकोपोल या गनबोटी आणि याना कापा ही टगबोट काळ्या समुद्रातल्या ओडेसा बंदरावरून अझोव समुद्राजवळील मरिओपोल या शहराकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या.

रशियाने या नौका रोखण्याचा प्रयत्न केल्याचं युक्रेनचं म्हणणं आहे. तसंच टगबोटीला धक्का देण्याचा प्रयत्न केला. तरीही त्या कर्च सामुद्रधुनीपर्यंत गेल्या. तिथे त्यांना रशियाच्या युद्धनौकांनी या नौका अडवल्या.

रशियाने या भागात दोन फायटर जेट्स आणि दोन हेलिकॉप्टर्स तैनात केले होते. या नौका बेकायदेशीरपणे आमच्या सागरी हद्दीत प्रवेश करत होत्या असा आरोप रशियाने केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तिथली जलवाहतूक थांबवण्यात आली आहे.

Image copyright Getty Images

युक्रेन नौदलाच्या मते नौका त्या भागातून जात असताना बंद पडल्या. रशियाने या नौकांवर हल्ला केल्याचं युक्रेनने म्हटलं आहे. या हल्ल्यात नौकेतील सहा लोक जखमी झाले. समुद्रावाटे मरिओपोलला जाण्याच्या योजनेबाबत रशियाला आधीच माहिती दिल्याचंही युक्रेनचं म्हणणं आहे.

अझोव समुद्र क्रीमिया द्विपकल्पाच्या पूर्वेला आणि युक्रेनच्या दक्षिणेला आहे. युक्रेनच्या दक्षिण भागातले काही प्रदेश रशियाच्या बाजूने असलेल्या फुटीरतावाद्यांनी ताब्यात घेतले आहेत.

या समुद्राच्या उत्तर भागात बेरडियांसक आणि मरिओपोल ही युक्रेनची बंदरं आहेत. ही बंदरं प्रामुख्याने धान्य, स्टील, कोळसा यांच्या निर्यातीसाठी वापरली जातात.

2003 मध्ये झालेल्या एका कराराने युक्रेन आणि रशियाने दोन्ही देशांच्या जहाजांवर या समुद्रातून मुक्त वाहतूक करण्याची मुभा दिली होती.

पण गेल्या काही काळापासून रशियाने युक्रेनच्या या बंदरांतून येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. रशियाची एक मच्छिमार नौका ताब्यात घेतल्यानंतर रशियाने हे पाऊल उचललं होतं.

या महिन्याच्या सुरुवातीला या समस्येवर काही ठोस पावलं उचलणार असल्याचं युरोपियन महासंघाने म्हटलं होतं.

फुटीरतावाद्यांनी 2014 पासून युक्रेनविरुद्ध छुपं युद्ध पुकारल्यानंतर पूर्व डोनेस्टस्क आणि लुहान्सक भागात 10,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

युक्रेन आणि पाश्चिमात्य देशांनी रशियाने या फुटीरतावाद्यांना शस्त्रं पुरवल्याचा आरोप लावला केला आहे.

मॉस्कोने फुटीरतावाद्यांना शस्त्र पुरवल्याच्या आरोप फेटाळले आहेत, मात्र त्याचवेळी रशियातील काही घटक बंडखोरांना मदत करत असल्याचं मान्य केलं.

युक्रेनने जाहीर केला मार्शल लॉ

रशियाच्या संभाव्य हल्ल्याची शक्यता असलेल्या किनारी भागात 30 दिवसांसाठी हा मार्शल लॉ लागू असेल.

या कायद्यानुसार या भागांत आंदोलनं करता येणार नाहीत तसंच मोर्चे काढता येणार नाहीत. शिवाय नागरिकांना लष्करी सेवेसाठी बोलवलं जाऊ शकतं.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनच्या निर्णयाबद्दल काळजी व्यक्ती केली आहे.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ: रशियासह तणावानंतर युक्रेनमध्ये मार्शल लॉ

गेल्या काही वर्षात रशिया आणि युक्रेन यांच्यात पहिल्यांदाच उघड उघड संघर्ष होत आहे. तर रशियाचं पाठबळ असलेले फुटीरतावादी आणि रशियाचे स्वयंसेवक 2014पासून युक्रेनच्या फौजांशी पूर्व युक्रेनमध्ये संघर्ष करत आहेत.

अनेक पाश्चात्य देशांनी रशियाच्या कारवाईचा निषेध केला आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशिया युक्रेनच्या जमिनीवर हल्ला करेल अशी आपल्याला भीती असल्याचं म्हटलं आहे.

या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये युनायटेड नेशन्सच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक झाली. या बैठकीत रशिया आणि पाश्चात्य देशातील मतभेद उघड झाले.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ यांनी रशियाची कारवाई म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जे घडतंय ते आपल्याला आवडलेलं नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

परिस्थिती अशीच राहिली तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासोबत होणारी चर्चा रद्द करण्याचा इशाराही ट्रंप यांनी दिला आहे.

जर्मनीच्या चॅन्सलर अॅंगेला मर्केल यांच्याशी पुतिन यांनी चर्चा केली. युक्रेनने जाणीवपूर्वक रशियाच्या संघराज्याच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे, अशी प्रतिक्रिया क्रेमलिनकडून (रशियाची संसद) देण्यात आली आहे.

युक्रेनमधल्या 276 खासदारांनी मार्शल लॉ पाठिंबा दिला. युक्रेनमधील 27पैकी 10 प्रांतात मार्शल लॉ लागू झाला आहे. 27 डिसेंबरपर्यंत हा कायदा लागू असेल.

31 मार्च 2019ला युक्रेनमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. ती टाळण्यासाठी मार्शल लॉ लागू केला आहे, अशी टीका काहींनी केली आहे.

मात्र युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी हा आरोप नाकारला आहे. रशियासोबत संघर्ष झालाच तर हातात पूर्ण बहुमत हवं असं त्यांनी म्हटलं आहे.

क्रीमिया प्रकरण काय आहे?

क्रीमिया द्विपकल्प अधिकृतरित्या युक्रेनचा भाग आहे. अझोव समुद्र आणि काळ्या समुद्राच्यामध्ये असलेला क्रीमिया द्वीपकल्प हा युक्रेनच्या दक्षिणकडचा भाग आहे.

तर रशिया आणि क्रीमियाच्या दरम्यान केर्च ही सामुद्रधुनी आहे.

2014मध्ये हिंसक निदर्शनानंतर युक्रेनचे रशियन समर्थक राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोव्हीच यांना पायउतार व्हावं लागलं होतं. त्यावेळी शीतयुद्धानंतर पहिल्यांदाच रशिया आणि पाश्चिमात्य देशांत क्रीमिया हा कळीची मुद्दा ठरला होता.

रशियाच्या बाजूने असलेल्या फुटीरतावाद्यांनी क्रीमियन द्वीपकल्प ताब्यात घेतले आहे. बहुतेक रशियन भाषिक असलेल्या लोकांनी त्यावेळी रशियात सामिल होण्याच्या बाजूने मतदान केलं होतं.

युक्रेन आणि पाश्चिमात्या देशांनी ते सार्वमत बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)