फ्रान्समध्ये आयफेल टॉवर शनिवारी बंद; हिंसक आंदोलनांमुळे निर्णय

आयफेल टॉवर Image copyright Getty Images

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला विरोध आणि इतर मागण्यांसाठी फ्रान्समध्ये सुरू असलेली हिंसक आंदोलनं लक्षात घेता आयफेल टॉवर शनिवारी बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. संपूर्ण फ्रान्समध्ये 89 हजार पोलीस आणि मोठ्या संख्येने शस्त्रसज्ज वाहनं तैनात करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली.

पोलिसांनी पॅरिसमधील चँप्स-एलिसिस भागातील व्यावसायिकांना दुकानं बंद ठेवण्याचे आवाहन केलं आहे, शिवाय काही संग्रहालयेही बंद ठेवण्यात आली आहेत.

गेल्या शनिवारी पॅरिसमध्ये हिंसक आंदोलन झालं होतं.

आंदोलनाला तत्कालीन कारण ठरलेली पेट्रोल आणि डिझेलवरील करवाढ सरकारने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही इतर मागण्यांवरून आंदोलन सुरूच आहे.

देशाच्या विविध भागात आंदोलनांची व्याप्ती वाढली आहे.

सरकारचं मत काय आहे?

गृहमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने AFP या वृत्तवाहिनीला दिलेल्या माहिती म्हटलं आहे की शनिवारी अतिउजव्या आणि अतिडाव्या विचारांचे कार्यकर्ते फ्रान्समध्ये जमणार आहेत. त्यामुळे सरकारला हिसेंची शक्यता वाटते.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी लोकांना संयमाचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले, "आम्ही अशा लोकांना तोंड देत आहोत, जे इथं निषेधासाठी नाही तर हिंसेसाठी आले आहेत."

Image copyright Inpho

तर पंतप्रधान इदुआ फिलप यांनी कमी पगारावर काम करणाऱ्या नागरिकांना अजून सवलती देण्यात येतील, अशी माहिती सिनेटमध्ये दिली.

पॅरिसवर काय परिणाम झाला?

हिंसेची शक्यता लक्षात घेता आयफेल टॉवरला अधिक सुरक्षा पुरवणं शक्य नाही, असं आयफेल टॉवरच्या व्यवस्थापकांनी म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात Arc de Triomphe इथं तोडफोड झाली होती, हे लक्षात घेता शहरातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

सांस्कृतिक मंत्री फ्रँक रिस्टर यांनी Louvre and Orsay ही दोन महत्त्वाची संग्रहालयं, ओपेरा हाऊस, ग्रँड पॅलिअस काँप्लेक्स बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

शिवाय शनिवारी होत असलेले फुटबॉल सामनेही स्थगित करण्यात आले आहेत.

आंदोलनांचा भडका

गुरुवारी काही तरुणांनी शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा व्हावी यासाठी आंदोलन केलं. यातील आंदोलक आणि पोलिसांत संघर्ष झाल्यानंतर 140 जणांना अटक करण्यात आली.

Image copyright AFP

राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा Baccalaureate या प्रवेश परीक्षेत बदल करण्याचा विचार आहे, त्याचा हे आंदोलक विरोध करत होते.

कोण आहेत आंदोलक?

हे आंदोलक पिवळ्या रंगाचं चमकदार जॅकेट परिधान करतात. सुरुवातीला डिझेलवरील करांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन सुरू झालं. ही करवाढ पर्यावरणाच्या अनुषंगाने असल्याचं राष्ट्राध्यक्षाचं मत होतं. पण आंदोलक ही दरवाढ अवास्तव असल्याचं म्हणतात.

ही करवाढ स्थगित केली असली तरी आंदोलकांनी माघार घेतलेली नाही. या आंदोलकांना कोणतही नेतृत्व नाही. या आंदोलकांनी सरकारला आणखी 40 मागण्या केल्या आहेत. पेन्शन, कररचनेत बदल, निवृत्ती वय कमी करणे अशा मागण्यांचा यात समावेश आहे.

सोशल मीडियावरून या आंदोलनाचा प्रसार झाला. यात अतिडावे, अतिउजवे, मध्यममार्गी अशा सर्वांचा सहभाग आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)