चेतेश्वर पुजारा: अॅडलेडच्या मानकऱ्याला जेव्हा टीममधूनच वगळण्यात आलं होतं...

  • पराग फाटक
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
क्रिकेट, भारतीय क्रिकेट टीम, ऑस्ट्रेलिया, खेळ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

पुजारा रनआऊट झाला तो क्षण.

या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजाराने 1,868 मिनिटं फलंदाजी करताना 1,258 चेंडू खेळून काढले. तीन शतकं, एका अर्धशतकासह पुजाराने चार कसोटींमध्ये मिळून 521 धावा केल्या. याच दमदार प्रदर्शनासाठी पुजाराची मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

सिडनीपूर्वी अॅडलेड टेस्टमध्ये पुजाराने 280 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले होतं. त्या शतकाबरोबर त्याचा समावेश 17 टेस्ट सेंच्युरी क्लबमध्ये झाला होता.

सौरव गांगुली, हर्बर्ट सटक्लिफ, दिलशान तिलकरत्ने, मायकल आथर्ट्न, रिची रिचर्डसन यांच्यासारख्या फलंदाजांना मागे टाकत त्याचा समावेश दिलीप वेंगसरकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, मार्टिन क्रो, अॅडम गिलख्रिस्ट, डेनिस क्रॉम्प्ट्न यांच्या गटात झाला आहे.

पुजाराच्या शतकानंतर 8 षटकांनंतर कर्णधार विराट कोहली 82 धावांवर (204 चेंडू) बाद झाला. कोहलीने या खेळीत 9 चौकार मारले. विराट कोहलीसह मयांक अग्रवाल, रोहित शर्मा यांच्या अर्धशतकी खेळीनंतर बॉर्डर- गावस्कर मालिकेत मेलबर्न कसोटी सामन्यात भारताने 443 धावांवर डाव घोषित केला आहे.

भारताच्या डावाच चेतेश्वर पुजाराच्या 106 धावा, विराट कोहलीच्या 82, मयांकच्या 76, रोहित शक्माच्या 63, ऋषभ पंतच्या 39, अजिंक्य रहाणेच्या 34, हनुमा विहारीच्या 8, रवींद्र जडेजाच्या 4 धावा आहेत. भारताने पहिल्या दिवशी दोन विकेट गमावून 215 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी गुरुवारी कर्णधार कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी खेळ पुढे सुरू ठेवला.

चेतेश्वर पुजाराला चार महिन्यांपूर्वी इंग्लंड दौऱ्यात फिट असतानाही संघातून वगळण्यात आलं होतं.

ही चार महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. वनडे सीरिजमध्ये दमदार कामगिरी केलेल्या भारतीय संघासाठी चार कसोटी सामने हा खडतर टप्पा होता. एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय कर्णधार विराट कोहली टॉससाठी पोहोचला.

समालोचकाने कोहलीला अंतिम संघाविषयी विचारलं. त्यावेळी पुजारा संघात नसल्याचं कोहलीने सांगताच ट्वीटरसह सोशल मीडियावर कल्लोळ झाला. राहुल द्रविडनंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा पुजारा संघाचा आधारस्तंभ झाला आहे. मात्र त्यालाच संघाबाहेर ठेवल्याने असंख्य क्रिकेटरसिकांनी नाराजी व्यक्त केली होती.

आशियाई उपखंडात खोऱ्याने धावा करणाऱ्या पुजाराची विदेशातली कामगिरी मात्र तशी नाही.

भारतात पुजाराच्या नावावर 36 टेस्टमध्ये 61.86च्या सरासरीने 3217 धावा आहेत. मात्र विदेशात 29 टेस्टमध्ये पुजाराच्या नावावर 1882 धावा आहेत आणि त्याचं अॅव्हरेज आहे 38.40. घरच्या मैदानावरचा शेर विदेशात त्याच तडफेने का गर्जना करू शकत नाही, असा प्रश्न पुजाराच्या चाहत्यांनाही पडतो.

फोटो स्रोत, Parag Phatak

फोटो कॅप्शन,

पुजाराला इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटीसाठी वगळल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन,

पुजाराला संघाबाहेर ठेवल्याने चाहत्यांमध्ये नाराजी पसरली होती.

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन,

पुजाराला संघाबाहेर ठेवण्यात आल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.

पुजाराला वगळण्यामागे स्ट्राईक रेटचं कारण असावं अशीही शक्यता वर्तवण्यात आली. खेळपट्टीवर नांगर टाकून मॅरेथॉन इनिंग्ज रचणं ही पुजाराची खासियत. स्ट्राईक रेट म्हणजे प्रत्येक शंभर चेंडूंमागे बॅट्समनने केलेल्या सरासरी धावा. कूर्म गतीने धावा करत असल्याने पुजाराचा स्ट्राईक रेट कमी राहतो, असं समीकरण मांडण्यात आलं होतं. पुजाराचा स्ट्राईक रेट आहे 46.89

एकूणातच फिट असूनही आणि पंधरा सदस्यीय संघाचा भाग असूनही इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी पुजाराला वगळल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आलं होतं.

मात्र चारच दिवसांत भारतीय संघव्यवस्थापनाचा दृष्टिकोन बदलला. इंग्लंड दौऱ्यातल्या दुसऱ्या टेस्टसाठी पुजाराला संघात घेण्यात आलं. सलामीवीर शिखर धवनला वगळून पुजाराला संधी देण्यात आली. योगायोग म्हणजे अवघ्या काही मिनिटात तो रनआऊट झाला. या टेस्टमध्ये 1 आणि 17 अशा धावा पुजाराच्या लौकिकाला साजेशा नव्हत्या. तिसऱ्या टेस्टमध्ये 14 आणि 72 धावांची खेळी करत पुजाराने एक पाऊल पुढे टाकलं. चौथ्या टेस्टमध्ये मात्र पुजाराने लौकिकाला साजेसा खेळ करत शतकी खेळी साकारली. ढगाळ वातावरणात चेंडू स्विंग होत असताना आणि एका बाजूने सहकारी माघारी परतत असताना पुजाराने झुंजार शतक झळकावलं. मात्र पुढच्याच टेस्टमध्ये 37 आणि 0 अशी कामगिरी झाल्याने पुजाराचं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात काय होणार अशी परिस्थिती होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

पुजारा रनआऊट झाला तो क्षण.

अॅडलेड कसोटीपूर्वी पुजाराची ऑस्ट्रेलियातली कामगिरी आश्वासक अशी नव्हती. तो अंतिम अकरात असेल हे स्पष्ट झालं होतं. भारतीय संघाने रोहित शर्माला संघात घेत वेगाने धावा करणंही तितकंच महत्त्वाचं असेल याचे संकेत दिले होते.

ऑस्ट्रेलियातली संघाची आणि वैयक्तिक कामगिरी चांगली नसल्याने पुजारावर दडपण होतं. अॅडलेड कसोटीत विराट कोहलीने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. लोकेश राहुल झटपट तंबूत परतला आणि पुजारा मैदानात अवतरला. स्ट्राईकरेट आणि तत्सम गोष्टींची चिंता न करता पुजाराने खेळपट्टीवर ठाण मांडत शतकी खेळी केली. एका बाजूने सहकारी साथ सोडत असतानाही पुजाराने चिवटपणे किल्ला लढवत बाजी मारली. भारतीय संघाची 3 बाद 19 आणि थोड्या वेळानंतर 5 बाद 86 अशी अवस्था झाली. पुजाराने छोट्या छोट्या भागीदाऱ्या करत संघाला तारलं. पुजाराच्या शतकी खेळीच्या बळावरच भारताने अडीचशे धावांचा पल्ला गाठला. पुढच्या काही तासात त्याच पिचवर ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनची उडालेली भंबेरी लक्षात घेता पुजाराच्या खेळीचं महत्त्व लक्षात यावं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

रोझबाऊल कसोटीत पुजाराने शतक झळकावलं तो क्षण.

मोठ्या आघाडीसाठी दुसऱ्या डावात संयमी खेळीची अपेक्षा होती. पुजाराने 204 चेंडूत 71 धावांची खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. त्याने अजिंक्य रहाणेसह चौथ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. याच भागीदारीने सामन्याचं चित्र पालटलं.

चेतेश्वर पुजारा टेस्ट आकडेवारी

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)