डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावरुन उभयचर प्रजातीतल्या नवीन प्राण्याचं बारसं

डोनाल्ड ट्रम्प Image copyright Getty Images/ENVIROBUILD
प्रतिमा मथळा नवीन उभयचर प्राण्याच्या रुपात ट्रम्प यांचं काढलेलं व्यंगचित्र

पनामा येथे एक नवीन जातीचा उभयचर आढळला आहे. हा उभयचर स्वतःचं डोकं वाळूत पुरुन घेतो. या नवीन प्राण्याचं नाव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने ठेवण्यात आलं आहे... Dermophis donaldtrumpi.

ट्रम्प यांच्यासाठी टीका नवीन नाहीए. अध्यक्षपदी निवड झाल्यापासून ट्रम्प यांच्या धोरणांचा, निर्णयांचा, वक्तव्यांचा अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे समाचार घेतला. आता ट्रम्प यांच्यावर टीका करण्याचा हा अभिनव पर्याय पर्यावरणप्रेमींनी शोधून काढला आहे.

वातावरण बदलाच्या गंभीर समस्येबद्दल ट्रम्प यांनी काढलेल्या उद्गारांबद्दल गांडूळसदृश दिसणाऱ्या उभयचर प्राण्याचं बारसं ट्रम्प यांच्या नावावरुन करण्यात आलं.

एन्व्हायरोबिल्ड (EnviroBuild) कंपनीने लिलाव प्रक्रियेमध्ये या प्रजातीचे नाव ठेवण्याचे अधिकार 25 हजार डॉलर्सना विकत घेतले होते. या कंपनीच्या प्रमुखाने हे हक्क विकत घेऊन ट्रम्प यांच्यावरचा राग अशा प्रकारे व्यक्त केला. वातावरण बदलाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले असल्याचे EnviroBuild ने स्पष्ट केले आहे .

वातावरण बदलविषयक धोरणांचा निषेध

Dermophis donaldtrumpi हा उभयचर जीव वातावरण बदलांच्या परिणामाला चटकन बळी पडणारा आहे. त्यामुळेच त्याच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या नेत्याच्या धोरणांमुळे तो नामशेष होण्याच्या वाटेवर आहे, असे EnviroBuild चे सहसंस्थापक एडन बेल यांनी म्हटले.

Image copyright ABEL BATISTA / RAINFOREST TRUST UK

हा लहान, आंधळा प्राणी कणा नसलेल्या, सरपटणाऱ्या उभयचर प्राण्यांमध्ये मोडतो. तो मुख्यतः जमिनीखालीच राहतो. या प्राण्याची वैशिष्ट्ये आणि ट्रम्प यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांमध्ये एडन बेल यांना अनेक समान गोष्टी आढळतात.

मानवी हस्तक्षेपामुळे झपाट्याने होणाऱ्या वातावरण बदलावर एकमत करण्याची वेळ येते, तेव्हा डोनाल्ड ट्रम्पही सोयीस्कररित्या आपलं तोंड लपवतात, अशी उपरोधिक टिपण्णी बेल यांनी केली.

ट्रम्प यांची वादग्रस्त भूमिका

Image copyright Getty Images

वातावरणातील बदल हे मानवी हस्तक्षेपामुळे होत असल्याचे जगभरातील शास्त्रज्ञ म्हणत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हे नाकारलं. राजकीय हेतूनं हे शास्त्रज्ञ असे निष्कर्ष मांडत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

वातावरण बदलाविषयीच्या पॅरिस करारातून अमेरिका बाहेर पडत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं होतं. या कराराचा अमेरिकेतील उद्योग-व्यवसायांवर परिणाम होईल, असं कारण ट्रम्प यांनी दिलं होतं.

अर्थात, एखाद्या प्राण्याच्या जातीला ट्रम्प यांचे नाव देण्याची ही पहिलीच वेळ नाहीए. जीवशास्त्रज्ञ वार्झिक नाझारी यांनी पतंग कीटकाची एक नवीन जात शोधली होती. त्याला त्यांनी Neopalpa donaldtrumpi असं नाव दिलं. मात्र असं नाव देण्यामागे ट्रम्प यांचा निषेध करणं वगैरे उद्देश नव्हता.

या कीटकाच्या डोक्यावरील रंगसंगती पाहून आपल्याला ट्रम्प यांच्या केसांची आठवण झाली, असं कारण नाझारी यांनी दिलं होतं.

14 वेगवेगळ्या प्रजातींना ओबामांचं नाव

यापूर्वी नव्यानं सापडलेल्या प्रजातींना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं नावही देण्यात आलं आहे. तब्बल 14 नव्या प्राण्यांचं नामकरण ओबामांच्या नावावरुन करण्यात आलंय. यामध्ये कॅलिफोर्नियामध्ये सापडलेला एक कोळी (Aptostichus barackobamai) तसेच हवाई बेटांवर सापडलेला एक छोटा मासाही आहे. (Tosanoides Obama)

जॉर्ज बुश आणि अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष डिक चेनी यांचेही नाव किड्यांच्या प्रजातीला देण्यात आले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)