रखरखीत वाळवंटाच्या सौदी अरेबियात पाणी येतं कुठून?

सौदी अरेबिया, मध्यपूर्व आखात Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा रखरखीत वाळवंट ही सौदीची ओळख आहे.

सौदी अरेबिया म्हटलं की तेलाची चर्चा कायम होते, पण आता पाण्याची चर्चा सौदीसाठी जास्त महत्वाची आहे. अर्थात तेलाच्या उत्पादनामुळे सौदी गर्भश्रीमंत आहे. पण त्यामुळे इथली पाण्याची तहान भागत नाही. उलट ती वाढताना दिसते आहे.

ही गोष्ट 2011 ची आहे. मायनिंग कंपनीशी संबंधित एका फर्मचे उपप्रमुख असलेल्या मोहम्मद हानी यांनी म्हटलं होतं की इथं सोनं आहे, पण पाणी नाहीए. आणि सोन्याप्रमाणेच इथं पाणीही महाग आहे.

16 व्या शतकातील कवी रहीम यांचा दोहा सौदी अरेबियासाठी अगदी चपलख आहे. रहिमन पानी राखिए, बिन पानी सब सून.

सौदी तेल विकून प्रचंड पैसा कमावतो आहे. पण यातला बराचसा हिस्सा समुद्राचं पाणी पिण्यालायक करण्यासाठी खर्च होतो आहे. इथं ना नदी आहे, ना तलाव. विहिरी आहेत, पण त्या तेलाच्या. पाण्याच्या विहिरी तर कधीच्याच कोरड्या पडल्या.

2011 मध्ये सौदीच्या तत्कालीन पाणी आणि वीज मंत्र्यांनी म्हटलं होतं, "सौदी अरेबियात पाण्याची मागणी प्रत्येक वर्षी 7 टक्क्याने वाढते आहे. आणि पुढच्या दशकभरात पाण्यासाठी किमान 133 अरब डॉलर गुंतवणूक करण्याची गरज पडेल."

सौदी अरेबिया वॉटर कन्वर्जन कॉर्प अर्थात एसडब्लूसीसी प्रत्येक दिवशी 30.36 लाख क्युबिक मीटर समुद्राचं पाणी पिण्यालायक बनवते.

अर्थात हा आकडा 2009 चा आहे, जो आता वाढला असेल. याचा रोजचा खर्च 80.6 लाख रियाल आहे. त्यावेळी एक क्युबिक मीटर पाण्यापासून मीठ वेगळं करण्याचा खर्च 2.57 रियाल होता. याशिवाय ट्रान्सपोर्टिंगचा खर्च 1.12 रियाल प्रति क्युबिक मीटर होता.

किती पाणी लागतं?

सौदीने 2015 मध्येच पाण्याच्या व्यावसायिक वापरावरील कर वाढवला होता. पाण्याचा बेहिशेबी वापर थांबवण्यासाठीच हा करवाढीचा उपाय शोधण्यात आला आहे.

काही संशोधकांच्या मते सौदी अरेबियाच्या जमिनीतलं पाणी पुढच्या 11 वर्षात पूर्णपणे संपून जाईल. सौदीचं अरबी वृत्तपत्र अल वतनच्या रिपोर्टनुसार खाडीच्या देशांमध्ये प्रति व्यक्ती पाण्याचा वापर जगभरात सर्वाधिक आहे. सौदीत प्रतिव्यक्ती 265 लीटर पाण्याचा वापर होतो, जो की युरोपिय युनियनच्या देशांपेक्षा दुप्पट आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा शुष्क वाळवंटात पाणी येतं कुठून?

सौदी अरेबियात एकही नदी किंवा तलाव नाहीए. हजारो वर्ष सौदीचे लोक पाण्यासाठी विहिरींवर अवलंबून राहिले. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा वापर वाढला. मात्र पावसाअभावी जमिनीत तितकं पाणी साठू शकलं नाही. हळूहळू विहिरींची खोली वाढत गेली, आणि ती वेळही आली की जेव्हा सगळ्या विहिरी कोरड्या पडल्या.

सौदीत किती पाऊस पडतो? तर बघा.. तलमीज अहमद चार वर्ष सौदीचे राजदूत म्हणून भारतात होते. ते सांगतात "सौदीत दरवर्षी डिसेंबर-जानेवारीत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडतो. पण फक्त एखाद-दुसरा दिवस.

म्हणजे वर्षात एखादा-दुसरा दिवस पाऊस पडतो. अर्थात हे सगळं विंटर स्टॉर्मच्या रुपात घडतं. आणि त्यानं ग्राऊंड वॉटरवर काहीच फरक पडत नाही. तलमीज सांगतात की हा पाऊस नुकसानच जास्त करतो. ते म्हणतात की तिकडे जॉर्डन किंवा सीरियात पाऊस पडला तर सौदीत लोक खूश होतात. कारण त्यांच्याकडे चांगला पाऊस झाला तर सौदीतल्या ग्राऊंड वॉटरवर चांगला परिणाम होतो.

सौदी पाण्यावर किती पैसा खर्च करतो?

सौदीत गोड्या पाण्याची मोठी अडचण आहे. सर्वात आधी सौदीत जमिनीतल्या पाण्याचा वापर करण्याचा आला. पण ते पुरेसं नाही. केवळ सौदीतच नव्हे तर अख्ख्या मध्य पूर्वेत पाण्याची टंचाई आहे. पाण्याच्या कमतरतेमुळेच सौदीला गव्हाचं उत्पादन घेणं बंद करावं लागलं.

सौदीला आपल्या भविष्याकडे पाहून प्रचंड भीती वाटते. 2010 मध्ये विकिलिक्सने अमेरिकेचा एक गोपनीय अहवाल जगासमोर आणला. ज्यात सौदीचे राजे अब्दुल्ला यांनी सौदीतल्या फूड कंपन्यांना परदेशात जमिनी खरेदी करण्यास सांगितलं होतं. म्हणजे तिथून पाणी आणता येईल. विकिलिक्सच्या मते राजकीय अस्थिरतेपासून स्वत:ला वाचवण्यासाठी सौदी अशा प्रकारच्या उपाययोजना करण्यात गुंतला आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा वातावरण कोरडं असताना सौदीत पाणी येतं कुठून

वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टनुसार सौदी अरेबिया आताही आपल्या जीडीपीच्या दोन टक्के पैसा पाण्यावरच्या सबसिडीसाठी खर्च करतो. याच रिपोर्टच्या म्हणण्यानुसार 2050 पर्यंत मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकन देशांना आपल्या जीडीपीच्या 14 टक्के पैसा पाण्यावर खर्च करावा लागेल.

मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 6 टक्के लोक राहतात. मात्र तिथं दोन टक्क्यांपेक्षाही कमी पाणी आहे, ज्याचा पुन्हा वापर होऊ शकेल. हा प्रदेश जगातला सर्वात भयानक दुष्काळी भाग आहे.

अल्जिरिया, बहारीन, कुवैत, जॉर्डन, लिबिया, ओमान, कतार, सौदी, ट्युनिशिया, संयुक्त अरब अमिरात आणि येमेन हे ते देश आहेत. या देशांमध्ये सरासरी 1200 क्युबिक मीटर पाणी आहे. जे जगाच्या तुलनेत सहा पटीनं कमी आहे.

मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील बहुतेक देश पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी स्वत:ला सक्षम समजत नाहीत. वर्ल्ड बँकेनुसार 2050 पर्यंत या देशांमध्ये पाण्याची प्रतिव्यक्ती उपलब्धता अर्ध्यावर येईल.

•शुद्ध केलेलं 943% पाणी सौदीनं वापरलं.

वर्ल्ड बँकेच्या अभ्यासानुसार मृत समुद्राच्या साठ्याइतकं गोडं पाणी सौदीनं वापर करुन संपवलं आहे. हे एक रेकॉर्डच आहे. गल्फ को-ऑपरेशन काऊंसिलच्या देशांमध्ये पाण्याचा वापर केल्यानंतर त्याची भरपाई आणि मागणीत तफावत मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सौदी अरेबियातील वाळवंट

बहारीनने शुद्ध केलेल्या पाण्याच्या साठ्यापेक्षा 220 टक्के अधिक पाणी वापरलं आहे. सौदी अरब 943% आणि कुवेतनं 2465% अधिक पाणी वापरलं आहे. गेल्या 30 वर्षात यूएईमध्ये वॉटर टेबलमध्ये प्रति वर्ष एक मीटरनं घट झाली आहे. वर्ल्ड बँकेच्या अंदाजानुसार पुढच्या 50 वर्षात यूएईमधील गोड्या पाण्याचे सगळे स्त्रोत संपून जातील.

मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेच्या देशांमधील 83 टक्के पाणी कृषी क्षेत्रासाठी वापरलं जातं. सौदीत 1980 च्या दशकापासून आतापर्यंत शेतीसाठी भूगर्भातील पाण्याचा दोन तृतीयांश वापर करण्यात आला आहे. सौदीत भूगर्भातील पाणी हाच एकमेवर स्त्रोत आहे, कारण अख्ख्या देशात एकही नदी नाहीए.

मध्य पूर्व आणि उत्तर अमेरिकेत जगातील एकूण पाण्याच्या फक्त 1% गोडं पाणी आहे. वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टनुसार हे देश आपल्या क्षमतेपेक्षा पाण्याचा अधिक वापर करत आहेत. सौदी अरेबियासुद्धा याच देशांपैकी एक आहे.

सौदी भूगर्भातील पाण्याचा भरपूर वापर करत आहे, मात्र पाऊस नसल्याने जमिनीत पुन्हा पाणी साठण्याचा दुसरा मार्ग नाहीए.

पाणी संपलं तर पर्याय काय?

समुद्रातील पाण्यापासून मीठ वेगळं करणं हा एक उपाय आहे. या प्रक्रियेला डिससॅलिनेशन म्हणतात. जगभर हा उपाय प्रसिद्ध आहे. वर्ल्ड बँकेनुसार मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील देशांमध्ये डिससॅलिनेशनची प्रक्रिया इतर जगाच्या तुलनेत अर्धी आहे. जगातल्या 150 देशांमध्ये समुद्रातील पाण्यातून मीठ वेगळं करुन त्याचा वापर केला जातो.

इंटरनॅशनल डिससॅलिनेशन असोसिएशन (आयडीए) च्या अंदाजानुसार जगभऱातील 30 कोटी लोक डिससॅलिनेशन केल्यानंतर मिळणाऱ्या पाण्याचा रोजच्या वापरासाठी उपयोग करतात. अर्थात डिससॅलिनेशनची प्रक्रिया महाजटिल आहे. वीजेची निर्भरताही याच डिससॅलिनेशन प्लांटवर अवलंबून आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पाणी नसताना सौदीत शेती कशी करतात?

यामुळे कार्बन उत्सर्जन होतं. यात जीवाश्म इंधनाचाही वापर होतो. वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार यामुळे समुद्रातील जैवविविधतेवरही परिणाम होत आहे.

आयडीएचे सरचिटणीस शैनोन मॅकार्थींच्या म्हणण्यानुसार "खाडीच्या देशांमध्ये डिससॅलिनेशन प्रक्रियेमुळे पाणी घराघरात पोहोचवले जाते. काही देशांमध्ये यावरचं अवलंबित्व तब्बल 90 टक्क्यांवर पोहोचलं आहे."

मॅकार्थी सांगतात "या देशांसमोर डिससॅलिनेशनशिवाय कुठलाही पर्याय नाहीए. याप्रकारच्या अपारंपरिक पाण्यावर मोठा खर्चही होतो. अर्थात गरीब देशांना हे परवडणारं नाही. त्यामुळेच येमेन,लिबिया आणि वेस्ट बँक परिसरात लोक भूगर्भातील पाण्यावरच अवलंबून आहेत.

तलमीज अहमद यांच्या म्हणण्यानुसार सौदी श्रीमंत आहे, पण अन्न आणि पाण्याबाबत पूर्णत: असुरक्षित आहे.

ते सांगतात "खाण्यापिण्याचं सगळं साहित्य सौदी परदेशातून खरेदी करतो. तिथं खजूर सोडून कशाचंही उत्पादन होत नाही. भूगर्भातील पाण्यावर सौदी चालणार नाही, कारण ते जमिनीत शिल्लकच नाहीए. गेल्या 50 वर्षापासून सौदी समुद्रातील पाण्यातून मीठ बाजूला काढून त्याचा वापर करत आहे. इथं दरवर्षाला नवे डिससॅलिनेशन प्लांट लावले जातात, आणि अपग्रेड केले जातात. आणि हे प्रचंड खर्चिक आहे. हे गरीब देशांच्या आवाक्याबाहेरचं आहे. येमेन एवढा खर्च करण्यासाठी सक्षम नाहीए. मला माहिती नाही, की भविष्यात डिससॅलिनेशन किती सुलभ होईल किंवा त्यात किती अडचणी येतील"

सौदीत झाड तोडणं गुन्हा आहे

रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार सौदीची गणती अशा देशांमध्ये होते, जिथं नागरिकांना पाण्यासाठी सर्वात जास्त सबसिडी दिली जाते.

2015 मध्ये सौदीनं उद्योग धंद्यात पाण्याच्या वापरावरचा कर प्रति क्युबिक चार रियालवरुन 9 रियाल एवढा केला आहे. रिपोर्टनुसार सरकार घरगुती वापराच्या पाण्यावर प्रचंड सबसिडी देतं, त्यामुळे लोकांना पाणी स्वस्त मिळतं.

तलमीज अहमद सांगतात की सौदीनं आपल्या जमिनीवर गव्हाचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला, पण तो महागात पडला. त्यांच्या म्हणण्यानुसार "सौदीनं गव्हाचं फिल्ड बनवलं. त्यासाठी इतकं पाणी लागलं की जमिनीवर मीठ पसरलं. काही वर्षात ही सगळी जमीन पडीक झाली. हा परिसर विषारी झाला. हा पूर्ण इलाका बंदिस्त करण्यात आला आहे. भाजीपाला घेतला जातो, पण तोही खूपच संरक्षित भागात. खजूर इथलं सामान्य फळ आणि पीक आहे. खजूर एक असं फळ आहे, ज्यात सगळं काही आहे. पण अधिक खजूर खाल्ला तर शरीरात साखर वाढण्याची भीती असते. इथं झाड तोडणं मोठा गुन्हा आहे."

सौदीनं जेव्हा आधुनिक पद्धतीनं शेती करायला सुरुवात केली, तेव्हा भूजल पातळी 500 क्युबिक किलोमीटर खाली गेला. नॅशनल जिओग्राफीनुसार एवढ्या पाण्यात अमेरिकेतला एक तलाव भरतो.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सौदीतलं एक दृश्य

या रिपोर्टनुसार शेतीसाठी दरवर्षी भूगर्भातून 21 क्युबिक किलोमीटर पाणी उपसलं जातं. ज्याची भरपाई होत नाही. स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज इन लंडन या संस्थेनं सौदीतून पाणी उपसण्याच्या प्रमाणावर एक रिपोर्ट तयार केला आहे.

या रिपोर्टनुसार सौदीनं आतापर्यंत चार ते पाच चतुर्थांश पाणी आधीच वापरलं आहे. नासाच्या अहवालानुसार सौदीनं 2002 ते 2016 या कालावधीत प्रत्येक वर्षात 6.1 गिगाटन पाणी खर्च केलं आहे.

हवामानातील बदलांचा सर्वात वाईट परिणाम अरबी देशांवर झाला आहे. मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेवर पाण्याशिवाय राहण्याची नामुष्की ओढावू शकते. एकवेळ पेट्रोलशिवाय माणूस जगू शकतो, पण पाण्याशिवाय त्याचं अस्तित्व उरणार नाही. अर्थात सौदी अरेबिया हे सगळं नीट जाणून आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)