'ठग्स ऑफ हिंदुस्तान'साठी आमिर खान करणार चीनमध्ये रोड शो

आमिर खान Image copyright Getty Images

चीनच्या शिनजियांगमधील एका मुलीच्या गायनाचा व्हीडिओ तेथील सोशल मीडिया साईट वीबोवर लोकप्रिय ठरला आहे. या व्हीडिओत संबंधित मुलगी अभिनेता आमिर खानच्या सिक्रेट सुपरस्टार चित्रपटातील 'नचदी फिरा' हे गाणं गाताना दिसून येत आहे.

आमिर खानच्या उपस्थितीत ही मुलगी हे गाणं गात आहे. आमिर खान सध्या 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चीनमध्ये आहे.

प्रेक्षागृहात बसलेल्या मुलीचं गाणं ऐकून आमिरनं तिची प्रशंसा केली. "तू हे गाणं खूपच छान गायली आहेस. हे गाणं अवघड आहे," असं तो म्हणाला.

यानंतर या मुलीनं आमिर खानला शिनजियांग क्षेत्राची सांस्कृतिक ओळख असलेली एक पारंपरिक टोपी भेट दिली.

शियान शहरातल्या शिडियन विद्यापीठात 18 डिसेंबरला हा व्हीडिओ शूट करण्यात आला होता. तेव्हापासून जवळपास 70 हजार लोकांनी हा व्हीडिओ बघितला आहे तर जवळपास 1,500 जणांनी हा व्हीडिओ शेयर केला आहे.

चीनमध्ये आमिरचा रोड-शो

ठग्स ऑफ हिंदुस्तान हा चित्रपट 28 डिसेंबरला चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिर खान तिथं 10 दिवस रोड शो करणार आहे.

चीनच्या संस्कृतीशी संबंधित टोपी घातल्यामुळे वीबो युजर्स आमिरची प्रशंसा करत आहेत. शिनजियांगच्या एका वापरकर्त्यानं लिहिलंय की, "ही टोपी मैत्रीचं प्रतीक आहे."

Image copyright WEIBO

आमिर खाननं जिहू या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चीनमधील त्याच्या चाहत्यांना धन्यवाद म्हटलं आहे.

"चीनच्या लोकांनी दिलेल्या प्रेमामुळे माझं मन भरून आलं आहे. मला नेहमीच इथल्या लोकांचं प्रेम लाभलं आहे," असं आमिरनं म्हटलं आहे.

आमिर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हैनान, ग्वांगझू आदी शहरांत जाऊन आला आहे.

चीनच्या कोणकोणत्या शहरांत जायला हवं, अशी त्यानं चीनमधील युवकांकडे विचारणाही केली आहे.

Image copyright Wibeo

चीनमध्ये आमिरची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढली आहे. 3 इडियट्स, दंगल, सीक्रेट सुपरस्टारनंतर आता त्याचा ठग्स ऑफ हिंदुस्तान चीनमध्ये प्रदर्शित होत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)