अमेरिकेचे संरक्षणमंत्री जीम मॅटिस यांचा राजीनामा

जीम मॅटिस

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेचे संरक्षणमंत्री जीम मॅटिस यांनी राजीनामा दिला असून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस ते पद सोडतील असं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जाहीर केलं आहे.

जीम मॅटिस यांनी राजीनामा देण्याच्या एक दिवस आधी ट्रंप यांनी सीरियामधून अमेरिकन फौजा माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला होता. जनरल मॅटिस यांच्यानंतर या पदाची जबाबदारी कोणाकडे देण्यात येईल याची घोषणा ट्रंप यांनी केली नसली तरी लवकरच निवड होईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

'सहकारी देशांना सन्मानाने वागवणे आणि संरक्षण पुरवण्यासाठी अमेरिकेच्या सर्व उपायांचा वापर करणे' या मुद्द्यांवर त्यांनी त्यांच्या राजीनाम्यात लिहिलं आहे.

"हे आणि इतर मुद्द्यांवर तुमच्याशी मतं जुळणाऱ्या संरक्षणमंत्र्याची नेमणूक करण्याचा अधिकार तुम्हाला आहे, त्यामुळे मी पदावरून बाजूला होणं योग्य वाटतं," असं मत मॅटिस यांनी राजीनाम्यात मांडलं आहे.

याबाबत रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे, "जनरल मॅटिस यांना राष्ट्राध्यक्ष (ट्रंप) आणि आपल्या राष्ट्राला सेवा देता आली याबद्दल अभिमान वाटला पाहिजे. कट्टर इस्लामवादाविरोधात त्यांनी अनेक दशकं लढा दिला असून ट्रंप यांना नैतिक लष्करी सल्ला दिला आहे."

तर मार्को रुबियो यांनी मॅटिस यांनी राजीनामा देणं भीतीदायक असल्याचे म्हटलं आहे. "ट्रंप यांच्या प्रशासनातील गोंधळात जनरल मॅटिस हे एकमेव स्थैर्य असलेलं बेट होतं," असं ते म्हणाले आहेत.

ट्रंप सीरियाबद्दल काय म्हणाले होते?

सीरियामध्ये इस्लामिक स्टेटचा पराभव केल्याचे सांगत ट्रंप यांनी सीरियामधील फौजा मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे त्यांच्यावर टीका सुरू झाली.

लष्करी फौजा मागे घेतल्या तर रणनितीमधील ती मोठी चूक ठरेल असा इशारा मॅटिस यांनी दिला होता त्यामुळे ट्रंप यांच्या निर्णयाने मॅटिस अडचणीत आल्याची चर्चा केली जात होती.

पेंटेगॉन आणि व्हाइट हाऊस यांनी दिलेल्या माहितीमध्ये "अमेरिकन सैन्याने माघारी येण्यास सुरुवात केली असून 'मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये' प्रवेश सुरू केला आहे", असं म्हटलं आहे.

सैन्याचं रक्षण आणि मोहिमेसंदर्भातील संरक्षणात्मक कारणांमुळे पुढील माहिती देता येणार नाही, असं पेंटेगॉनने स्पष्ट केलं आहे. "ऐतिहासिक विजय" मिळवल्यानंतर फौजांनी परत येण्याची वेळ आली आहे, असं राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी सांगितलं.

अमेरिकेच्या निर्णयावर इतर देशांच्या प्रतिक्रिया

अमेरिकेच्या निर्णयावर इस्रायलनं सैन्य माघारीच्या प्रक्रियेचा आणि त्याचा आमच्यावर काय परिणाम होईल याचा अभ्यास करू, असं सांगत या प्रदेशावर अमेरिकेने इतर मार्गांनी प्रभाव ठेवावा अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सीरियामध्ये राजकीय व्यवस्था येण्यासाठी खराखुरा मार्ग अमेरिकेच्या या निर्णयामुळे तयार होईल, असं रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी वन टिव्ही या सरकारी वाहिनीवर सांगितलं.

राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी सीरियामधून लष्करी तुकड्या मागे घेण्याचे वचन पूर्वीच दिलं होतं. मात्र अचानक केलेली ही घोषणी त्यांच्याच अधिकाऱ्यांना धक्का देणारी ठरली.

इस्लामिक स्टेटच्या पराभवासाठी स्थापन झालेल्या आघाडीतील राष्ट्राध्यक्ष नियुक्त विशेष प्रतिनिधी ब्रेट मॅकगुर्क यांनी गेल्याच आठवड्यात याबाबत त्यांच मत व्यक्त केलं होतं. ते म्हणाले होते, "आयसिस आता नष्ट होणार असं कोणीच म्हणत नाही, तितकं भोळं कोणीच नाही. त्यामुळे त्या सर्व प्रदेशामध्ये स्थैर्य राहाण्यासाठी आम्हाला तिथं थांबण्याची इच्छा आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)