इंडोनेशियात त्सुनामीचा धोका कायम, आतापर्यंत 373 जणांचा मृत्यू

इंडोनेशिया

फोटो स्रोत, Getty Images

शेकडोंचे प्राण घेणाऱ्या त्सुनामीनंतर इंडोनेशियातील क्रेकाटोआ ज्वालामुखीच्या जवळपासच्या किनारी भागातील रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. अजून एखादी त्सुनामी येण्याची शक्यता गृहीत धरून रहिवाशांना किनाऱ्यापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे.

इंडोनेशियामध्ये शनिवारी आलेल्या सुनामीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा आकडा 373 वर पोहोचला आहे. तर 1400 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. तसंच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमींचा शोध सुरु आहे.

शनिवारच्या प्रलयानंतर रविवारी पुन्हा एकदा क्रेकाटोआचा उद्रेक होऊन राख तसंच धूर बाहेर पडल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

इंडोनेशियातील विध्वंस आतापर्यंत...

 • आतापर्यंत 373 लोकांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
 • 1400 पेक्षा जास्त लोक जखमी, शेकडो इमारती उध्वस्त
 • सुंदा खाडीच्या दोन्ही बाजूला जावा आणि सुमात्राच्या किनाऱ्यावर अचानक त्सुनामी धडकली
 • त्सुनामीमुळे एका ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याची शक्यता, त्यामुळे उंच लाटा उसळल्या
 • पुन्हा त्सुनामीचा धोका, त्यामुळे किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याची सूचना
 • शनिवारी रात्री 9.30 वाजता त्सुनामी आली
 • सुटीचा दिवस असल्यानं लोकप्रिय पर्यटनस्थळांवर गर्दी होती, नुकसान अधिक झालं
 • सरकारच्या माहितीनुसार आतापर्यंत 1400 लोक जखमी झाले, 128 लोक अजूनही बेपत्ता आहेत
 • सुंदा खाडीच्या आसपास जावा आणि सुमात्राच्या परिसरात अजूनही आपत्कालीन मदत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

इंडोनेशियातील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे प्रवक्ते सुतोपो पूर्वो नुग्रोहो यांनी सांगितले, की अनक क्रेकाटोआमधून होत असलेल्या उद्रेकांमुळे अजून एखादी त्सुनामी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हवामानशास्त्र आणि भूभौतिक संस्थेने स्थानिक रहिवाशांना किनारी परिसरात कोणत्याही निमित्ताने न जाण्याचा इशारा दिला आहे.

रविवारी क्रेकाटोआचा पुन्हा उद्रेक

एका चार्टर विमानामधून क्रेकाटोआ परिसरातील दृश्यं टिपली आहेत. या दृश्यांवरून जावा आणि सुमात्रा दरम्यानच्या सुंदा सामुद्रधुनी परिसरातील ज्वालामुखीच्या उद्रेकाची तीव्रता लक्षात येते. अनक क्रेकाटोआ बेटावरील क्रेकाटोआ ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर समुद्रतळाशी झालेल्या भूस्खलनामुळे ही त्सुनामी आल्याचा अंदाज आहे.

या त्सुनामीत शेकडो इमारतींचं नुकसान झाल्याचं इंडोनेशियाच्या आपत्कालीन व्यवस्था संस्थेनं सांगितलं आहे. बचाव पथकाला अजूनही अनेक भागांमध्ये पोहोचता आलेलं नाही त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्सुनामी आलेल्या सर्व भागांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.

सुंदा खाडीजवळ सर्वाज जास्त मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. सुंदा सामुद्रधुनी ही जावा आणि सुमात्रा बेटांच्या मध्ये आहे. ही सामुद्रधुनी जावा समुद्र आणि हिंदी महासागर यांना जोडते.

स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री 9.30 वाजता ही त्सुनामी इंडोनेशियाच्या तटावर आदळली. या त्सुनामीनंतर पांडेग्लांग, लांपुंग आणि सेरांग प्रांतांमध्ये हाहाकार माजला. बीबीसीच्या इंडोनेशियातील प्रतिनिधी रिबेका हेन्शके यांनी लापुंगमध्ये सर्वाधिक जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवली.

इंडोनेशियाला त्सुनामीचा तडाखा बसल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी 'तीव्र दुःख' व्यक्त केलं होतं. दुर्घटना पीडितांना शोधण्यासाठी आणि जखमींवर उपचार करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं होतं.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी "आम्ही मदतीसाठी तयार आहोत" असं ट्वीट केलं होतं. "ज्या लोकांनी आपल्या आप्तांना गमावलंय तसंच जखमी आणि त्यांच्या कुटुंबीयाबरोबर आम्ही आहोत," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

'त्सुनामीच्या दोन लाटा होत्या'

इंडोनेशियात ज्वालामुखी उद्रेकानंतर त्सुनामीच्या दोन लाटा आल्याचं ऑयस्टीन लंड अँडरसन या छायाचित्रकाराने बीबीसीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, "मी त्यावेळेस किनाऱ्यावर एकटाच होतो आणि माझे कुटुंबीय हॉटेलमधील खोलीत झोपले होते. क्रेकाटोआवरील उद्रेकाचे मी फोटो काढत होतो.

फोटो स्रोत, OYSTEIN LUND ANDERSEN

फोटो कॅप्शन,

अनक क्रेकाटोआ ज्वालामुखीचा शनिवारी घेतलेला फोटो.

"त्याच्या आदल्या संध्याकाळी ज्वालामुखी उद्रेक जोरदार होता. मात्र त्सुनामी आधीच्या काळात उद्रेक झाला नव्हता. तेव्हा केवळ अंधार होता. तेव्हा मी अचानक मोठी लाट येताना पाहिली आणि मी पळालो. एकूण दोन लाटा होत्या. त्यातील पहिली तितकी शक्तिशाली नव्हती, म्हणून मी पळू शकलो.

"मी सरळ हॉटेलमधील खोलीत गेलो आणि झोपी गेलेल्या माझ्या पत्नी आणि मुलाला घेऊन निघालो. तितक्यात आणखी मोठी लाट येत असल्याचा आवाज आला. ही लाट किनाऱ्यावर आदळताना मी खिडकीतून पाहिलं. लाटेमुळे हॉटेलमध्येही पाणी आलं. आम्ही आणि काही लोक हॉटेलजवळच्या जंगलात उंचावर येऊन थांबलो. अजूनही आम्ही तेथेच आहोत."

फोटो स्रोत, BNPB

फोटो कॅप्शन,

इंडोनेशियाच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेने जारी केलेले फोटो

काय आहे त्सुनामी?

समुद्राच्या आत जेव्हा मोठ्या हालचाली सुरू होतात, तेव्हा उंच आणि लांब लाटांची आवर्तनं सुरू होतात. या लाटा जबरदस्त वेगाने किनाऱ्याकडे येऊ लागतात आणि किनाऱ्याला धडकताना त्या रौद्र रूप धारण करतात. याच लाटांना त्सुनामी म्हटलं जातं.

'त्सुनामी' हा जपानी शब्द असून तो 'त्सू' आणि 'नामी', या दोन शब्दांपासून बनला आहे. 'त्सू' याचा अर्थ किनारपट्टी असा होता आणि 'नामी' याचा अर्थ लाटा आहे.

फोटो कॅप्शन,

क्रेकाटोआ ज्वालामुखीचं ठिकाण

पूर्वीच्या काळी त्सुनामीला समुद्राला येणाऱ्या भरती किंवा उधाणासारखे समजले जाई, मात्र ते तसे नाही. चंद्र-सूर्य आणि ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे समुद्राच्या लाटा तयार होत असतात. मात्र त्सुनामीचे तसे नाही. त्सुनामीच्या लाटा सामान्य़ लाटांपेक्षा वेगळ्या असतात.

त्सुनामी लाटा तयार होण्यामागे अनेक कारणे आहेत मात्र भूकंप हे त्यामागचे सर्वांत मोठे कारण आहे. याशिवाय भूस्खलन, ज्वालामुखी उद्रेक, विस्फोट होणे किंवा कधीकधी उल्कापातामुळेही त्सुनामी लाटा तयार होतात. त्सुनामी लाटा समुद्रकिनाऱ्यावर जोरात आपटत असल्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते.

त्सुनामीचा अंदाज लावता येऊ शकतो का?

ज्याप्रकारे भूकंपाबाबत भविष्यवाणी केली जाऊ शकत नाही, त्याचप्रकारे त्सुनामीचा अंदाज लावता येत नाही. मात्र त्सुनामीचे आतापर्यंतची माहिती पाहून आणि बेटांची स्थिती पाहून शास्त्रज्ञ थोडाफार अंदाज वर्तवू शकतात.

फोटो स्रोत, GALLO IMAGES/ORBITAL HORIZON/COPERNICUS SENTIN

पृथ्वीवरील भूतबके (प्लेट्स) जेथे एकमेकांशी मिळतात, ज्याला फॉल्टलाईन म्हणतात, त्याच्या आसपासच्या समुद्रामध्ये त्सुनामीचा जास्त धोका असतो.

भूकंपामुळे त्सुनामी लाटा कशा तयार होतात?

मोठे भूकंप झाल्यावर समुद्राच्या पाण्याचा वरचा भाग वेगाने पुढे सरकतो आणि त्याच वेगाने त्याची पातळीही वाढू लागते. या स्थितीमुळे ज्या लाटा तयार होतात त्यास त्सुनामी लाटा म्हणतात.

पृथ्वीची स्थिती समजून घेण्यासाठी आपण अंड्याचे उदाहरण घेऊ. तडे गेलेल्या अंड्याप्रमाणेच ही स्थिती आहे. अंड्याचं कवच कठीण असलं तरी त्याच्या आतील पदार्थ पातळ लिबलिबित असतो.

पृथ्वीवरील अशाच भेगा भूकंपामुळे विस्तारतात आणि त्यामुळे तयार झालेल्या हालचालींमुळे आतील प्रवाही पदार्थ उर्ध्वदिशेने येऊ लागतो.

पृथ्वीवरील भूतबके जेव्हा कोणत्याही कारणांमुळे विस्तारतात तेव्हा खंडांची निर्मिती होते. याचप्रकारे त्सुनामीची निर्मिती होत असते.

अर्थात प्रत्येक भूकंपामुळे त्सुनामीच्या लाटा तयार होतीलच, असं नाही. त्यासाठी भूकंपाचे केंद्र समुद्रामध्ये किंवा त्याच्याजवळ असले पाहिजे.

क्रेकाटोआ ज्वालामुखीबद्दल

1883च्या ऑगस्ट महिन्यात या पर्वतावर आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा ज्वालामुखी उद्रेक झाल्याचे मानले जाते.

 • त्यानंतर त्सुनामीच्या आलेल्या 135 फुट उंच लाटांमुळे 30 हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते.
 • ज्वालामुखीच्या गरम राखेमुळे हजारो लोकांचे प्राण गेले होते.
 • हिरोशिमावर टाकलेल्या बाँबपेक्षा या उद्रेकाची तीव्रता 13 हजार पटीने जास्त होती.
 • त्यापुढील वर्षात तापमानामध्ये 1 अंशाने घट झाली.
 • ज्वालामुखीचे बेट जवळजवळ नाहीसे झाले.

हे वाचलंत का?

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)