नसीरुद्दीन शाहांच्या वक्तव्यावरून पाकिस्तान का काढत आहे जिन्नांची आठवण?

नसीरुद्दीन शाह

फोटो स्रोत, Getty Images

प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी जमावाच्या हिंसाचाराबद्दल व्यक्त केलेल्या वक्तव्यांवरुन भारतात सुरू असलेल्या वादाचे पडसाद पाकिस्तानातही उमटले आहेत. नसीरुद्दीन शहांच्या संदर्भातील प्रत्येक बातमीला पाकिस्तानी माध्यमांमधून प्रसिद्धी दिली जात आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना तर नसीरुद्दिन यांच्या निमित्ताने मोहम्मद अली जिन्नांचीच आठवण आली आहे.

इम्रान खान यांनी शनिवारी लाहौरमध्ये बोलताना म्हटलं, "की भारतात मुसलमानांना बरोबरीचे अधिकार मिळणार नसल्याने पाकिस्तानची मागणी करत असल्याचं जिन्नांनी म्हटलं होतं. त्यांचा दृष्टिकोन योग्य असल्याचंच दिसून येत आहे. अल्पसंख्याकांना कशी वागणूक द्यायची हे आपण पंतप्रधान मोदींना दाखवून देऊ."

जिन्नांना नको होती दुय्यम वागणूक

प्रसिद्ध पत्रकार हामिद मीर यांनीही याप्रकरणी ट्वीट केलं होतं.

"आमिर खान, शाहरुख खान आणि नसीरुद्दीन शाह. कित्येक धर्मनिरपेक्ष आणि उदार मुसलमानांना भारतात असुरक्षित वाटतं. या लोकांच्या विरुद्ध द्वेष आणि खोटा प्रचार केला जात आहे. मोहम्मद अली जिन्नांनी 1947 साली जे केलं त्याचंच समर्थन भारतातील घटनांमुळे होत आहे."

पंतप्रधान इम्रान खान यांनी हामिद मीर यांचीच री ओढली. त्यांनी म्हटलं, "कायदे आझम मोहम्मद अली जिन्ना काँग्रेसचे मान्यवर नेते होते. ते विचारी होते. नेहमी हिंदू-मुसलमान ऐक्याची भाषा करायचे. मात्र काँग्रेस ज्या भारताचा पुरस्कार करत होती त्यात मुसलमानांना योग्य स्थान मिळणार नाही याची जाणीव झाल्यानंच त्यांनी वेगळं होण्याची मागणी केली. वेगळ्या पाकिस्तानसाठी संघर्ष केला. दुय्यम दर्जाचे नागरिक बनून राहण्याची त्यांची इच्छा नव्हती. आज नसीरुद्दीन शाह जे म्हणत आहेत, तेच कायदे आझम तेव्हा म्हणत होते."

पाकिस्तानमधल्या सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी इम्रान खान यांच्या वक्तव्याला ठळक प्रसिद्धी दिली आहे.

'इम्रान यांनी स्वतःच्या देशाकडे लक्ष द्यावं'

इम्रान खान यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नसीरुद्दीन शाह यांनी म्हटले, की इम्रान खान यांनी आपल्या देशाकडे लक्ष द्यावं. आमच्या देशात गेली 70 वर्षे लोकशाही आहे आणि ही समस्या कशी सोडवायची हे आम्हाला माहीत आहे.

भाजपचे खासदार राकेश सिन्हा यांनीही इम्रान खान यांना प्रत्युत्तर देणारे ट्वीट केलं आहे. "इम्रान खान, सगळ्या जगाला ठाऊक आहे, की गेल्या 70 वर्षांत पाकिस्तानमधल्या हिंदूंची संख्या 23 टक्क्यांवरून एक टक्क्यावर आली आहे आणि भारतात मुसलमानांची संख्या 9 टक्क्यांवरून 14 टक्के झाली आहे."

राकेश सिन्हांची टीका

इम्रान खान यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यापूर्वी राकेश सिन्हा यांनी नसीरुद्दीन शहांच्या विधानावरही कडाडून टीका केली होती. नसीरुद्दीन देशाची बदनामी करत असल्याचं ट्वीट राकेश सिन्हा यांनी केले होतं.

केवळ राकेश सिन्हाच नाही, तर अनेकांनी नसीरुद्दीन यांच्या वक्तव्याला विरोध केला. अशा विधानांमुळे जगभरात देशाची प्रतिमा खराब होत असल्याचं मत योगगुरु बाबा रामदेव यांनी व्यक्त केलं.

नसीरुद्दीन यांचं विधान चुकीचं असल्याची प्रतिक्रिया अभिनेते अनुपम खेर यांनीही व्यक्त केली आहे.

ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी मात्र नसीरुद्दीन शाह यांचं समर्थन केलं आहे. नसीर यांची चिंता योग्य असल्याचं मत शेखर गुप्तांनी व्यक्त केलं.

नसीरुद्दीन यांचं स्पष्टीकरण

फोटो स्रोत, Getty Images

नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं होतं, की देशातील वातावरण पाहून माझ्या मुलांची मला चिंता वाटते. जमावाने त्यांची वाट अडवून ते हिंदू आहेत की मुसलमान असा प्रश्न विचारला तर काय?

"माझ्या मुलांना मी धर्माची शिकवण दिलेलीच नाही. या वातावरणाची मला भीती वाटत नाही, तर राग येतो."

नसीरुद्दीन शाह यांच्या विधानावर उलटसुलट प्रक्रियांचा ओघ सुरु झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं.

"मी केवळ माझी चिंता बोलून दाखविली होती. मला नाही वाटत यामध्ये काही देशद्रोह आहे. ज्या देशावर माझं प्रेम आहे, त्या देशाविषयी चिंता व्यक्त करणं देशद्रोह कसा असू शकतं," असं नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं.

मात्र तरीही नसीरुद्दीन यांच्या विरोधात तयार होणारं वातावरण पाहून अजमेरमधील लिटरेचर फेस्टिव्हलच्या आयोजकांनी त्यांना तिथं येण्यापासून परावृत्त केलं.

मात्र आयोजकांच्या या भूमिकेवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयोजकांनी नसीरुद्दीन यांना असं सांगणं हे खरंच खूप दुर्दैवी आहे. प्रशासन त्यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार होतं, असं गेहलोत यांनी म्हटलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)