येशू आणि मेरीचा उल्लेख इस्लाममध्ये कसा काय?

  • एम्री अझिझलर्ली
  • बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
कुराणात येशूचा उल्लेख

फोटो स्रोत, Getty Images

मी इंग्लंडमध्ये 21 वर्षांपूर्वी आलो. तेव्हापासून ख्रिसमसच्या वेळी एक प्रश्न मला सातत्याने विचारला जातो - "मग टर्कीमध्ये ख्रिसमस कसा साजरा केला जातो?"

टर्की हा मुस्लीमबहुल देश आहे, असं मी सांगतो. त्यामुळे 25 डिसेंबर हा आमच्यासाठी सर्वसाधारण दिवस असतो. ख्रिसमस वगैरे साजरा होत नाही.

पाश्चात्त्य देशातली मंडळी हे ऐकून अचंबित होऊ शकतात. त्यांना असं वाटतं की ख्रिसमस हा आंतरराष्ट्रीय सण आहे आणि तो जगभर साजरा केला जातो. पण तसं नाही.

आणि हे फक्त टर्कीत आहे, असं नाही. जगातल्या बहुतांश देशांमध्ये तर ख्रिसमसचा सण ठाऊकही नसेल.

येशूचा जन्माचा सोहळा म्हणजे ख्रिसमस. ख्रिश्चन धर्माचे उद्गाते म्हणून येशूंकडे पाहिलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

ख्रिसमसनिमित्त करण्यात आलेली रोषणाई

ज्यू, हिंदू आणि मुस्लीम कॅलेंडरमध्ये ख्रिसमसची सुट्टी नसते. मुस्लीम कुटुंबांमध्ये घरचे सगळे एकत्र येऊन ईद साजरी करतात. पण तसं ते ख्रिसमसला करत नाहीत.

दोन धर्म आणि संस्कृतीमधला फरक समजून घेणं आवश्यक आहे. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माला एकत्र सांधणारा दुवा म्हणजे येशू.

तुम्ही म्हणाल आता हे काय नवीन? पण हो, अनेकांसाठी येशू आणि इस्लाम हे कनेक्शन ऐकणंही आश्चर्याचं वाटत असेल.

इस्लाम धर्मात येशूंचा जन्मदिवस साजरा होत नाही, पण ते आदरणीय आहेतच. मुसलमानांच्या मनात येशू या ख्रिश्चन धर्माच्या संस्थापकांबद्दल अतीव आदर असतो.

फोटो कॅप्शन,

कुराणात असलेलं मेरी यांचं चित्र

येशूला अरबी भाषेत इसा नावाने ओळखलं जातं. इस्लामचा धर्मग्रंथ कुराणमध्ये येशूचा उल्लेख अनेकदा येतो. कुराणानुसार येशू हे अतीव आदरस्थानी आहेत, अगदी प्रेषित मोहम्मदप्रमाणेच येशूलाही अढळस्थानी मानलं जातं.

एवढंच नव्हे तर, इस्लाम धर्मीयांसाठी पवित्र अशा कुराणमध्ये उल्लेख होणाऱ्या मेरी एकमेव महिला आहे.

मेरी, जिला अरबी भाषेत मरियम म्हटलं जातं, तिच्याबद्दलही कुराणमध्ये एक अख्खं प्रकरण आहे. 'कुमारिका मेरी'ने कसा येशूला जन्म दिला, ही गोष्ट सविस्तरपणे मांडण्यात आली आहे.

पण या कथेत येशूच्या जन्मावेळी तिथे आणखी कुणीच नव्हतं, ना जोसेफ, ना दुसरी कुठलीही व्यक्ती.

कुराणच्या या अध्यायानुसार मेरी येशूला वाळवंटात एकट्यानेच जन्म देते. त्यानंतर एका वठलेल्या खजुराच्या झाडाखाली ती आश्रय घेते. काही वेळाने चमत्कारिकरीत्या ते झाड पुनरुज्जीवित होऊन पिकलेल्या खजुरांचा वर्षाव होतो आणि एक छोटी नदी तिच्या पायाशेजारून वाहू लागते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

मेरी आणि तिच्या पुत्राच्या जन्मकहाणीचा सगळ्या संस्कृतीत उल्लेख आहे.

पण एका कुमारिका मातेजवळ असलेल्या या मुलामुळे तिच्या चारित्र्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतो. मग ते नवजात बाळ येशूच देवदूताच्या रूपात या प्रश्नांची उत्तरं देऊ लागतो, अशी पुढे ही आख्यायिका आहे.

हा चमत्कार मरियमला पाठबळ देतो. एक प्रकारे या प्रसंगाकडे समाजातील पूर्वग्रहावरील विजयाचं द्योतक म्हणून पाहिलं जातं.

प्रेषितांचा पवित्र आत्मा

मुस्लीम जगतात येशूकडेही प्रेषित मोहम्मद यांच्याप्रमाणेच शांततेचा दूत म्हणूनच पाहिलं जातं. मुस्लीम मन्यतेनुसार अंतिम परीक्षा अथवा 'कयामत'च्या घडीला कोण येऊन आपलं हे जग तारेल, माहितीये?

याचं उत्तर येशू असंच आहे. प्रेषितांचा दुसरा अवतार येशू असतील असा याचा अर्थ काढला जातो.

कुराण व्यतिरिक्त इतर मुस्लीम साहित्यातही येशूंचा उल्लेख आहे. सुफी तत्त्वज्ञ अल-गझली येशूचं वर्णन "आत्म्याचा दूत" म्हणून करतात. तर इब्न अरबी येशूला "संतांचा संत" असं म्हणतात.

संपूर्ण मुस्लीम जगतात तुम्हाला इसा नावाची मुलं आणि मरियम नावाच्या मुली दिसतील. पण एखाद्या ख्रिश्चन कुटुंबानं त्यांच्या मुलाचं नाव मोहम्मद ठेवल्याची कल्पना तुम्ही करू शकता?

त्याचं कारण आहे इस्लामच्या सुरुवातीच्या काळापासूनच लोकांना येशूबद्दल माहिती होती. ज्या 7व्या शतकात इस्लाम धर्म म्हणून नावारूपास आला त्याच्या आधीपासूनच मध्य-पूर्वेत ख्रिश्चन धर्मांनं जम बसवला होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

इटलीतील सॅन पेट्रोनिओ चर्च उडवून देण्याच्या कटाप्रकरणी पाचजणांना अटक करण्यात आली होती.

पण बायबलमध्ये प्रेषित मोहम्मद यांचा उल्लेख नसणं साहजिक आहे. इस्लाममध्ये येशूला आदरणीय स्थान देण्यात आलं, मात्र तसा दृष्टिकोन चर्चने मोहम्मदांबाबत अंगीकारला नाही.

इटलीच्या बोलोन्या शहरातील सॅन पेट्रोनिओ चर्चमध्ये एक 15व्या शतकातलं चित्र आहे, ज्यात मोहम्मदला नरकातील दुष्टांशी लढताना दाखवण्यात आलं आहे.

युरोपातील अनेक तत्कालीन कलाकृती याच धर्तीवर काढण्यात आल्या होत्या.

नरकाचा नववा फेरा

इटालियन कलाकार जिओव्हानी डा मोडेना हे दाँटे नावाच्या एका कवीपासून प्रेरित झाले होते. दाँटे यांनी 'डिव्हाइन कॉमेडी' या पुस्तकात मोहम्मदला नरकाच्या नवव्या फेऱ्यात दाखवलं होतं. आणि केवळ मोडेनाच नव्हे तर 18व्या शतकापर्यंत अनेक कलाकारांनी या पुस्तकातून प्रेरणा घेतली होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

जिहादी हल्ल्यांचा निषेध नोंदवण्यासाठी आयोजित चर्चमधील कार्यक्रमात मुस्लीम

त्यापैकीच एक म्हणजे, इंग्रजी काव्य आणि चित्रविश्वातलं नाणावलेलं व्यक्तिमत्त्व विल्यम ब्लेक. एका बेल्जियम चर्चमध्ये लावण्यात आलेल्या त्यांच्या एका 17व्या शतकातील कलाकृतीत ते मुहम्मद यांना फरिस्ते पायाखाली चिरडताना दाखवण्यात आलं होतं.

अर्थातच कालांतराने चर्चने आपली भूमिका बदलली आहे. पण प्रत्येक काळात काही ना काही दडपणं असतात, आजही आहेत, काही पूर्वग्रह आहेत आणि हिंसाचारही उफाळला आहे.

आंतरधर्मीय संवाद

2002 मध्ये बोलोन्या चर्च उडवून देण्याचा कट इस्लामिक कट्टरतावाद्यांनी रचल्याचा संशय होता. तेव्हापासून आजवर आपण इस्लामच्या नावाखाली जगभरात ठिकठिकाणी आणि युरोपातही अशा स्वरूपाचे हल्ले पाहिले आहेत, ज्यात हजारोंनी जीव गमावलाय. यामुळे मुस्लीमबहुल देश आणि अन्य, अशी जगाची सामुदायिक फाळणी होत असल्याचं वाटतंय.

त्यामुळे आज ख्रिसमसच्या निमित्ताने इस्लाम, येशू, मेरियम यांचा परस्परसंबंध समजून घेणं काळाची गरज आहे, ख्रिश्चनांनीही आणि मुसलमानांनीही.

जगातील विविध धर्मांमध्ये समान दुवा काय आहे, हे जाणून घेतलं तर अनेक समस्या सुटू शकतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)