इंडोनेशियात त्सुनामी भूकंपाविना कशी काय आली?

इंडोनेशियाच्या पँडेग्लांग बेटावर त्सुनामीमुळे झालेलं नुकसान

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

इंडोनेशियाच्या पँडेग्लांग बेटावर त्सुनामीमुळे झालेलं नुकसान

भूकंपाविना उसळलेल्या त्सुनामीमुळे इंडोनेशियात शेकडो जणांनी जीव गमावला. या लाटा निर्माण कशा झाल्या याबाबत अनिश्चितता आहे.

फोटोग्राफर ऑस्टिन अँडरसन हे शनिवारी रात्री जावा बेटांच्या पश्चिमेकडच्या भागात क्रेकाटोआ ज्वालामुखीचे फोटो काढत होते. त्याचवेळी एक भयंकर त्सुनामी इंडोनेशियात धडकली आणि सर्वत्र हाहाकार माजला.

कुठल्याही भूकंपाविना त्सुनामी आल्याने लोकांची तारांबळच उडाली, असं ऑस्टिन यांनी सांगितलं. या त्सुनामीच्या अनेक मीटर उंच लाटा किनाऱ्यावर धडकल्या, काही जावा बेटांवरच्या किनाऱ्यावरही आदळल्या.

ऑस्टिन सांगतात, "लाटांचा वेग अत्यंत तेजीने वाढताना मी पाहिलं. जीव वाचवण्यासाठी किनाऱ्यापासून दूर जाणं मला भाग होतं. दोन लाटा तुफान वेगाने आमच्या दिशेने आल्या. पहिली एवढी जीवघेणी नव्हती, त्यामुळे मी जीव वाचवू शकलो.

"दुसरी लाट मात्र काळघात होती. त्या लाटेने डझनावारी लोकांचा जीव घेतला. शेकडो लोक जखमी झाले. पडझडीमुळे नेस्तनाबूत झालेली आपली घरं लोकांना ओळखू येईना. बघावं तिकडे गाड्या डेबरिसमध्ये पडल्याचं दृश्य होतं."

इंडोनेशियातील आपत्कालीन यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या मते, या त्सुनामीने आतापर्यंत किमान 222 जीव घेतले आहेत. जावा आणि सुमात्रा बेटांवरच्या किनाऱ्यावर लाटांनी परिसराला तडाखा दिला आहे.

इंडोनेशियातील सरकारच्या मते त्सुनामीच्या तडाख्याने 700 हून अधिक लोक जखमी झाले आहेत तर शेकडो जण बेपत्ता आहेत. त्सुनामीने प्रभावित भागांमध्ये मदत पोहोचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुंदा सामुद्रधुनीच्या किनारपट्टीजवळच्या भागात अनेकांनी जीव गमावला आहे.

सुनामीची जीवघेणी लाट

इंडोनेशियाला याआधीही त्सुनामीने झोडपलं आहे, त्यावेळीही अनेकांचा जीव गेला होता. मात्र यावेळी त्सुनामीच्या आधी भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत. त्यामुळे प्रशासनाने त्सुनामीचा धोक्याचा इशारा देण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.

अनक क्रेकाटोआ या बेटावरील क्रेकाटोआ ज्वालामुखीचे शुक्रवारी आणि शनिवारी उद्रेक पाहायला मिळाले. मात्र जीवघेण्या लाटा किनाऱ्यावर धडकेपर्यंत ज्वालामुखीची कोणताही हालचाल झाली नव्हती. सगळीकडे गडद काळोख होता.

त्सुनामीच्या उंचच उंच लाटेचा पहिला दणका स्थानिक वेळेनुसार रात्री साडेनऊच्या सुमारास बसला.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

मदतकार्य पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.

त्सुनामी नक्की कशामुळे निर्माण झाली, याबाबत संशोधक आणि शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. काही सुरुवातीच्या निष्कर्षांनुसार, क्रेकाटोआ ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर सुंदा सामुद्रधुनीच्या तळाशी झालेल्या भूस्खलनामुळे त्सुनामीच्या लाटा निर्माण झाल्या. सुंदा सामुद्रधुनीमुळे जावा आणि बोर्नियो ही बेटं विलग होतात.

इंडोनेशिया आपत्कालीन नियंत्रण यंत्रणेचे प्रमुख सुतोपो पूर्वो नुग्रोहो यांनी त्सुनामीच्या आधी जमिनीखाली नोंदल्या गेलेल्या भूगर्भीय हालचालींआधारे हा अंदाज वर्तवला आहे.

क्रेकाटोआ ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर पाण्याच्या आत झालेलं भूस्खलन आणि त्या काळात पौर्णिमा असल्याने समुद्राला आलेली भरती यामुळे लाटांचं आकारमान वाढलं, असं नुग्रोहो यांना वाटतं.

तर, लाटा किनाऱ्याच्या दिशेने रोरावत येताना दुसरीकडे ज्वालामुखी शांत होता, असं निरीक्षण अँडरसन नोंदवतात.

सुनामी म्हणजे काय?

समुद्रतळाशी जोरदार हालचाली झाल्या की किनाऱ्यावर येणाऱ्या लाटांचा वेग आणि आकार आक्राळविक्राळ वाढतो. या भीषण लाटांना त्सुनामी म्हटलं जातं.

त्सुनामी हा जपानी शब्द आहे. 'त्सु' शब्दाचा अर्थ आहे समुद्र आणि 'नामी'चा अर्थ लाटा.

समुद्रात निर्माण होणाऱ्या गर्त्यांनाही त्सुनामी म्हटलं गेलं. मात्र गर्ते वेगळे असतात. समुद्रात निर्माण होणाऱ्या लाटा चंद्र-सूर्य आणि ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणावर अवलंबून असतात. मात्र सर्वसामान्य लाटांपेक्षा त्सुनामीच्या लाटा वेगळ्या असतात.

नुग्रोहो यांच्या अभ्यासानुसार, शांत पाण्यात त्सुनामीच्या लाटा निर्माण होत नाहीत. क्रेकाटोआ ज्वालामुखीचे सातत्याने उद्रेकही होत नाहीत. कमी तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के या प्रदेशात जाणवतात. यावेळी भूकंपामुळे त्सुनामीच्या लाटा उसळलेल्या नाहीत. सुनामीच्या लाटा निर्माण होण्याचं कारण शोधणं अवघड आहे, कारण भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

क्रेकाटोआ ज्वालामुखी गेल्या काही महिन्यात जागृत झाला आहे.

ज्वालामुखीचे अभ्यासक जेस फिनिक्स यांच्या मते ज्वालामुखीचा उद्रेक होतो, त्यावेळी गरम उष्ण पाण्यात प्रचंड उलथापालथ होते. हे समुद्रातील मोठ्या खडकांना जागेपासून निखळवू शकतात. यामुळे पाण्यात भूस्खलनही होतं.

क्रेकाटोआ ज्वालामुखीचा काही भाग पाण्यात आहे. त्यामुळे पाण्यात भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे भूस्खलन मोठ्या प्रमाणात झालं तर पाण्यात प्रचंड उलथापालथ होऊ शकते. याचं रूपांतर त्सुनामीच्या प्रलयंकारी लाटांमध्ये होऊ शकतं.

त्सुनामीच्या लाटांना किनाऱ्यावर धडकण्यासाठी काही वेळेला पाच मिनिटं लागू शकतात, काहींना तासभर लागू शकतो. चंद्राचं गुरुत्वाकर्षण, पौर्णिमेमुळे लाटांची तीव्रता आणि आकार प्रचंड झाला. गेल्या काही महिन्यात क्रेकाटोआ ज्वालामुखी जागृत झाला आहे.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

सुनामीमुळे झालेलं नुकसान

शुक्रवारी ज्वालामुखीत दोन मिनिटं आणि बारा सेकंदांपर्यंत उद्रेक झाला. 400 मीटर राख आसमंतात पाहायला मिळाली. शनिवारीही ज्वालामुखीची थोडी हालचाल झाली होती, असं इंडोनेशियातील भूगर्भीय हालचालींचा अभ्यास करणाऱ्या संस्थेनं स्पष्ट केलं.

ऑगस्ट 1883 मध्ये क्रेकाटोआ ज्वालामुखीने इंडोनेशियात उत्पात घडवला होता. तब्बल 41 मीटर उंचीच्या लाटा किनाऱ्यावर थडकल्या होत्या. 30 हजारहून अधिक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला होता. या लाटांचा तडाखा 1945मध्ये जपानच्या हिरोशिमा शहरावर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बच्या तडाख्यापेक्षा 13,000 पटींनी जास्त होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)