भारताविरुद्धच्या कसोटीसाठी हा 7 वर्षांचा लेग-स्पिनर ऑस्ट्रेलियन टीममध्ये

आर्ची शिलर

फोटो स्रोत, CRICKET.COM.AU

फोटो कॅप्शन,

आर्ची शिलर

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेसाठी भारताने आपल्या संघात हार्दिक पंड्या आणि मयंक अग्रवाल यांचा समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियानेही 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी 15 जणांचा संघ जाहीर केला. पण ही घोषणा झाल्यापासून सगळीकडे ऑस्ट्रेलियन टीममधल्या एका नवीन लेग स्पिनरची जोरदार चर्चा सुरू झाली.

आर्ची शिलर असं या नव्या लेग स्पिनरचं नाव आहे. आणि त्याच्या चर्चेत राहण्याचं कारण आहे त्याचं वय - अवघे 7 वर्षं.

भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी आर्ची ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधारही आहे. आर्ची शिलरने अॅडलेड कसोटी दरम्यान ऑस्ट्रेलियन संघासोबत सरावही केला होता.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यानं शनिवारी आर्चीच्या 7व्या वाढदिवशीच ही घोषणा केली. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही या वृत्ताला दुजोरा दिला.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत वेबसाइटनेही डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच आर्चीच्या ऑस्ट्रेलियन टीममधील सहभागाची बातमी प्रसिद्ध केली होती.

ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला ही माहिती दिली. त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघ संयुक्त अरब अमिरातमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळत होता.

'मेक अ विश ऑस्ट्रेलिया' अभियानामुळे समावेश

आर्चीचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश होण्याचं कारण म्हणजे 'मेक अ विश ऑस्ट्रेलिया' अभियान. या अभियानांतर्गत लहान वयातच कठीण परिस्थितीचा सामना करणाऱ्या लहान मुलांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो.

आर्चीलाही अवघ्या सात वर्षांच्या आयुष्यात भरपूर संघर्ष करावा लागला आहे. तो तीन महिन्यांचा असतानाचा त्याला ह्रदयविकार असल्याचं निदान झालं.

त्यानंतर आर्चीला ऑस्ट्रेलियाच्या न्यूरिऊट्पावरून मेलबर्नला हलवलं. तिथं त्याच्या ह्रदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया सात तासांहून अधिक वेळ चालली होती.

शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यांनी आर्चीला पुन्हा त्रास सुरू झाला. त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. मात्र गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याच्या दुखण्यानं परत उचल खाल्ली.

तिसऱ्यांदा त्याच्यावर ओपन-हार्ट सर्जरी करण्यात आली. यावेळी आर्चिचे कुटुंबीय निराश झाले. आपल्या मुलाला गमावण्याची भीती त्यांना वाटायला लागली.

"काहीही होऊ शकतं, अशी कल्पना आम्हाला देण्यात आली होती," आर्चीची आई सारानं सांगितलं. "आर्चीला त्याच्या शाळेची खूप आठवण येते. एके दिवशी घरी आल्यावर आर्ची मला म्हणाला, की मी माझ्या मित्रांना शोधू नाही शकलो. त्यांच्या मागे धावण्याची शक्तीच माझ्यामध्ये नव्हती. त्यामुळे मी तिथंच बसलो आणि पुस्तक वाचायला लागलो." सारा यांनी सांगितलं, "त्यानं अतिशय जबाबदारीनं योग्य तोच निर्णय घेतला होता. मला मात्र खूप वाईट वाटलं."

आनंदाचा ख्रिसमस

हा ख्रिसमस मात्र आर्ची आणि त्याच्या घरच्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला.

फोटो स्रोत, TWITTER/CRICKET.COM.AU

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने आर्चीच्या निवडीबद्दल बोलताना म्हटलं, "आर्ची आणि त्याच्या कुटुंबानं खूप कठीण परिस्थिती अनुभवली आहे. जेव्हा त्याच्या वडिलांनी तुझी काय इच्छा आहे असं विचारलं, तेव्हा आर्चीनं मला ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार बनायचंय, हे उत्तर दिलं. असा एक सदस्य संघात असणं आमच्या सर्वांसाठीच खूप प्रेरणादायक आहे. 'बॉक्सिंग डे'ला होणाऱ्या त्याच्या पदार्पणाविषयी आम्हीही खूप उत्सुक आहोत."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)