नवाज शरीफ यांना अल अझिझिया स्टील कंपनी घोटाळा प्रकरणी तुरुंगवास

पाकिस्तान, राजकारण
फोटो कॅप्शन,

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना भ्रष्टाचारासंदर्भातील खटल्यात सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. इस्लामाबादमधील नॅशनल अकाऊंटॅबिलीट न्यायालयाने अल अझिझिया स्टील मिल्स कंपनीतील भ्रष्टाचार प्रकरणी नवाज शरीफ यांना दोषी ठरवलं आहे.

दरम्यान फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंटप्रकरणी शरीफ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश मोहम्मद बशीर यांनी हा निर्णय दिला. याआधी लंडनमधील अॅव्हेनफिल्ड फ्लॅट्सच्या प्रकरणात कोर्टाने नवाज शरीफ, त्यांची मुलगी मरियम आणि जावई सफदर यांना दोषी ठरवून तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र इस्लामाबाद हायकोर्टाने ही शिक्षा स्थगित केल्याने त्यांची मुक्तता झाली.

यानंतर ऑफशोअर कंपन्या आणि अल अझिझिया स्टेलमिल्स प्रकरणी नंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले.

पनामा लिक्समध्ये शरीफ यांच्या तीनही मुलांची ऑफशोअर कंपन्यात गुंतवणूक असल्याचं उघड झालं होतं. पण ही मालमत्ता कुटुंबाच्या वेल्थ स्टेटमेंटमध्ये दाखवली नव्हती.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय अकाउंटॅबिलिटी कमिशनने याप्रकरणाची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल केले होते.

67 वर्षीय शरीफ यांना अघोषित मालमत्तेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधानपदासाठी अपात्र ठरवल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

अकाऊंटॅबिलिटी न्यायालयाचे न्यायाधीश अर्शद मलिक यांनी या दोन खटल्यांचा निकाल राखून ठेवला होता. भ्रष्टाचारविरोधी पथकाने अल अझिझिया स्टेट मिल्सप्रकरणी या महिन्याच्या सुरुवातीला आपली बाजू मांडली होती.

अल अझिझिया स्टील मिल्स प्रकरण काय आहे?

नवाज शरीफ यांचा मुलगा हुसेन यांनी सौदी अरेबियामध्ये स्टील उद्योग समूह स्थापन केला. आजोबांकडून मिळालेल्या 5.4 दशलक्ष डॉलर्समधून या उद्योगात गुंतवणूक केल्याचं हुसेन यांनी सांगितलं होतं.

शरीफ यांच्या विनंतीवरून कतारच्या राजघराण्याने हे पैसे दिले. भंगारात काढण्यात आलेल्या अहली स्टील मिल्स मधून काही वस्तू जेद्दा येथे अल अझिझिया कंपनीची स्थापना करण्यासाठी पाठवण्यात आल्या.

नवाज हेच या कंपनीचे सर्वेसर्वा असून हुसेन त्यांच्या वतीने कंपनीचं कामकाज चालवण्यात येत होतं असं तपास यंत्रणांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images

फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट लिमिटेड प्रकरणातून सुटका

नवाज शरीफ यांचा मुलगा हुसेन यांनी 2001 मध्ये फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट कंपनीची इंग्लंडमध्ये स्थापना केली होती. त्यावेळी हुसेन 25 वर्षांचे होते. नवाज शरीफ यांनी या उद्योगाशी आपला संबंध नसल्याचं सांगितलं. मात्र नवाज यांच्या नावाचा उल्लेख कंपनीचे चेअरमन म्हणून असल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला. 1995 पर्यंत हुसेन हे नवाज यांच्याबरोबर एकाच घरात राहत होते.

नवाज यांना 0.78 दशलक्ष एवढी रक्कम मिळाल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. इन्व्हेस्टमेंट फर्म स्थापन करण्यासाठी हुसेन यांच्याकडे पैसे आले कुठून याचा शोध तपास यंत्रणांनी घेतला.

अॅहेनफिल्ड खटला काय आहे?

1993 मध्ये नवाज कुटुंबाने लंडनच्या अॅव्हेनफिल्ड भागात 4 फ्लॅट्स खरेदी केले. 2016 मध्ये पनामा पेपर्सच्या माध्यमातून हा गौप्यस्फोट झाला. शरीफ यांनी ही संपत्ती कायदेशीर मार्गाने कमावल्याचं म्हटलं होतं. मात्र कोर्टात त्यांना पैशाचा कायदेशीर स्त्रोत दाखवणं शक्य झालं नाही.

शिवाय शरीफ कुटुंबातील सदस्यांनी या संपत्तीबाबत विरोधाभासी माहिती दिली, असा दावा तपास यंत्रणांनी केला.

शरीफ कुटुंबीयांविरुद्ध खटल्याची सुनावणी 14 सप्टेंबर 2017 मध्ये सुरू झाली.

6 जुलै रोजी न्यायालयाने 6 महिन्यांची निर्धारीत मुदत उलटून गेल्यानंतर निकाल दिला. नवाझ यांना 11 वर्षांची, मरियम यांना 8 वर्षांची तर जावई सफदर यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.

19 सप्टेंबर रोजी नवाज आणि मरियम यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. नवाझ आणि त्यांची दोन मुलं-हुसेन आणि हसन यांचा तिन्ही खटल्यांमध्ये उल्लेख आहे. मरियम आणि सफदर अव्हेनफिल्डप्रकरणी त्यांच्यावर आरोपपत्र निश्चित करण्यात आलं आहे.

गेल्या वर्षी या खटल्याची सुनावणी सुरू झाल्यापासून शरीफ यांची दोन्ही मुलं बेपत्ता आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)