काबूल हल्ल्यात 43 ठार: अफगाणिस्तान पुन्हा अस्थिरतेच्या उंबरठ्यावर

काबुलमध्ये दहशतवादी हल्ला

फोटो स्रोत, EPA

काबूलमध्ये सरकारी इमारतीवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 43 जण ठार झाले आहेत. अफगाणिस्तानच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाच्या इमारतीवरील हल्ल्यात 25 जण जखमी झाल्याचा अंदाज आहे.

इमारतीच्या आवारात पार्क केलेल्या कारमध्ये ठेवलेल्या बॉम्बमुळे हा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजामुळे आसपासच्या इमारतीमधील कर्मचाऱ्यांनी स्वतःला ऑफिसमध्येच कोंडून घेतलं. काही जणांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इमारतीतून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि जखमी झाले.

हल्ला कुणी केला, हे अजून स्पष्ट झालं नाहीये. कारण इस्लामिक स्टेट ग्रुप आणि तालिबान या दोन्ही दहशतवादी संघटनांची हल्ला करण्याची पद्धत सारखी आहे.

बांधकाम मंत्रालयाच्या इमारतीतून 350 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती अंतर्गत व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते नजीब दानिश यांनी दिली. हल्ल्यामधील मृतांचा तसंच जखमींचा आकडा बदलू शकतो, असंही दानिश यांनी सांगितलं.

तालिबानचा वाढता जोर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानातील सैन्य कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर झालेल्या या हल्ल्यामुळे अफगाणिस्तानच्या स्थैर्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

2001 मध्ये अमेरिकेनं अफगाणिस्तानमध्ये सैन्य दाखल केल्यापासून आजपर्यंत अफगाणिस्तानमध्ये इतकी अस्थिरता कधीच नव्हती. सध्या अफगाणिस्तानात तालिबान पुन्हा सक्रिय झालं असून 17 वर्षांपूर्वी त्यांच्या ताब्यात जेवढा प्रदेश होता, त्याहून अधिक प्रदेश आता त्यांनी व्यापला आहे.

गेल्या काही काळात आत्मघातकी हल्ल्यांची संख्याच नाही तर तीव्रताही वाढली आहे. तालिबान आणि अमेरिका-नाटोच्या पाठिंब्यावर उभं असलेलं अफगाणिस्तानमधील सरकार यांच्यामध्ये स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे.

10 ऑगस्टला तालिबानने काबूलच्या जवळच असलेल्या गझनीमध्ये प्रवेश केला होता.

अमेरिकेचा सैन्य कमी करण्याचा निर्णय धक्कादायक

या पार्श्वभूमीवर अमेरिकन सरकारचा अफगाणिस्तानातलं सैन्य कमी करण्याचा निर्णय अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांसाठीही धक्कादायक आहे. कारण आता तालिबान हा अफगाणिस्तानला एकमेव धोका नाहीये, तर ISIS ही या भागात हातपाय पसरत आहे.

अशा परिस्थितीत अफगाणिस्तानातून अमेरिकेने आपलं निम्मं सैन्य मागे घेतल्यास अफगाणिस्तान पुन्हा अस्थिरतेच्या उंबरठ्यावर आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)