डोनाल्ड ट्रंप यांचा लहान मुलाला ख्रिसमसचा प्रश्न, 'तुला वाटतं सँटा खरोखरंच असतो?'

ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला डोनाल्ड ट्रंप आणि मेलानिया ट्रंप यांना भेटायला अमेरिकेच्या विविध भागातून मुलं आली होती. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला डोनाल्ड ट्रंप आणि मेलानिया ट्रंप यांना भेटायला अमेरिकेच्या विविध भागातून मुलं आली होती.

काही प्रश्न कधीच विचारायचे नसतात.

"हे लाल बटदाबलं की काय होतं?"

"लोक माझ्याविषयी काय बोलतात?"

"तुमचा सँटा क्लॉजवर विश्वास आहे का?"

आता सँटा क्लॉज असतो, यामागचं सत्य आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र काही कारणास्तव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी एका लहान मुलाशी बोलताना यावर शंका उपस्थित केली.

व्हाईट हाऊसच्या डायनिंग रूममध्ये ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला हा किस्सा घडला.

डोनाल्ड ट्रंप आणि त्यांच्या पत्नी मेलानिया अमेरिकेतील लहान मुलांच्या फोनवरून शुभेच्छा घेत होते, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होते. एका भव्य ख्रिसमस ट्रीच्या सान्निध्यात हा कार्यक्रम सुरू होता.

जी मुलं ही फोन करत होती, त्यांना 'नोराड' या संस्थेला फोन लागेल अशी आशा होती. 'नोराड' हे अमेरिकन सरकारचं विभाग जगभरात सँटा क्लॉजच्या हालचाली टिपण्याचं काम करतं. (उल्लेखनीय म्हणजे, अमेरिकेत सध्या सरकार अंशत: ठप्प असलं तरी हे विभाग सुरळीत काम करत आहे.)

हे कॉल नंतर ट्रंप आणि त्यांच्या पत्नींकडे फॉर्वर्ड केले जात होते. हे सर्व संभाषण अनेक माध्यमसमूहांसाठीचे व्हाईट हाऊस प्रतिनिधी केविन डियाझ यांनी ऐकलं आणि त्यावर असा वृत्तांत दिला -

ट्रंप (त्यांच्या नेहमीच्या शैलीत) - "हॅलो, कोलमन बोलतोय का? मेरी ख्रिसमस. कसा आहेस? तुझं वय किती रे? शाळा मस्त सुरू आहे ना? तुला अजूनही असं वाटतं का की सँटा खरोखरच असतो?"

या घटनेचं फुटेज सध्या सोशल मीडियावर फिरतंय. त्यात ट्रंप मुलाला विचारताना दिसतात, "सात वर्षांच्या वयात हे कळतं, बरोबर ना?"

यावर कोलमनचा प्रतिसाद काय होता, ते स्पष्ट नाही.

शिवाय, ट्रंप यांनी असा प्रश्न का विचारला, हेही अद्याप स्पष्ट नाही. कारण सँटाच्या अस्तित्वाबद्दल संशय थोडीच व्यक्त केला जातो.

कारण सँटा असतो, याचा पुरावा देणारे हे खालील फोटो आहेत, जे जगाच्या विविध भागात घेतले आहेत.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा मेक्सिकोतील सँटा
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डिस्नेलँडमधील सँटा
Image copyright Reuters
प्रतिमा मथळा फिनलँडमधील सँटा

हा एक अपवाद वगळता ट्रंप दांपत्याने सगळ्यांना नेहमीप्रमाणे शुभेच्छा दिल्या. एका मुलाला मेलानिया ट्रंप यांनी "तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत" अशा शुभेच्छा दिल्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)