मयांक अगरवाल : वीरेंद्र सेहवागला आदर्श मानणारा टीम इंडियाचा नवा ओपनर

फोटो स्रोत, Getty Images
मयांक अगरवाल
धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागला आदर्श मानणारा मयांक अगरवाल टीम इंडियाचा नवा ओपनर झाला आहे. बुधवारपासून सुरू झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत मयांकनं टीम इंडियासाठी पदार्पण केलं.
स्थानिक क्रिकेटमध्ये गेले काही वर्ष खोऱ्याने धावा करणारा मयांक अगरवालचं नाव सलामीवीर म्हणून सातत्याने चर्चेत होतं.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी मयांकची भारतीय संघात निवड झाली होती. त्या मालिकेत मुंबईकर पृथ्वी शॉने शतकी खेळीसह दिमाखदार पदार्पण केलं. हा सूर कायम राखत पृथ्वीने दुसऱ्या कसोटीतही चांगली कामगिरी केली. पहिल्याच मालिकेत पृथ्वीला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं. पृथ्वीच्या शानदार कामगिरीमुळे मयाकंचं पदार्पण लांबलं होतं.
मुरली विजय आणि लोकेश राहुल यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. यामुळे भारतीय संघव्यवस्थापनाने मयांकला संधी देण्याचा निर्णय घेतला.
फोटो स्रोत, Getty Images
वीरेंद्र सेहवाग मयांक अगरवालसाठी आदर्श आहे.
बंगळुरूस्थित बिशप कॉटन बॉइज स्कूलचं प्रतिनिधित्व करताना मयांकने शालेय कारकीर्दीतच आपल्या नैपुण्याची चुणूक दाखवली होती.
2008 मध्ये मयांकने U19 कूचबिहार करंडक स्पर्धेत 54च्या सरासरीने 432 धावा केल्या होत्या.
U19 भारतीय संघासाठी खेळताना मयांकने ऑस्ट्रेलिया U19 संघाविरुद्ध 160 धावांची खेळी साकारली होती.
फोटो स्रोत, Getty Images
मयांकने भारतीय अ संघातर्फे दमदार प्रदर्शन केलं आहे.
2010 मध्ये U19 वर्ल्डकप भारतासाठी निराशाजनक ठरला मात्र मयांकने स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा मान पटकावला होता.
या कामगिरीच्या बळावर मयांकला भारतीय अ संघात समाविष्ट करण्यात आलं. मात्र भारत अ संघासाठी खेळताना मयांकला कामगिरीत सातत्य राखता आलं नाही.
2010 मध्ये कर्नाटक प्रीमिअर लीग स्पर्धेत मयांकला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
वनडे आणि ट्वेन्टी-20 विशेषज्ञ अशी गणना मयांकने 2013-14 हंगामात कर्नाटकसाठी रणजी करंडक पदार्पण केलं. पुढच्याच वर्षी हंगामाच्या मध्यातून त्याला संघातून डच्चू देण्यात आला. यानंतर मयांकने वजन कमी करण्यावर भर दिला. पुढच्या हंगामात मयांकने कर्नाटक संघात विजयी पुनरागमन केलं.
रणजी करंडक 2017-18 हंगामात सर्वाधिक धावा (1,160) मयांकच्या नावावर होत्या. याच हंगामात मयांकने महाराष्ट्र संघाविरुद्ध खेळताना मयांकने 304 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली.
फोटो स्रोत, Getty Images
2018 वर्षासाठी स्थानिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून बीसीसीआयने मयांकला गौरवलं तो क्षण
विजय हजारे करंडक स्पर्धेत कर्नाटकसाठी सर्वाधिक धावा मयांकच्याच नावावर होत्या.
चार तसंच पाचदिवसीय क्रिकेटमध्ये जम बसवत धावांची टांकसाळ उघडणाऱ्या मयांकने इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत 2011 ते 2013 कालावधीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं प्रतिनिधित्व केलं. 2014 हंगामात मयांकने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघातर्फे खेळलं.
2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने मयांक अगरवालला दिल्लीकडून आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं.
यंदाच्या वर्षी मयांक किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा भाग होता.
फोटो स्रोत, Getty Images
मयांकने IPL स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
योगायोग म्हणजे बॉक्सिंग डे कसोटीत मयांक त्याचा खास मित्र लोकेश राहुलच्या जागी खेळणार आहे. कर्नाटक संघातील एकमेकांचे मित्र आता सलामीच्या जागेसाठी शर्यतीत आहेत.
86 खेळाडूंनी भारतासाठी कसोटीत सलामीवीरीची भूमिका निभावली आहे. मेलबर्न कसोटीत मयांकच्या साथीने हनुमा विहारीला सलामीला उतरणार आहे. भारतीय संघासाठी सलामीच्या स्थानाची ही नवी जोडी असणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)