मी कोण आहे, हे सांगायची गरज नाही - विराट कोहली

विराट कोहली, भारतीय संघ, ऑस्ट्रेलिया Image copyright EPA
प्रतिमा मथळा विराट कोहली

मेलबर्न कसोटीच्या पार्श्वभूमीवर विराट कोहलीने मी कोण आहे, हे सांगायची गरज नाही असं वक्तव्य केलं आहे.

"सराव गेला खड्ड्यात, खेळाडूंना आरामाची आवश्यकता आहे."

हे शब्द होते भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे. अॅडलेडच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर त्यांनी हे उद्गार काढले.

यानंतरच्या पर्थ येथील सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाला 146 धावांनी हरवलं आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

आता दोन्ही संघ बुधवारी म्हणजेच 26 डिसेंबरला मेलबर्न येथे तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी समोरासमोर येतील. या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं पत्रकारांशी चर्चा केली.

प्रत्येक फलदांजांनं मैदानावर टिकून राहणं, खूप महत्त्वाचं आहे. कारण आमच्या गोलंदाजीत सातत्यानं सुधारणा होत असल्याचं सर्वांनीच बघितलं आहे. आम्ही सुरुवातीला गोलंदाजी आणि नंतर फलंदाजी केली तर आम्हाला लीड मिळवण्याचा प्रयत्न करू. सर्व फलंदाजांनी चांगला खेळ करण्याची आवश्यकता आहे.

कोहली काय म्हणतो?

मी काय करतो आणि कसा विचार करतो, याबद्दल मी बॅनर घेऊन लोकांना सांगत सुटणार नाही. मी असा आहे आणि तुम्हाला मी असाच पसंत यायला हवा, हे मी लोकांना सांगत बसणार नाही. माझा यावर काही भर नाही. ही ज्याची त्याची आवड आहे. माझं लक्ष फक्त सामन्यावर आहे.

लोक माझ्याबाबत काय लिहित आहेत, याविषयी मला काहीही माहिती नाही.

या पराभवानंतरही कोहलीनं म्हटलं की, आम्ही चांगलं क्रिकेट खेळत आहोत. संघानं एकाग्रता दाखवली तर अॅडलेडमधील यशाची पुनरावृत्ती आम्ही करू शकतो.

पण प्रश्न असा आहे की, ज्या संघासमोर जिंकण्यासाठी 287 धावांचं लक्ष आहे आणि तो संघ 140 धावांवर गारद होत असेल तर त्याचा खेळ चांगला आहे, असं कसं म्हणणार?

शास्त्रींचे बोल

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री त्यांच्या वक्तव्याबद्दल चर्चेत असतात.

याबद्दल क्रीडा समीक्षक अयाझ मेमन सांगतात, शास्त्री यांना इतका विश्वास असेल तर त्यांनी तासा रिझल्ट द्यायला हवा. निकाल सकारात्मक आला नाही तर लोक खिल्ली उडवणारच. शिवाय विरोधी संघही फायदाच उचलणार.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री

रवी शास्त्री यांनी स्वत:ला नियंत्रणात ठेवायला हवं. जिकणं असो अथवा हरणं, खेळापेक्षा मोठं काहीच नाही, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं.

मेलबर्नमध्ये भारतावर दबाव

आता प्रश्न हा आहे की, मेलबर्नमधील सामन्यात भारतीय संघ जिंकेल का?

मेमन यांच्या मते, भारतीय संघाला जिंकण्याची संधी आहे. पण तिथली परिस्थिती मात्र ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं आहे.

ऑस्ट्रेलियानं गेल्या सामन्यात मोठ्या फरकानं भारताला हरवलं.

त्यामुळे 1-0ची विजयी आघाडी भारतानं गमावली. यामुळे भारतीय संघावर दबाव असेल.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटी जिंकत मालिकेत बरोबरी केली.

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ निवडीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. स्पिनरशिवाय पर्थमध्ये खेळणं भारतासाठी जिकिरीचं ठरू शकतं.

मेलबर्नमध्ये भारतीय संघ कसा असावा, यावर मेमन सांगतात की, हे आताच सांगणं अवघड आहे. पिच बघितल्यानंतर कुणाला खेळवायचं आहे, ते ठरवलं जाईल.

चार गोलंदाजांना पर्थमध्ये खेळवणं चुकीचा निर्णय नव्हता, मेमन सांगतात.

फलंदाजांच्या खांद्यावर जबाबदारी

काही जाणकारांच्या मते, भारतीय संघातील तळाच्या फलंदादांची कामगिरी खराब होत आहे. पण तळाच्या फलंदाजांकडून 140 धावांचं अंतर संपुष्टात आणण्याची इच्छा व्यक्त केली जात असेल तर सलामीवीरांची गरजच काय?

धावा करण्याची जबाबदारी सुरुवातीच्या 5 ते 6 फलंदाजांची असते, असं मेमन सांगतात.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा भारतीय संघाला मेलबर्न कसोटीत खेळ उंचवावा लागणार आहे.

जर ते 300 ते 350 धावा काढू शकत नसतील तर तळाच्या फलंदाजांकडून आशा बाळगणं व्यर्थ आहे.

दुसरं असं की स्पिनरला संघात जागा द्यायला हवी होती का? की गोलंदाज भुवनेश्वरला संघात सामील करून घ्यायला हवं होतं.

चूक कुठे झाली?

रविंद्र जडेजा अथवा भुवनेश्वर कुमार खेळले असते तर फलंदाजी मजबूत झाली असती. पण ज्या खेळपट्टीवर अधिकाधिक धावसंख्या 326 होत्या, तिथं यांच्याकडून जास्त काही परिणाम नसता झाला.

उमेश यादवला संघात ठेवणं चुकीचं होतं, अयाझ मेमन सांगतात.

पण उमेश यादव भारतीय संघात असेल तर तो केवळ कसोटी सामने खेळण्यासाठीच आहे. या बाबीवर कठोर टीका व्हायला नको.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा भारतीय संघनिवड चर्चेचा विषय ठरली आहे.

फलंदाजांचं अपयश हे एकमेव कारण भारतीय संघाच्या पराभवामागे आहे.

विशेष म्हणजे आघाडीचे दोन्ही फलंदाज दोन्हीही सामन्यांत अपयशी ठरले आहेत.

दहा-बारा धावांचीही सुरुवात मिळाली नाही. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा विजय झाला कारण त्यांनी चांगली गोलंदाजी केली. आरोन फिंच आणि मार्कस हॅरिस या त्यांच्या सलामीवीरांनी अवघड खेळपट्टीवर नवीन चेंडू समर्थपणे खेळून काढत शंभर धावांची सलामी दिली.

भारतीय फलंदाज फिरकीच्या जाळ्यात

नॅथन लियॉनची तुलना रवींद्र जडेजा किंवा कुलदीप यादवशी होऊ शकत नाही असं क्रीडा पत्रकार अयाझ मेमन यांनी सांगितलं. नॅथन सध्याच्या घडीला जगातला सर्वोत्तम फिरकीपटू आहे.

रवीचंद्रन अश्विन दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघासमोरच्या अडचणी वाढल्या.

मात्र खेळपट्टी बघता भारतीय गोलंदाजांनी खराब कामगिरी केली असं म्हणता येणार नाही.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नॅथन लियॉनने भारतीय फलंदाजांना रोखलं आहे.

विदेशातील खेळपट्ट्यांवर यंदाच्या वर्षात भारतीय गोलंदाजांनी 13 पैकी 11 सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला ऑलआऊट केलं आहे.

संघाने 300 किंवा 350 चा टप्पा गाठला तर गोलंदाजांना बचावासाठी फारशी संधी उरत नाही.

पंत, रहाणेसह टॉप ऑर्डर फ्लॉप

ज्या पद्धतीने ऋषभ पंत आपली विकेट फेकत आहे ते पाहता त्याला अद्याप स्वत:च्या विकेटची किंमत कळलेली नाही. ही गोष्ट सहजपणे स्वीकारता येणार नाही असं अयाझ मेमन सांगतात.

ऋषभ एक आक्रमक फलंदाज आहे. त्याने त्याच्या नैसर्गिक क्षमतेला अनुसरून खेळ करावा असं सांगण्यात आलं आहे. मात्र याचा अर्थ चांगल्या सुरुवातीनंतर बेफिकीरीने विकेट टाकावी असा होत नाही.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ऋषभ पंत

ऋषभ पंत नवीन खेळाडू आहे. अजिंक्य रहाणे संघातील अनुभवी खेळाडू आहे. त्याने दोन अर्धशतकी खेळी साकारल्या आहेत. मात्र अजूनही मॅच जिंकून देईल अशी खेळी त्याला साकारता आलेली नाही.

अशावेळी टॉप ऑर्डरचं योगदान मोलाचं ठरतं. यंदाच्या वर्षात 1,200 धावा करणाऱ्या विराट कोहलीचा अपवाद वगळता कोणालाही सातत्याने धावा करता आलेल्या नाहीत.

ऑस्ट्रेलियात तूर्तास चेतेश्वर पुजाराची बॅट तळपते आहे मात्र त्याला इंग्लंडमध्ये संघाबाहेर ठेवण्यात आलं होतं.

कमकुवत ऑस्ट्रेलिया संघाकडूनही पराभूत

एका फलंदाजाने चांगला खेळ करून जिंकता येत नाही हे स्पष्टच आहे. 1977-78 साली बॉबी सिम्पसन यांच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा संघ खूपच कमकुवत होता. कारण त्यावेळी बहुतांश खेळाडू केरी पॅकर लीग स्पर्धेत सहभागी झाले होते. मात्र तरीही त्यावेळी भारतीय संघाला मालिका जिंकता आली नव्हती. ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांची मालिका 3-2ने जिंकली होती.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा बॉबी सिम्प्सन

त्यावेळी बिशऩ सिंह बेदी कर्णधार होते. तो भारतीय संघ सर्वोत्तम असा होता. कारण भारताचा एकही खेळाडू केरी पॅकर लीगमध्ये सहभागी झाला नव्हता. ऑस्ट्रेलियाकडे जेफ थॉमसन हा एकमेव स्टार खेळाडू होता. 42वर्षीय बॉबी सिम्प्सन यांच्याकडे सक्तीने कर्णधारपद देण्यात आलं होतं. बाकी संघात युवा खेळाडूंचा भरणा होता.

आताच्या संघात उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श हे अनुभवी खेळाडू आहेत.

संधी गमावून चालणार नाही

ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. मालिका आता 1-1 बरोबरीत आहे. भारतीय फलंदाजांनी सातत्याने धावा करण्याची आवश्यकता आहे. धावा झाल्या नाहीत तर गोलंदाज निराश होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाने मालिका बरोबरीत सोडवली तरी त्यांच्यासाठी विजय मिळवण्यासारखंच आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा भारतीय गोलंदाजांची कामगिरी चांगली झाली आहे.

भारतीय संघ क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. मैदानात आणि मैदानाबाहेर अनेकविध समस्यांनी वेढलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने क्रमवारीत अव्वल भारतीय संघाविरुद्ध मालिका विजय साजरा केल्यास ते भारतासाठी खूपच नामुष्कीचं असेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)