इस्रायलनं दमास्कसमधल्या शस्त्रसाठ्यावर हवाई हल्ला केल्याचा सीरियाचा आरोप

हवाई हल्ल्याचा सीरियाचा आरोप

फोटो स्रोत, Reuters

सिरियाची राजधानी दमास्कस जवळ रात्रीच्या सुमारास स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आले. सिरियन लष्कराच्या मते हा इस्रायलनं त्यांच्या शस्त्रसाठ्यांच्या कोठारावर केलेला हवाई हल्ला होता.

या हल्ल्यात तीन सैनिक जखमी झाल्याची माहिती सिरियाच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. मात्र जवळपास सर्व क्षेपणास्त्रं मध्येच अडवण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

इस्रायलनं हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. आम्ही सिरियाची क्षेपणास्त्र पाडण्यासाठी हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यरत केली होती, एवढंच स्पष्टीकरण इस्रायलनं दिलं आहे. इस्रायलच्या लष्करी साधनांची कोणतीही हानी झालेली नाही तसंच कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती इस्रायलकडून देण्यात आली आहे.

मंगळवारी रात्री उशीरा सीरियाच्या सरकारी माध्यमांनी दमास्कस शहराकडे येणारी क्षेपणास्त्र वाटेतच अडवल्याचं चित्रीकरण प्रसिद्ध केलं. त्यानंतर स्फोटांचा मोठा आवाज झाला आणि पाठोपाठ तोफगोळे फुटल्याचंही ऐकायला आलं.

सुरक्षेच्या कारणावरून इस्रायलकडून हल्ला?

इस्रायल डिफेन्स फोर्सेसकडून (IDF) या 'कथित' हवाई हल्ल्याच्या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. मात्र IDFने एक ट्वीट करुन सिरियाकडून सोडण्यात आलेल्या विमानविरोधी क्षेपणास्त्राला दिलेला हा प्रतिसाद असल्याचं म्हटलं आहे.

इस्रायलनं यापूर्वीही अनेकदा सिरियामधील इराणी आणि हिजबुल्लांच्या ठिकाणांना लक्ष्य केलं होतं. राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याच्या भावनेतून इस्रायलकडून हे पाऊल उचलण्यात आलं होतं. अर्थात, असे हल्ले केल्याचं इस्त्रायलकडून फार क्वचितच मान्य केलं जातं.

मात्र सिरियामध्ये असलेल्या इराणच्या जवळपास सर्व लष्करी पायाभूत सुविधांवर हल्ला केल्याचं इस्रायलनं मे महिन्यात म्हटलं होतं.

सिरियात 2011 मध्ये सुरू झालेल्या यादवीनंतर झालेला हा सर्वांत मोठा हल्ला होता. गोलन हाईट्स भागातल्या इस्रायलच्या लष्करी तळावर रॉकेट हल्ला झाल्यानंतर इस्रायलकडून हे प्रत्युत्तर देण्यात आलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)