अंटार्क्टिका एकट्यानं ओलांडलं फक्त 53 दिवसांमध्ये, रचला नवा विक्रम

O'Brady wore tape on his face to stave off frostbite

फोटो स्रोत, Colin O'Brady

नजर जाईल तिथपर्यंत पसरलेला बर्फ, दूरवर चिटपाखरुही दिसत नाही, कोणाचीही सोबत नाही अशा परिस्थितीत अमेरिकेच्या 33 वर्षाच्या कॉलिननं अंटार्क्टिका पार केलं. त्याचबरोबर त्यानं एक विक्रमही केला... एकट्यानं, कोणत्याही मदतीशिवाय अंटार्क्टिका ओलांडण्याचा.

ब्रिटीश लष्करातील कॅप्टन लुईस रड आणि साहसी मोहिमा करणारा कॉलिन ओ'ब्रॅडी यांच्यामध्ये अंटार्क्टिका ओलांडण्याची ही आगळीवेगळी शर्यत लागली होती. कॉलिननं 53 दिवसांत हा बर्फाळ प्रदेश पार करत कॅप्टन लुईसविरुद्धची ही शर्यत जिंकली.

या दोघांनीही 3 नोव्हेंबरला आपल्या मोहिमेला सुरुवात केली. दोन वर्षांपूर्वी याच मोहिमेसाठी निघालेल्या एका ब्रिटीश लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. मात्र कॉलिननं ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली.

जगातला सर्वांत दुर्गम टापू

1,482 किलोमीटरचा हा टापू जगातील सर्वांत थंड आणि सर करण्यास अत्यंत कठिण आहे. कॉलिननं हा कठीण टप्पा केवळ पारच केला नाही, तर वेळोवेळी या प्रवासाची माहितीही सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडली.

20 डिसेंबर हा कॉलिनच्या प्रवासाचा 47 वा दिवस होता. या दिवशी त्यानं बीबीसीशी संवादही साधला.

"आता मी खूप थकलोय. माझ्यात त्राण नाहीये, पण मी रोज हळूहळू पुढं जातोय," कॉलिन त्याच्या सॅटेलाईट फोनच्या माध्यमातून बोलत होता. त्यादिवशी त्याचा मुक्काम वादळी वाऱ्यांत, बर्फांच्या कड्यांनी वेढलेल्या ठिकाणी होता.

'एखाद्या पिंग-पाँग बॉलमध्ये बंदिस्त केल्याप्रमाणे वाटणारा दिवस' घालवल्यानंतर आता मी लाटांप्रमाणे दिसणाऱ्या बर्फाच्या कडाच्या रांगा आणि बर्फामुळे कमी झालेली दृश्यमानता यांच्याशी जुळवून घेतलंय, असंही तो म्हणाला.

फोटो स्रोत, Colin O'Brady

"जगातल्या सर्वांत थंड आणि असाह्य दुर्गम भागातून मी जवळपास 170 किलोचं सामान ओढत दिवसाला 12 ते 13 तासांचा प्रवास करतोय," कॉलिन म्हणाला.

"या मोहिमेमध्ये माझं वजन इतकं घटलंय की आता स्वतःला कपड्यांशिवाय पाहण्याची मला भीती वाटते," कॉलिननं सांगितलं.

प्रतिकूलतेवर मात करून पूर्ण केली मोहीम

कॉलिन ओ'ब्रॅडी आणि कॅप्टन लुईस रड यांनी रोन आइस शेल्फ या ठिकाणापासून शर्यतीला सुरुवात केली. प्रतिकूल हवामानामुळे त्यांचा प्रवास आधीच लांबला होता. शर्यतीच्या काही दिवस आधीच या दोघांची चिलीमधल्या एका रेस्टो बारमध्ये भेट झाली होती. या भेटीतच त्यांनी एकट्यानं अंटार्क्टिका पार करण्याची शर्यत लावण्याचा निर्णय घेतला.

साहसाची आवड हा समान धागा सोडला तर या दोघांचीही पार्श्वभूमी खूप वेगवेगळी होती. कॉलिन ओ'ब्रॅडी 2008 मध्ये थायलंडला सुट्टी घालवण्यासाठी गेला होता. या सुटीमध्ये झालेल्या एका अपघातात तो जवळपास 25 टक्के भाजला होता. त्याला पुन्हा कधीच सामान्यपणे चालता येणार नाही अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली होती.

फोटो स्रोत, COLIN O'BRADY

मात्र कॉलिन केवळ बराच झाला नाही, तर त्यानं ट्रायथ्लॉन शर्यतीत भाग घेऊन डॉक्टरांची भीतीही खोटी ठरवली. त्यानंतर त्यानं सातही खंडांमधली सर्वोच्च शिखरं सर करण्याची कामगिरीही बजावली. दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर जाऊन यशस्वीपणे स्किइंगही केलं.

अंटार्क्टिका मोहिमेदरम्यान कॉलिन सातत्यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर प्रेरणादायी पोस्ट लिहायचा. हजारो विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून कॅलिनची ही मोहीम 'फॉलो' करत होते. आपल्या सॅटेलाइट फोनवरून न चुकता प्रत्येक रात्री तो विद्यार्थ्यांकडून आलेल्या एका फोनचं उत्तर द्यायचा.

मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी सहभाग

कॉलिनशी शर्यत लावणारे रड हे ब्रिटीश लष्करी सेवेत कार्यरत आहेत. या मोहिमेसाठी त्यांना खास सुटी देण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी या मोहिमेदरम्यान प्राण गमवावे लागलेले हेन्री वर्सली हे रड यांचे सहकारी होते. त्यांच्यामुळेच रड यांना प्रेरणा मिळली होती.

फोटो स्रोत, BRITISH ARMY

रडही आपल्या प्रवासाबद्दल दररोज एक पोस्ट लिहायचे. त्यांनी ख्रिसमसच्या संध्याकाळी आपला दिवंगत सहकारी हेन्रीबद्दल पोस्ट लिहिली होती.

"मी हेन्रीचा हा झेंडा सोबत घेऊन आलोय. प्रवासात हा झेंडा त्याच्यासोबत होता. हेन्रीचा झेंडा अंटार्क्टिकाचा प्रवास पूर्ण करून योग्य ठिकाणी पोहचावा हे आता माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.

शीत वाळवंटातल्या प्रवासाचा अनुभव

अंटार्क्टिका हे पृथ्वीवरचं सर्वांत थंड खंड आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण ते सर्वाधिक उंचीवरचं आणि कोरडं खंडही आहे. कडाक्याच्या थंडीमुळे या भागातील आर्द्रता पूर्णपणे गोठून जाते. तांत्रिकदृष्ट्या हे शीत वाळवंट आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात इथे 24 तास सूर्यप्रकाश असतो. कॉलिननं म्हटलं, "हे खूप विचित्र आणि अस्वाभाविक आहे. पण मला तीच गोष्ट जास्त आवडली." कारण या सूर्यप्रकाशामुळेच त्याला सोबत असलेले सोलर पॅन्ल्स चार्ज करता यायचे.

फोटो स्रोत, Getty Images

या प्रवासात तग धरून राहण्यासाठी आवश्यक कॅलरीज सोबत ठेवणे आवश्यक असतं. एवढे खाद्यपदार्थ जवळ बाळगणं हे अतिशय कठीण काम आहे. विशेष म्हणजे इथे पिण्याच्या पाण्यासाठी बर्फ उकळून वितळवावा लागतो.

मनुष्यांची चाहूल तर या भागात फार क्वचित लागते. दक्षिण ध्रुवावरच्या रिसर्च स्टेशनमध्ये काही संशोधक राहतात. त्यामुळे तिथं पोहोचल्यावर खूप बरं वाटलं. मात्र या मोहिमेची प्रमुख अट कोणाचीही मदत घ्यायची नाही, ही असल्यामुळे कॉलिनला केवळ त्यांच्या तिथे असण्यातच समाधान मानावं लागलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)